Divya Deshmukh
Divya Deshmukh Sakal
सप्तरंग

मापदंड, कौशल्य की सौंदर्य?

अवतरण टीम

- डॉ. नीता ताटके

उदयोन्मुख भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्या एका पोस्टची नुकतीच मोठी चर्चा झाली. नेदरलँड्समध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पुरुषी नजरांचा आणि तशाच प्रकारच्या वागणुकीचा सामना करावा लागल्याचा आरोप तिने केला. प्रेक्षक खेळापेक्षा इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष देत असल्याचे तिचे म्हणणे होते. महिला खेळाडू आज आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना एक प्रेक्षक म्हणून त्यांचा आदर्श ठेवायलाच हवा.

सन १९९६... महिलांचा विम्बल्डन स्पर्धेतील किमिको डेट विरुद्ध स्टेफी ग्राफ हा उपांत्य फेरीचा सामना! आपल्या रॅकेटने बॉलचे टप्पे मारत ‘सर्व्हिस’ करण्याच्या तयारीत असलेल्या स्टेफीला अचानक प्रेक्षागृहातील एका चाहत्याकडून एक अनपेक्षित प्रश्न आला... ‘स्टेफी, तू माझ्याशी लग्न करशील का? संपूर्ण स्टेडियममध्ये हास्याची कारंजी उडाली, स्टेफीच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य उमटले...

मात्र मुळीच विचलित न होता, बॉलचे टप्पे मारत मारतच तिने प्रतिप्रश्न केला, ‘तुझ्याकडे किती पैसे आहेत?’ आणि स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अत्यंत खेळीमेळीने स्टेफीने त्या अज्ञात व्यक्तीची बोलती बंद केली. विम्बल्डनमधला एक ‘आयकॉनिक प्रसंग’ म्हणून आजही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात बघितला जातो. या स्पर्धेची अंतिम लढतही स्टेफी दिमाखात जिंकते.

विनोदाचा भाग सोडला तरीही एका अत्यंत कर्तृत्ववान खेळाडू महिलेकडे बघण्याचा एक संकुचित दृष्टिकोनच त्यातून दिसून येतो. दुर्दैवाने या प्रसंगाला सुमारे २५ वर्षे झाली असली, तरी महिला खेळाडूंकडे बघण्याच्या वृतीत आमूलाग्र बदल झाला असल्याचे जाणवत नाही, अशी खंत महिला खेळाडू व्यक्त करताना दिसतात.

१९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ९९७ खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये दोन टक्के म्हणजे २२ महिला होत्या. २०१६ च्या ‘रियो ऑलिम्पिक’मधील महिलांची ४५०० ही संख्या आजवरच्या त्यांच्या सहभागाचा उच्चांक होता. १९७८ मध्ये ‘युनेस्को’ने ‘क्रीडा व शारीरिक शिक्षण हा ‘व्यक्तीचा मूलभूत हक्क’ (Basic Human Right) असल्याचे जाहीर केले होते, त्याचाही महिलांना खूप फायदा झाल्याचे दिसले.

अगदी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयपासून आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये महिलांचा क्रीडा सहभाग आता खूपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यांचा दर्जादेखील खूप चांगला आहे... मात्र बघायला गेले तर एकूणच समाजाची महिलांना दुय्यम लेखण्याची मानसिकता खेळांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येते.

महिला खेळाडूंना कमी लेखले जाते, पुरुष खेळाडूंच्या तुलनेत महिलांना मानधन कमी मिळते, प्रसिद्धी तर पुरुषांच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षाही कमी मिळते आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या कौशल्यापेक्षा सौंदर्याचीच चर्चा जास्त होताना दिसते. काही अपवाद वगळता महिला खेळाडू, त्यांची कौशल्ये याच्यावर खूप कमी संशोधन झाल्याचे आढळून येते. एकूणच खेळांमध्ये पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. अशा पुरुषी वर्चस्वामुळे महिलांचे मानसिक खच्चीकरण, उडालेला आत्मविश्वास हे परिणाम लगेचच दिसून येतात.

१९९० मध्ये एका १४ वर्षीय महिला खेळाडूचा तेव्हाच्या लॉन टेनिस संघटनेच्या अध्यक्षांनीच विनयभंग केला. आपल्या सत्तेच्या जोरावर तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा छळ त्यांनी सुरू केला. त्याचे पर्यवसान तिच्या आत्महत्येत झाले. २०१० मध्ये संबंधित अध्यक्षांना केवळ एक हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांची कैद अशी शिक्षा झाली आणि त्यांची जामिनावर लगेच सुटकाही झाली.

२०१० मध्ये काही राष्ट्रीय हॉकीपटू महिला खेळाडूंनी प्रशिक्षकांविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती. या आरोपाची चौकशी करण्यासाठी जी समिती स्थापन झाली त्यातील सर्व सदस्य पुरुषच होते. महिलांची तक्रार ऐकायला महिला सदस्यांची आवश्यकताही तेव्हा भासली नव्हती. २०११ मध्ये बॅडमिंटनच्या जागतिक संघटनेने महिलांसाठी नवीन ‘ड्रेस कोड’ आणला. तो होता महिलांनी ‘स्कर्ट’ घालण्याचा नियम.

त्यामध्ये कारण देण्यात आले होते ‘बंध आकर्षक दिसण्यासाठी’... to ensure attractive presentation. त्यावर गदारोळ उडाला आणि २०१२ मध्ये संघटनेवर संबंधित नियम मागे घेण्याची नामुष्की ओढवली. भारतामध्ये २०१२ मध्ये ‘पॉक्सो’ नियमावली आली आणि लैंगिक छळाची व्याख्या, त्याची व्याप्ती, त्याच्यावर करण्याचे उपाय याबाबत जागृती व्हायला सुरुवात झाली.

मात्र या सर्व गोष्टींमुळे महिला खेळाडू, त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक नक्की पडला का? महिला खेळाडूंशी बोलताना त्यांचे दुःख जाणवते, की आम्हाला प्रसिद्धी मिळत नाही... प्रसिद्धी मिळाली तर आमच्या खेळाचे विश्लेषण त्या मनाने कमी होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर सौंदर्य, कपडे इत्यादींचीच प्रसिद्धी जास्त होते.

क्रिकेटमध्ये जेव्हा चौथा ‘अंपायर’ म्हणून महिलांचा समावेश व्हायला लागला तेव्हा त्या खेळाबद्दल किती बोलत आहेत, कसे बोलत आहेत यावर चर्चा होण्यापेक्षाही त्या किती ‘हॉट’ आहेत हीच प्रसिद्धी मिळत गेली. या सगळ्याला वाचा फुटली ती नुकत्याच नेदरलँड्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ सामन्यात अशा अवहेलनात्मक अनुभवाला सामोरे गेलेल्या नागपूरच्या १८ वर्षीय आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने सोशल मीडियातून व्यक्त केलेल्या संतापातून! एक लांबलचक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकून तिनी वासनांध प्रेक्षकांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

अर्थातच महिला खेळाडू या सगळ्यामधून वाट काढत पुढे जाण्याचा प्रयास करीत आहेतच. स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकल हिने ‘महिला व पुरुष खेळाडूंचे मानधन समान असावे’ यासाठी उभारलेला लढा यशस्वी झाला खरा; पण त्यासाठी तिला पाच राष्ट्रीय स्पर्धांवर पाणी सोडावे लागले होते. ‘रोलर डर्बी’ हा ‘संपर्क खेळ (contact sport) पाच स्केटर्सच्या दोन संघांमध्ये खेळला जातो.

पुरुषाच्या वर्चस्वाला कंटाळून काही महिलांनी या खेळाची वेगळी संघटना सुरू केली. त्यांना दाखवून द्यायचे होते, की ‘आम्हीही पुरुषांसारखा आक्रमक, स्पर्धात्मक, मनोरंजनात्मक व चित्तवेधक खेळ खेळू शकतो.’ त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि आज या खेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुरुष, महिला आणि एकत्रित संघ अशाही स्पर्धा होताना दिसतात.

अनेक मुस्लिम देशांतील महिला खेळाडूंना फक्त पोशाखावर असलेल्या बंधनांमुळे क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेता येत नाही. २०१९ मध्ये शिवाजी उद्यानावर भरलेल्या पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत इराणच्या फॉयजे जलालीने दोरी मल्लखांबावर तिचा संच ‘स्लॅक्स - पूर्ण बाह्यांचा टी शर्ट व डोक्यावर स्कार्फ’ बांधून सादर केला होता.

बंदिस्त सभागृहात ‘शॉर्टस्’वर कठीण प्रकारांसहित उत्तम पुरलेला मल्लखांब करणारी फॉयजे, देशाच्या असलेल्या कपड्यांच्या बंधनांमुळे मैदानावरील स्पर्धेत भागच घेऊ शकली नाही. आता मात्र अनेक खेळांच्या संघटना या बाबतीत सजग होऊ लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कलात्मक जिम्नॅस्टिक्सच्या संघटनेने त्यांच्या जागतिक स्पर्धांमध्ये संपूर्ण पाय उघडे ठेवणाऱ्या ‘जिमसूट’ऐवजी ‘जिमसूट-स्लॅक्स’ व ‘शॉर्टस्’सारखे पाय असलेल्या ‘जिमसूट’ला परवानगी दिली आहे.

भारतामध्ये आता गावागावांमध्येही मुलींच्या खेळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बंदिस्त सभागृहांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे जरा चांगला प्रेक्षकवर्ग येतो, असे आता पालक-प्रशिक्षक सांगत आहेत. भारताच्या काही राज्यांमध्ये स्पर्धा असल्या की मुलींची छेड काढली जाणारच हे समीकरणही आता बदलायला लागले आहे.

खेळाचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, खेळाच्या सुविधा देणाऱ्या संस्था, स्पर्धा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संघटना आणि संघटक या सर्वांनीच वाईट वर्तणूक करणारे, मग ते खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक वा प्रेक्षक असोत, ‘छळ सहन करणार नाही’ (no tolerance to harassment) अशी सुस्पष्ट भूमिका घेतली, ती प्रत्यक्ष अंमलात आणली तर खूप मोठा फरक पडेल. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात भारताचे स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी मुलाखतीमध्ये वाहवत जाऊन महिलांबद्दल अश्लाघ्य टिपण्या केल्याबरोबर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

खेळाडूंना खेळाचे तंत्र शिकविणाऱ्या प्रशिक्षकाबरोबरच एक ‘वर्तन प्रशिक्षक’ आणि पालकांनी घरातून दिलेले संस्कार यांनी खूप मोठा फरक पडेल. आज मुली-महिला खेळाडूंना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. समाज बदलाची जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर आहे. या अवघड वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

पी. व्ही. सिंधू, सानिया नेहवाल, सानिया मिर्झा, मेरी कोम, मल्लेश्वरी, बहुतांशी सधन घरातून न आलेल्या; पण ऑलिम्पिकपर्यंत बाजी मारलेल्या आपल्या हॉकीपटू महिला खेळाडू इत्यादी सर्वांनीच आपल्या नम्र आदर्श वर्तनाने प्रेक्षकांवर गारुड केले आहे. कर्तृत्वाबरोबरच त्यांनी उत्तम वर्तनाने एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यांचा आदर्श एक प्रेक्षक म्हणून ठेवायला हवा.

neetatatke@gmail.com

(लेखिका क्रीडा मानसशास्त्र अभ्यासक व मल्लखांब प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT