deenanath mangeshkar
deenanath mangeshkar sakal
सप्तरंग

‘तो बघ... ‘खरा दीनानाथ’ आत गातोय!

सकाळ वृत्तसेवा

- हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com

मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांचं स्मरण मंगेशकर कुटुंबीय ता. २४ एप्रिल रोजी करतात. भारतीय संगीतक्षेत्रावर, नाट्यक्षेत्रावर अमीट छाप उमटवणारी ही वडील-कन्या द्वयी. या दोघांबद्दल लिहीत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. वडिलांबद्दल लिहिताना हृदयनाथांचे शब्द कविता बनतात आणि भगिनी लतादीदी यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या शब्दांना भावनिक ओलाव्याचा स्पर्श होतो.

दीदी बाबांच्या आसनासमोर

बसली होती. आसन म्हणजे

मखर, लहान मंच किंवा छान

गादी-तक्क्या असं बाबांचं

आसन नव्हतं. एक स्वच्छ चटई

आणि भिंतीला टेकवलेली एक उशी...

पण बाबांचे शिष्य

साध्या बैठकीला आसन म्हणायचे

या रिक्त आसनांपुढं

आणि त्या मूक तंबोऱ्याकडं

बघत किंचित् पोक काढून

दीदी खिन्नपणे; पण स्तब्ध

बसली होती

मीनाताई, आशाताई उगाच

इकडं तिकडं फेऱ्या मारत होत्या

उषाताई बाबांची मांडी

स्मरत खट्टू झालेली

अश्वत्थाम्याच्या मस्तकावरची

भळभळणारी जखम

पायावर सोशीत मी

वेदनेत हरवलेला

काहीही आशा नसलेलं उजाड, माळरानाप्रमाणे

भकास भविष्य

पुढं काय? याची जाण असलेली

आई आणि दीदी

मध्येच पायातून आलेली कळ

तोंडातून ओकणारा मी...

आणि त्या मनापासून आलेल्या

वेदनेच्या सुरात अचानकपणे

उद्भवलेला एआरपीचा

भोंगा

आई, पाची भावंडं

एका अनामिक भीतीनं दचकलो

साऱ्यांनी त्या रिक्त आसनाकडं

एका आशेनं बघितलं...

‘भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो

तू मला शिकविली गीते’

संध्याकाळ होण्याची

चाहूल लागलीय...

चढा मध्यम, कोमल रिषभ,

कोमल धैवत, मनात रुंजी घालू लागतात...

शुद्ध गंधार साऱ्या सुरांना

व्यापतो

उगाच शुद्ध निषाद अडून बसतो

वारा, ‘बादेसबा’ मध्ये झुळझुळू लागते

राव्याची फडफड होते

एखादा चुकार किरण मृण्मय होतो

ज्योतीच्या मंद प्रकाशामध्ये

तो किरण तेजोमय होतो...

आणि

‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’

तीन सांजांचं तत्त्वज्ञान गाऊ लागतात

तीन समयांचं वर्णन कथू लागतात

आणि, रजनीच्या चाहुलींमध्ये

तिसरी सांज कशी विसर्जित होते

आणि प्रकाशाचा क्षय कसा होतो

याचा दृष्टान्त देतात...

क्षितिजाच्या वर काळीनिळी रेघ

तर क्षितिजाच्या खाली काजळरेघ

आणि, मध्ये सृष्टिदेवतेचा

अर्धोन्मीलित सजल नेत्र

तिमिराची ‘आहट’ लाभलेला नयन

आशयघन डोळा...

आणि, खर्जातून जन्म घेणारा गंधार

सारी संध्या, सांज, ‘श्याम’, ‘धूलिबेला’ व्यापून टाकतो...

आणि,

‘ए सदारंग...’ अशी ‘पूरिया धनाश्री’ची

बंदिश वातावरणात घुमू लागते

मनावर रेघोट्या मारते

व्रणातून रुधिराऐवजी

स्वर वाहू लागतात...

‘तिनेच शब्द बघ निघती

जग फिरुनी फिरुनी

मनी रिघती

मज आता

दुसरी न गती

जगतीच सारी जणु जिरली’

संध्येच्या हृदयात

‘पूरिया धनाश्री’चे सूर असे जिरतात

बाबा आपल्या शिष्यांना

शिकवत बसले आहेत...

‘ए सदारंग...’ ही बंदिश ऐकून

दीदी एकदम भूतकाळाच्या

गर्तेत फेकली जाते

दीदी फक्त सात वर्षांची होती

सांगली शहरातल्या ‘दीनानाथ चाळी’मधल्या

एका खोलीमध्ये

बाबा आपल्या शिष्यांना

‘पूरिया धनाश्री’ शिकवत बसले होते

ही चाळ बाबांनी बांधली होती

बावीस खोल्या या चाळीत होत्या

पण बाबांना फक्त दोन खोल्या

नशिबानं मिळाल्या होत्या

बाकी साऱ्या खोल्या

माईचे नातेवाईक

आणि बाबांचे चाहते, शिष्य

यांनी भरल्या होत्या

‘असुनी खास मालक घरचा

म्हणती चोर त्याला’

अशी बाबांची अवस्था झाली होती

आप्त-मित्र-नातेवाइकांच्या गराड्यात

तेच कसेबसे तडजोड करायचे

तो बाबांचा स्वभाव होता

कोण कुठले आप्त

ज्यांनी बाबांना ओळखलंच नाही

कधी त्यांच्या कलेची त्यांना

जाणीवच झाली नाही

त्या आप्तांना सांभाळण्यात

बाबांचा जीव मेटाकुटीला यायचा

मग फार त्रास झाला

तर ते स्वतःशीच गुणगुणायचे

‘शतजन्म शोधिताना

शत आर्ति व्यर्थ झाल्या

शतसूर्य मालिकांच्या

दीपावली विझाल्या...’

स्वभावानं अतिशय गरिब

पण उदार असे बाबा

दीदीशिवाय

कुणालाच कधी कळले नाहीत

कारण, दीदी त्यांच्या संगीताचा, स्वरांचा

प्रतिध्वनी होती. आवाज होती

नाही...नाही...ती त्याची साउली होती

पायांना घट्ट शिवलेली साउली

शरीर नष्ट झाल्यानंतरही

नष्ट न झालेली स्वरसाउली

‘स्वरमाउली’ म्हणून ओळखली जाऊ लागली...

‘ए सदारंग...’ बाबांनी ओळ संपवली

आणि, बाबा काही कामासाठी आसनावरून उठले

आणि दुसऱ्या खोलीत गेले

दाराआड लपलेली दीदी

पटकन् आत गेली

बाबांच्या आसनावर बाबांसारखीच

बसली आणि गणूमामांना

म्हणाली : ‘ही बंदिश तुम्ही

चुकीची गाता.

ही बंदिश बाबा असे गातात.’

दीदीला ज्यांनी

अंगा-खांद्यावर खेळवलं असे

चंद्रकात गोखले

गणपतराव मोहिते

श्रीपाद जोशी

परशुराम सामंत

असे दिग्गज शिष्य तिथं बसले होते

सहा-सात वर्षांची चिमुरडी

‘पूरिया धनाश्री’च्या गप्पा मारतेय हे बघून

त्यांना गंमत वाटली : ‘लता, तूच ही बंदिश

शिकव...आम्ही शिकतो, असं

ते कौतुकानं म्हणाले.

आणि, अतिशय गंभीरपणे

दीदीनं गायला सुरुवात केली

‘ए सदारंग... नित उठकर

देत ऽऽऽ दुवाई’

सारे सारे अवाक् होऊन ऐकत

राहिले. दीदी गातच राहिली...

बाबा दरवाजाआड उभे होते

माईकडे वळून ते म्हणाले :

‘श्रीमती! मा. दीनानाथ आज

रोजी मृत्यू पावला बघ!’

‘अहो, सांजवेळी असं अशुभ

बोलू नका’, माई कळवळून म्हणाली

‘अगं! मी खरं बोलतोय!!

तो, तो बघ...खरा दीनानाथ

आत गातोय’

बाबा आत गेले

दीदी घाबरून उठायला लागली

बाबा म्हणाले : ‘बस...लता,

तू योग्य जागी बसली आहेस.

यापुढं मी गात जाईन तू फक्त

ऐकत जा. मी जाणीव देईन

जाणिवेची तू नेणीव कर

मी पार्थिव गाईन

तू अपार्थिव गा

मी सुरांची मूर्ती करेन

तू त्याची प्राणप्रतिष्ठा कर...’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT