Alexis-Jessica-Cassandra
Alexis-Jessica-Cassandra 
सप्तरंग

सोलो महिला ट्रॅव्हलर्स

प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

किती ‘सोलो महिला ट्रॅव्हलर्स’ तुमच्या ओळखीच्या आहेत? किंवा तुमच्या नात्यातील महिलांनी सोलो ट्रॅव्हल केलेलं तुम्हाला खरंच आवडेल का? काय अडचणी असतात सोलो महिला ट्रॅव्हलर्सच्या? आपल्या देशात किंवा इतर काही देशांत लोकांचा याबाबतीत बहुधा संकुचित विचार आढळतो. बहुसंख्य महिलांना कुटुंबीयांकडून असा एकटीनं प्रवास करण्यास विरोध होतो आणि मग सुरक्षिततेच्या नावाखाली कित्येक महिलांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा गेल्या अनेक वर्षांपासून मारल्या जात आहेत; पण सोलो महिला ट्रॅव्हलर्सची संख्या म्हणावी तेवढी वाढलेली दिसत नाही. उद्याच्या (ता. आठ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त जगातील काही सोलो महिला ट्रॅव्हलर्सबद्दल मला सांगायला आवडेल... 

त्यानिमित्तानं निदान ‘सोलो महिला ट्रॅव्हलर्स’बद्दल नव्यानं चर्चा तरी सुरू होईल किंवा काही मुलींना स्वत:हून फिरावंसं तरी वाटेल आणि त्यासाठी काही प्रेरणा किंवा रोल मॉडेल्स असली पाहिजेत. समोर काही प्रेरणा असेल तर माणसं घडत जातात. असाच एक इंग्लंडचा तरुण सन २००७ मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेत असताना व्हिएतनाम इथं स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी गेला आणि पुढील पाच वर्षांत त्यानं जग पालथं घातलं. त्याचं नाव जेम्स एस्किथ (James Asquith). तो उत्तम लेखक असून ‘हॉलिडे स्वॅप’ कंपनीचा संस्थापक व सीईओ आहे. सन २०१३ मध्ये जेम्स हा जगातील १९३ देशांना भेट देणारा सर्वात तरुण माणूस ठरला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंदही झाली. त्या वेळी त्याचं वय अवघं २४ वर्षं १९२ दिवस एवढं होतं. आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर जेम्सनं ‘ब्रेकिंग बॉर्डर्स - ट्रॅव्हल्स इन पर्स्युट ऑफ अ इम्पॉसिबल रेकॉर्ड’ हे जगातील प्रत्येक देशातील त्याच्या प्रवासाचं दस्तावेजीकरण करणारं पुस्तक लिहिलं. अ‍ॅमेझॉनवरील ट्रॅव्हल लिटरेचरमध्ये हे पुस्तक टॉप टेनमध्ये होतं. 

‘प्रवासात कायम लवचिकता असली पाहिजे,’ असं जेम्स म्हणतो. पूर्वी तो लंडन इथं बॅंकर होता. त्यानं प्रत्येक देशाचा प्रवास तर केलाच; पण ‘हॉलिडे स्वॅप’ या कंपनीच्या माध्यमातून आता तो इतरांना प्रवास करण्यास मदत करतो. त्यानं ३३ वर्षांच्या आयुष्यात जवळपास दीड हजारांहून अधिक विमानांनी प्रवास केला आहे. 

पण गंमत अशी आहे की अनेक सोलो महिला ट्रॅव्हलर्सनी जेम्सचा हा जागतिक विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला अन् त्या त्यात यशस्वीही झाल्या. भारतात व इतरही अनेक देशांत सोलो महिला ट्रॅव्हलर्सना कमी लेखलं जातं हे आपण बऱ्याचदा पाहतो. कधी कधी त्यांची टिंगलही केली जाते. त्या महिलांना विविध आव्हानांना तोंड द्यावं लागतं; पण याबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदलावा यासाठी अनेक सोलो महिला ट्रॅव्हलर्सची उदाहरणं गेल्या दोन दशकांत पुढं आली आहेत आणि ती मला फार महत्त्वाची वाटतात. 

बत्तीस वर्षांची कॅसॅंड्रा डी पेकोल (Cassandra De Pecol) ही एक अमेरिकी लेखिका-प्रवासी-सामाजिक कार्यकर्त्री-उत्तम व्याख्याती आहे. सन २०१७ मध्ये तिनं अधिकृतपणे दोन श्रेणींमध्ये गिनीज् वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलं. त्या दोन श्रेणी अशा : १. सर्व देशांना वेगवान वेळेत भेट देणारी व्यक्ती २. सर्व देशांना वेगवान वेळेत भेट देणारी महिला. ता. २४ जुलै २०१५ ते दोन फेब्रुवारी २०१७ या काळात तिनं हा विक्रम केला. कॅसॅंड्राचा उल्लेख ‘पायोनिअर इन सोलो फीमेल ट्रॅव्हल’ असा केला जातो. ती एक ट्रायॲथलिटही असून तिनं ‘फुल आयर्नमॅन’ ही स्पर्धा पूर्ण केली आहे आणि भविष्यात एस्ट्रोनॉट व पायलट होण्याचं तिचं स्वप्न आहे. 

ऑक्टोबर २०१९ मध्ये एकवीसवर्षीय अमेरिकी अलेक्सिस अल्फोर्ड (Alexis Alford) हिनं जेम्स व कॅसॅंड्रा अशा दोघांचाही विक्रम मोडला. तिनं सर्वात कमी वयात (२१ वर्ष १७७ दिवस) १९६ देशांत प्रवास केला व गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं ‘यंगेस्ट पर्सन टू ट्रॅव्हल टू एव्हरी कंट्री’ अशा शब्दांत तिची नोंद घेतली. वयाच्या १८ वर्षांच्या आत ती ७२ देश फिरली होती. तिचे पालक टूर्स आणि ट्रॅव्हल एजन्सी चालवतात. प्रवासासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा तिला फायदा झाला; परंतु तिचे सगळे प्रवास हे ‘सेल्फ-फंडेड’ आहेत. 

‘बहुसंख्य प्रसारमाध्यमं जेवढं भयंकर चित्रण दाखवतात तेवढं भयानक वातावरण जगात वस्तुतः नाही. उलट, सर्वत्र दया, नम्रता अनुभवास आली. सर्वत्र चांगले लोक आढळले,’’ असं अलेक्सिस नेहमी सांगते व लोकांना प्रवास करण्यास प्रवृत्त करते. स्वतःकडचे दहा हजारांहून जास्त अधिकृत पुरावे तिनं ‘गिनीज्’ला दिले व तिला तो मानाचा किताब मिळाला. 
‘माझ्या यशात पालकांचा व मित्रपरिवाराचा मोठा वाटा आहे...कारण, त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा जागतिक विक्रम करणं शक्य झालं नसतं,’’ असं ती आवर्जून सांगते. 

युगांडन-अमेरिकी असलेली सदतीसवर्षीय जेसिका नाबोंगो (Jessica Nabongo) हिचं मला विशेष कौतुक वाटतं. कारण, जगातील प्रत्येक देशात (१९५ देश) प्रवास करणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला आहे (फर्स्ट डॉक्युमेंटेड ब्लॅक वूमन टू हॅव ट्रॅव्हल्ड् टू एव्हरी कंट्री इन द वर्ल्ड). आपण चाळिसाव्या वर्षापर्यंत जगातले सगळे देश फिरावेत असं तिला लहानपणापासूनच वाटायचं; परंतु पस्तिसाव्या वर्षीचं (२०१९) तिचं हे स्वप्न पूर्ण झालं. 

ती म्हणते : ‘‘प्रवास करणं म्हणजे आपलं घर सोडणं. तुम्हाला जगभर, लांब जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या घरापासून शंभर मैलांचा प्रवास करू शकता. तुमच्या राज्यातल्या नवीन शहरात जाऊ शकता आणि बरंच काही शिकू शकता.’’ प्रवासासाठी लोकांना तिचं असं प्रोत्साहन देणं वाखाणण्याजोगं आहे. 

‘प्रवास’ या क्षेत्रात मला या तिन्ही महिला मोलाच्या वाटतात. महिलाप्रवाशांसाठी पायोनिअर असलेली कॅसॅंड्रा असो, जेम्सचा जागतिक विक्रम मोडणारी अलेक्सिस असो वा पहिली कृष्णवर्णीय महिलाप्रवासी जेसिका असो...तिघींनी  ‘सोलो महिला ट्रॅव्हलर’ म्हणून आपापलं विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे, ठसा उमटवला आहे. उद्याच्या जागतिक महिलादिनानिमित्त या सगळ्या महिला सोलो ट्रॅव्हलर्सला सलाम आणि शुभेच्छा...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT