Narendra Modi
Narendra Modi sakal
सप्तरंग

आम्ही ईश्वरी कार्याचे उपासक...!

सकाळ वृत्तसेवा

- चंद्रशेखर बावनकुळे, saptrang@esakal.com

असं म्हणतात, की अनुभवांनी माणूस समृद्ध होतो. विचार प्रगल्भ होतात, आणि संस्कारांचा मुलामा त्यावर चढविला गेला की मनाची श्रीमंती वाढते. अशा अवस्थेत सेवाभावाचं स्थान सर्वोच्च असतं. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून ज्या काही कारणांमुळं सिद्ध झाला आहे, त्यामध्ये कार्यकर्त्याची वैचारिक प्रगल्भता व त्यातून प्रगत होत गेलेला सेवाभाव यांचं स्थान मोठं आहे.

केवळ सत्तेचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचं एकमेव लक्ष्य नाही, तर सत्तेच्या माध्यमातून सेवा, राष्ट्रभावाची जोपासना आणि सुशासनाच्या माध्यमातून सुसंस्कृत समाजनिर्मिती हे पक्षाचं प्रथम ध्येय आहे. म्हणूनच, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अखेरीस व्यक्ती ही पक्षाची नीती आहे, आणि पक्षाच्या नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकानं या नीतीस अनुसरूनच आपल्या अंगी स्वयंसेवकत्वाची बीजं जोपासली आहेत.

दिल्लीमध्ये भारतमंडपम मध्ये गेल्या आठवड्यात पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदोपदी या नीतीचा अनुभव येत गेला, आणि पक्षांच्या संस्कारांच्या शिदोरीत या अनुभवाची भर पडली. दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनातील दोन दिवसांच्या उपस्थितीमुळं अभूतपूर्व अनुभवाची शिदोरी घेऊन आम्ही सारे कार्यकर्ते नव्या आव्हानास सामोरं जाण्यास सिद्ध झालो.

हे आव्हान केवळ आगामी निवडणुकीचं नाही. तर, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पाच्या सिद्धीकरिता सज्ज होण्याचं आहे, आणि यासाठी निवडणूक हे तर केवळ एक माध्यम आहे. देशाला परमवैभवाप्रती नेण्याच्या संकल्पाची सुरुवात दहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या महाविजयानं झाली होती. हा विजय म्हणजे, देशाच्या वैभवी वाटचालीची जनतेनं पक्षाच्या खांद्यावर विश्वासानं सोपविलेली एक पालखी आहे.

गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि समर्थ नेतृत्वाखाली ज्या विश्वासानं आणि तळमळीनं देशाच्या उत्कर्षाचे नवे राजमार्ग तयार केले. राष्ट्रीय अधिवेशनातील नेत्यांच्या संदेशातून मिळालेला संकल्पमंत्र घेऊन आम्ही सारे जण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आत्मविश्वासानं सिद्ध झालो आहोत.

जिथं नेता आणि कार्यकर्ता यांतलं अंतर पुसलं जातं, तिथं संघटनेची ताकद द्विगुणित होते. अधिवेशनात हे अंतर पुसलं गेलं. पंतप्रधान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणंत्री राजनाथ सिंह आदी नेत्यांच्या संपूर्ण उपस्थितीमुळं हे सिद्ध झालं. संघटना ही नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

मोदी यांच्यासारखा द्रष्टा, सेवाभावी आणि संकल्पशील नेता स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाला लाभला, ‘आणि देशाच्या उत्कर्षाच्या वैभवी वाटचालीची दिशा आणि दृष्टी देण्यासाठी पक्षाला त्यांचे अखंड मार्गदर्शन लाभलं हा पक्षासाठी भाग्यशाली संकेत ठरला आहे.

येत्या काळातील, पुढच्या शंभर दिवसांतील दिनचर्येचं एक वेळापत्रकच मोदींनी या वेळी आखून दिलं आहे. देशातील प्रत्येक मतदाराशी संपर्क हा प्रत्येक कार्यकर्त्याचा संकल्प राहणार आहे, आणि मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील जनहिताच्या अनेक निर्णयांच्या लाभार्थींची साथ घेऊन समाजातील वंचितांसाठी उत्कर्षाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभ करावयाचा आहे.

जेव्हा सारे मिळून समर्पित भावनेनं काम करतील, तेव्हा भाजपला सर्वाधिक जागा मिळतीलच, पण त्या नव्या शक्तीनिशी देशाच्या प्रगतीला बळ येईल, हा विश्वास मोदींनी त्यांच्या भाषणातून मनामनात जागविला आहे. गेल्या दहा वर्षांत देशानं प्राप्त केलेल्या प्रगतीची गती अभूतपूर्व अशी आहे. त्यामुळं, जनतेचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे.

देशानं आज अनेक क्षेत्रांत मिळविलेल्या तेजस्वी यशाचा डंका जगभर गाजतो आहे, आणि मोदीजींच्या दूरदृष्टीमुळं प्रगती आणि संस्कृती यांचा सुंदर संगम जगाला भारतामध्ये पाहावयास मिळतो आहे. जेव्हा संकल्प भव्यदिव्य असतात, तेव्हा त्यांचं यश देखील भव्यदिव्य असतं. भारताला विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून देण्याचा आपला संकल्प आहे, असा मंत्र त्या दिवशी मोदी यांनी कार्यकर्त्याच्या मनात पेरला आहे.

हा केवळ विचार नाही, तर कृतीचा संदेश आहे. येत्या पाच वर्षांत त्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्यास मोठी झेप घ्यावी लागेल, विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी पक्षाला पुन्हा एकदा अधिक शक्तिशाली स्वरूपात सत्ता मिळवून देण्याचा संकल्प मनोमनी घेऊन आम्ही सारे कार्यकर्ते दिल्लीच्या अधिवेशनातून परतलो आहोत.

दहा वर्षांच्या स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक कार्यकाळानं कायापालटाच्या संकल्पाचं यश अधोरेखित केलंय. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्याची रेषा पुसली गेली हा केवळ चमत्कार नव्हे. पक्षाचा अंत्योदयाचा मूलमंत्र आणि मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारचं समर्पित कार्य यांचा तो प्रत्यक्ष परिणाम आहे.

‘सबका साथ सबका विकास’ ही केवळ निवडणुकीची घोषणा नाही, तर अंमलबजावणीचा संकल्प आहे, हे या यशानं अधोरेखित केलंय. धर्म, पंथ, जात, प्रांतभेदाच्या भिंतींचे अडथळे आता देशाच्या प्रगतीला रोखू शकणार नाहीत, हे या कृतीनं स्पष्ट झालंय. मोदी सरकारची हमी केवळ निवडणूक घोषणापत्रातून नव्हे, केवळ पोकळ भाषणांतून नव्हे, आणि काँग्रेसी संस्कृतीच्या लांगुलचालनी लाचारीतून नव्हे, तर कृतीतून प्रत्यक्षात येते, याविषयी आता जनतेच्या मनात शंका राहिलेली नाही.

म्हणूनच, आता काँग्रेसच्या सत्तापिपासू राजकारणापासून देशाला वाचविण्याची मोदी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून पुढच्या शंभर दिवसांच्या मोहिमा यशस्वी करण्याकरिता आम्ही कटिबद्ध झालो आहोत.

धर्माच्या नावावर समाजामध्ये भेद निर्माण करणे, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलांचं मनोबल खच्ची करणं, राष्ट्रीय सुरक्षिततेसारख्या संवेदनशील मुद्द्यांना दुय्यम स्थान देणारं राजकारण करणं, या काँग्रेसच्या पापांची फळे देश भोगतो आहे. आता देशाला त्यापासून मुक्त करणं हाच आमचा संकल्प आहे. विकलांग झालेल्या काँग्रेसला आता पक्षाच्या आणि जनतेच्या संघटित शक्तीचा एक धक्का पुरेसा ठरणार आहे.

आगामी निवडणुकीत तो धक्का देण्याकरिता पक्ष आणि जनता हातात हात घालून सज्ज झाली आहे. त्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधानांचे प्रेरणादायी संदेश, पक्षाध्यक्ष नड्डा यांच्या संघटनकौशल्यातून निर्माण झालेली ऊर्जा, मोदी की गॅरंटी या जनतेनं स्वीकारलेल्या परवलीच्या शब्दाचा पुकार, विकसित भारताचं स्वप्न आणि नकारात्मक राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा संपूर्ण पाडाव करण्याची प्रेरणा घेऊन पुढच्या शंभर दिवसांत उभा देश ढवळून काढण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.

अयोध्याधीश प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. भाजप हे देशाचं आशास्थान आहे, आणि विरोधी पक्षांच्या निराशेचं मूळ आहे, म्हणूनच, मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसविण्याचा देशाचा संकल्प आहे. कोणतीही शक्ती या संकल्पास रोखू शकणार नाही, यासाठी आम्ही जागल्याची भूमिका बजावणार आहोत. कारण, आम्ही या ईश्वरी कार्याचे उपासक आहोत, आणि देशाला परमवैभवाप्रत नेण्याची जबाबदारी आता नियतीनंही आमच्यावर सोपविली आहे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)

(शब्दांकन- रघुनाथ पांडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT