Mobile help center for women
Mobile help center for women sakal
सप्तरंग

महिलांसाठी फिरतं मदत केंद्र

डॉ. नीलम गोऱ्हे

विविध परिषदा आणि बैठकांमधून आमचा महिलांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरूच होता. प्रत्येक ठिकाणी महिला मंडळ ते संघटना असा प्रवास आम्ही मांडत होतो. विविध ठिकाणांहून आम्हाला निमंत्रणं येत होती. गावा-गावांत आम्ही महिलांसोबत वेगवेगळ्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करत होतो. आम्हाला फिरण्यासाठी धर्मादाय संस्थेने एक जीप दिली होती. तेच आमचं ‘फिरतं महिला मदत केंद्र’ होतं. १९८६ पासून सुरू झालेल्या मदत केंद्रांच्या निमित्ताने आम्ही ठिकठिकाणी काही परिषदाही घेतल्या आणि त्यातूनच आमची जनजागृती सुरू राहिली.

आम्ही महिला पोस्टर्स, त्याचबरोबर विविध परिषदा आणि बैठकांमधून महिलांशी संवाद साधत होतो. १९८६ च्या सुमाराला स्त्री आधार केंद्राचं काम एका सेवाभावी संस्थेने पाहिलं आणि त्यात आम्हाला कशाची गरज भासते, असं विचारलं. तोपर्यंत आम्हाला पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर, बारामती इतकंच नव्हे; तर जुन्नरची बरीचशी मंडळी घाटकोपर भागात असल्यामुळे मुंबईबरोबरच सोलापूर, लातूर, नगर, नाशिक आदी ठिकाणांहून निमंत्रणं यायला लागली होती. प्रत्येक ठिकाणी आम्ही संवाद साधताना महिला मंडळ ते संघटना असा प्रवास मांडत होतो.

महिला मंडळ आणि त्यांच्या संघटनेत मुख्यतः आम्ही काही फरक करत होतो. महिला मंडळ एक सांस्कृतिक, सामाजिक आणि काही वेळा धार्मिक व्यासपीठही असतं. मात्र, एकमेकांच्या महिला मंडळाचं स्वरूप जास्त संवादात्मक असतं. त्याउलट महिला संघटना म्हटलं तर त्यात अधिक कृतिशीलता असते.

कधी तरी विचारविनिमयाच्या पलीकडे जाऊन पत्रकं वाटणं किंवा निषेध करणं, त्याबद्दलचं आंदोलन करणं, शिष्टमंडळ घेऊन भेटणं, विधिमंडळात प्रश्‍न मांडण्यासाठी देणं, विविध परिषदा आणि विविध कार्यक्रमांचे संयोजन करताना पुढच्या दिशेचा विचार करणं, अशा प्रकारचं अधिक सक्रिय काम महिला संघटनांकडून केलं जाणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर महिलांचे अधिकार म्हणजे मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजे महिलांचे अधिकार अशा प्रकारच्या मांडणीबाबत सगळीकडे जगात स्त्रियांमध्ये आणि वैश्‍विक स्तरावर चर्चा होत होती.

त्या पार्श्‍वभूमीवर काही परिषदाही जगात सर्वत्र झाल्या होत्या. विशेष म्हणजे, १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं झालेलं होतं. एका वर्षात शांतता, समानता, मैत्री विकास अशा प्रकारच्या मुद्द्यांवर स्त्रियांनी अधिक काम करावे, तेदेखील स्त्री-पुरुष समानतेच्या भूमिकेतून अशा प्रकारचा विचार त्यामागे होता.

१९७५ मध्ये अनेक देशांच्या लक्षात आलं, की वर्षानुवर्षांची, शतकानुशतकांची स्त्रियांबद्दल दुजाभावाची जी भावना आहे त्याचे उच्चाटन करायला अनेक वर्षें जावी लागतील. हे दीर्घकाळ चालणारं काम आहे आणि त्याचं संपूर्ण नियोजन करणं, त्यासाठी पैशांची व्यवस्था करणं, प्रत्येक देशाच्या परिस्थितीनुसार वैचारिक दिशा ठरवणं यासाठी काही काळ लागणार होता. म्हणून मग आंतरराष्ट्रीय महिला दशक संयुक्त राष्ट्रसंघांनी जाहीर केलं.

संयुक्त राष्ट्र संघाचा हा महिला विकास समितीचा कार्यक्रम १९४४ पासून सुरू होता. खरं तर त्याच्या पूर्वी विजयालक्ष्मी पंडित यांनी भारताचे प्रतिनिधित्व तिथे केलेलं होतं. १९४४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची महिला विकासविषयक काम करणारी स्वतंत्र अशी शाखा नव्हती; परंतु त्यांची समिती तयार झाली होती. हळूहळू त्यांची अधिवेशनं वाढत गेली आणि मग त्यातून आर्थिक आणि सामाजिक परिषद तयार झाली. त्याचा भाग म्हणून जागतिक महिला आयोग तयार झाला.

जागतिक महिला आयोगाने संपूर्ण जगातील परिस्थितीचा आणि देशोदेशीच्या अहवालांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून त्यांना असं दिसलं, की महिला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय अशा सगळ्या क्षेत्रांत दुय्यम स्थानावर आहेत. अहवाल करत असताना सगळ्या देशांवर जबाबदारी सोपवली, की तुम्हीसुद्धा आपल्या राष्ट्रातील महिलांच्या स्थितीचा विचार करा.

त्यानुसार अभ्यासातून भारतात समोर आलं, की स्त्रियांची संख्या राजकारणात आठ टक्केसुद्धा नाही. दोन तृतीयांश स्त्रिया या असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. त्यानंतर १९७५ ते १९८५ हा काळ आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर झाला. १९७५ च्या सुमाराला मेक्सिको आणि १९८० मध्ये कोपनहेगन, १९८५ मध्ये नैरोबी अशा जागतिक परिषदा झाल्या.

त्या परिषदांमध्ये असे समोर आले, की महिलांच्या छोट्या संघटना, छोटे गट याला चालना देण्याचा प्रयत्न करावा. स्त्रियांमध्ये जागृती होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलायला चालना मिळणार नाही. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही प्रवास करायचो तेव्हा प्रत्येक वेळेला त्याची व्यवस्था करणे म्हणजे त्यांच्यासाठी त्रास होत होता. आजही महिलांना प्रवासाला निघताना बऱ्याचशा अडचणी येतात.

म्हणून मग आम्ही त्या धर्मादाय संस्थेकडे आम्हाला एक जीप देण्याबाबत विनंती केली. त्यांनीही एक छानशी जीप आम्हाला दिली. जीपमध्ये अधिक महिला बसू शकतील अशा पद्धतीने आम्ही तिची रचना केली. जीपचा आकार बदलून तिच्यात सात-आठ महिला बसतील अशी आसन व्यवस्था झाली. आताच्या क्रूझरसारखी तिची रचना होती.

आमचे बाबा डॉ. दिवाकर गोऱ्हे आमच्या जीपला रणगाडाच म्हणायचे. सैन्य जसे रणगाड्यातून निघते... कारण, सहा-सात जणी कार्यकर्त्या ठिकठिकाणी जात असू. ज्या ज्या गावात आम्ही जात होतो, तिथे आम्ही महिलांसोबत वेगवेगळ्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करत होतो. ‘फिरतं महिला मदत केंद्र’ असं आम्ही त्याला नाव दिलं होतं. ॲम्बुलन्सप्रमाणे आमची वाट पाहिली जात असे.

ज्यांना पोटगीची गरज आहे, ज्यांना मारहाण होते आणि ज्यांच्या मुलीचा हुंड्यामुळे छळ होतो आहे, असे पालक आमची ठराविक ठिकाणी वाट बघत असायचे. मग त्यांच्याशी बोलून आम्ही फॉर्म लिहून घेत असू. त्या काळी गावात कौटुंबिक सल्ला केंद्र, महिला मदत केंद्र, कायदा मदत केंद्र वगैरे जवळजवळ नव्हतीच. किंबहुना महिलांविषयी मदत करणाऱ्या काही संस्था सरकारच्या, खासगी किंवा धर्मादाय असंही काही नव्हतं.

त्यामुळे सगळीकडे राजगुरूनगरला पाण्याच्या टाकीच्या जवळ; तर जुन्नरला विठ्ठल मंदिराच्या जवळ, आंबेगावला नर्मदाबाई जोशींच्या वाड्यामध्ये, त्याचबरोबर लिंबाचा माळ, जेजुरीमध्ये, बारामतीला दातेवाड्यामध्ये आमच्या जागा ठरलेल्या होत्या. तिथे आम्ही महिलांना भेटत असू. महिलाही तिथे आमची वाट बघत असत. दर बैठकीला ३५ ते ४० महिला असत आणि हळूहळू त्याचं रूपांतर शंभर-दीडशे महिलांमध्ये होत होतं.

त्या वेळेस महिन्यातून एक जाहीर कार्यक्रम, बाकी केस वर्क आणि सरकारकडे निवेदनांचा पाठपुरावा असा आमच्या कामाचा ढाचा होता. १९८६ पासून सुरू झालेल्या महिला मदत केंद्रांच्या निमित्ताने आम्ही ठिकठिकाणी काही परिषदाही घेतल्या. त्याच्यात दारूमुक्तीचे आमचे पथनाट्य, बालविवाह नकार परिषद आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

त्यांमधून जवळजवळ पुणे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये भोर वेल्हेसह सर्व ठिकाणी स्त्रियांच्या जागृतीचे गट उभे राहिले. या जागृतीच्या गटांमधून स्थानिक महिला नेतृत्व करू लागल्या. या सगळ्यांच्या कामाला प्रसारमाध्यमांनीही चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याचबरोबर गावातील पुरुषही सहकार्याच्या भूमिकेतून पाहत असत. काही जण आमच्या उपक्रमांचं कौतुकही करत असत.

जशा आमच्या महिला एकत्र यायला लागल्या, तसं कुठे ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा अजून काही कामं असतील त्याचीही निमंत्रणं येऊ लागली. थोडक्यात सार्वजनिक जीवनामध्ये मी, आमचे स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेबरोबर अनेक महिलांचासुद्धा जागृती आणि विकासाच्या दृष्टीने सामूहिक प्रवास सुरू झाला. शैक्षणिक संस्था आणि काही राजकीय व्यक्तीसुद्धा आम्हाला त्यात सहकार्य करत होत्या.

एका दृष्टीने आमचा सर्व प्रवास समाजप्रबोधन करणाऱ्या नेत्यांच्या विचारांनुसार चालला होता. म्हणूनच अशा जागृतीच्या कार्यक्रमाचं प्रत्यंतर ‘सत्यशोधक महिला परिषदां’मध्ये व्हायला लागलं. त्यानंतर आम्ही १९८९ पासून १९९१ पर्यंतच्या तीन वर्षांमध्ये २५ ‘सत्यशोधक महिला परिषदा’ घेतल्या. त्यामुळे जागृती आणि मदत पथकापासून ते सत्यशोधक मार्गातून महिलांना समानतेच्या विचारापर्यंत आमचा प्रवास झाला.

त्यातूनही बऱ्याच काही गोष्टी घडल्या. त्या घडण्यामध्ये समाजात एका वेगळ्या प्रकारच्या बदलला सुरुवात झाली. त्याच्या अवकाशातून, त्या संधीतून स्त्रियांची संघटना ठिकठिकाणी उभी राहायला लागली. त्याची दखलही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि राज्यस्तरावर सुरू झालेली दिसली.

neeilamgorhe@ gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT