pravin tokekar
pravin tokekar 
सप्तरंग

चक्रव्यूहाच्या भेदाचं रहस्य (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com

डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं. क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर केली. कमीत कमी संवाद. आभाळ, भूमी आणि समुद्रात लढल्या गेलेल्या संगराचं अभूतपूर्व चित्रण त्यानं असं काही सादर केलं, की भल्याभल्यांनी कानाच्या पाळ्या पकडल्या. युद्धपटांची हॉलिवूडमध्ये कमतरता नाही; पण असा युद्धपट पुन्हा होणं नाही, हे मत बहुतेकांना मान्य झालं. एक चित्रमय पोवाडाच असलेल्या या सुरेख चित्रपटावर एक झोत...

Long after the shadow of war is fled
And the last battle is fought
Men will remember the Little Ships
And the great things they wrought.

We shall tell over with laughter and tears
The homely names they bore -
They, not meant for the baptism of fire
And the grim uses of war.

Let us remember them and their men
Who asked not fee nor fame,
But all they knew was a job to do,
And they spat on their palms and they came.

Home they came from that coast of death,
Each with her tale of men,
Stayed but to set them ashore - and so
Back to hell's mouth again. . . .

Therefore, while England's cliffs shall stand,
And the Channel tides do roll,
Let us remember the Little Ships -
How on the Day of the Little Ships
They saved an army whole.

-Cicely Fox Smith
(1989-1954, "द डे ऑफ लिट्‌ल शिप्स', ब्रिटिश कवयित्री सायस्ली फॉक्‍स स्मिथ यांच्या गाजलेल्या कवितेचा अंश.)
* * *

कवयित्री सायस्ली फॉक्‍स स्मिथ बऱ्याचशा विस्मरणात गेल्या आहेत. त्यांच्या कवितांवर पोसलेली ब्रिटिश रसिकांची पिढीही आता माळवतीपल्याड निघून गेली. वर दिलेली कविता ही दुसऱ्या महायुद्धात डंकर्कला अडकून पडलेल्या तीन लाख ब्रिटिश फौजेला सोडवून आणणाऱ्या सागरी मोहिमेचा पोवाडाच आहे. डंकर्कची लढाई होऊन गेली 1944च्या मे आणि जून महिन्यात. आजही या लढाईचे उल्लेख अधूनमधून होत असतात. या लढाईत ग्रेट ब्रिटननं दाखवलेला जिवटपणा इंग्रजी भाषेतला एक मुहावरा बनून गेला. पुढं जिंकायचा इरादा असेल, तर आत्ता या क्षणी माघार घेणंही त्या भविष्यातल्या विजयाचा पाया असू शकतो, हे व्यावहारिक सत्य ब्रिटिश फौजांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. यात फौजांइतकाच सहभाग होता ब्रिटिश किनाऱ्यावरल्या मच्छिमारांचा, खासगी होड्यांच्या मालक-चालकांचा...म्हणजेच सर्वसामान्य माणसाचा.

डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं नसतं, तर आज जगाचा इतिहास आणि नकाशा दोन्ही बदललेलं दिसलं असतं. तसं बघायला गेलं, तर डंकर्कची सुटका हा लौकिकार्थानं शेपूट पायात दाबून पळ काढण्याचा प्रकार होता. चारी बाजूंनी हिटलरच्या नाझी फौजांनी कोंडी केल्यावर ब्रिटिश, फ्रेंच आणि बेल्जियमच्या जवळपास चार लाखांहून अधिक फौजेची मरणप्राय कोंडी झाली होती. तिन्ही बाजूंनी समुद्र आणि एका किनाऱ्याशी अडकून पडलेला हा असहाय फौजफाटा.

या सगळ्यांचं सामूहिक निर्दालन करणं हिटलरच्या आवाक्‍यातलं होतं...आणि कदाचित नव्हतंही. त्यानं काही निर्णायक हालचाल करण्याआधी डंकर्कमधून काढता पाय घेणं इष्ट आहे, हे चर्चिल यांच्यातल्या निष्णात युद्धनेत्यानं ओळखलं होतं. निर्णय घ्यायला हिटलरला चार-पाच दिवस उशीर झाला, आणि चर्चिलच्या हजारो छोट्यामोठ्या होड्यांनी आपले सैनिक शिताफीनं सोडवून आणले.
चार-पाच लाखांची सुटका एकाच वेळी करणं हा काही खाऊ नाही. त्यातले तीन लाख तर ब्रिटिश सैनिक होते. कुणाचं ना कुणाचं, कुणीतरी त्या डंकर्कच्या खाईत सापडलं होतं. ब्रिटनचं पेकाटच मोडलं असतं. एक साम्राज्य आठवड्याभरात धुळीला मिळालं असतं.

फ्रेंच समुद्रात जर्मन बोटी गस्त घालत होत्या. त्या बोटींवर तोफा होत्या. आभाळात जर्मन बॉम्बर्सचा राबता अखंड चालू होता. डंकर्कमध्ये अडकलेल्या दोस्त सैन्याची रसद तोडून त्यांची अन्नान्नदशा करून सर्वनाश करण्याचा हिटलरचा इरादा दिसतच होता. कडेकोट जर्मन गस्तीमुळे डंकर्कच्या किनाऱ्याला एकही युद्धनौका लागणं अशक्‍य होतं. सुरक्षित अंतरावर खोल समुद्रात उभ्या असलेल्या आपल्या युद्धनौकांपर्यंत किनाऱ्यावरच्या फौजेला आणायचं कसं, हा दोस्त सैन्यापुढचा यक्षप्रश्‍न होता. अखेर छोट्या छोट्या मच्छिमार नौकांनी डंकर्क गाठून आपले सैनिक उचलून आणायचे अशी अशक्‍यप्राय मोहीम ठरली. या कामासाठी शेकडो नौका लागल्या असत्या. जर्मन बॉम्बर्सचा धोका त्यांनाही होताच. या मोहिमेचं नाव होतं ः "ऑपरेशन डायनॅमो.'
ही मोहीम प्रत्यक्षात येणं शक्‍य नाही. यशस्वी होणं तर अजिबातच शक्‍य नाही, असं साऱ्यांचं मत होतं; पण साऱ्यांच्या मताला जुमानतील, तर ते चर्चिल कसले? एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांच्या होड्या जमा करणं हेच मुळात अशक्‍यकोटीतलं काम होतं; पण मायभूचे सुपुत्र सोडवण्यासाठी शेकडो सर्वसामान्य होडीवाल्यांनी आपल्या होड्या, गलबतं, नौका बेधडक सागरात लोटल्या. जर्मन हल्ले हुकवत, चुकवत डंकर्कच्या एकमेव शाबूत धक्‍क्‍याला लावल्या. हिटलरनं दोस्तांचं सैन्य संपवून टाका, असा आदेश काढेपर्यंत तीन लाखांहून अधिक ब्रिटिश सैनिक आपापल्या घरी पोचलं होतं.

"डंकर्कच्या किनाऱ्यावरची मसलत तडीला गेल्याच्या आनंदात "पलायनानं विजय मिळत नसतो, याचंही भान असू दे,'' असा परखड इशारा चर्चिल यांनी आपल्या ब्रिटिश संसदेतील भाषणात दिला होता. ही लढाई ब्रिटननं जिंकली नाही; पण हिटलरनंही नाहीच जिंकली. इथं जीत झाली ती राष्ट्रासाठी "काहीही' करण्याची ऊर्मी बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची. डंकर्क हा ब्रिटनला मिळालेला एक जीवघेणा धडा होता. त्यातून तावून सुलाखून निघालेल्या ब्रिटननं हिटलरचा भस्मासुर अखेर गाडलाच.
... डंकर्कच्या कहाणीत चर्चिल यांना नायकत्व देऊन अनेकदा लेखन वा चित्रण झालं आहे. अर्थात त्यात तथ्यही आहेच; पण क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर केली. दीडेक वर्षापूर्वी नोलानचा "डंकर्क' आला, आणि रसिक स्तिमित झाले होते. कमीत कमी संवाद. आभाळ, भूमी आणि समुद्रात लढल्या गेलेल्या संगराचं अभूतपूर्व चित्रण त्यानं असं काही सादर केलं, की भल्याभल्यांनी कानाच्या पाळ्या पकडल्या. युद्धपटांची हॉलिवूडमध्ये कमतरता नाही; पण असा युद्धपट पुन्हा होणं नाही, हे मत बहुतेकांना मान्य झालं. नोलानचा "डंकर्क' कुठलीही प्रतिक्रिया देत नाही. श्रेय-अपश्रेयाचा गल्लाभरू खेळ करत नाही.

नोलानचं मानस वेगळ्या मुशीतून घडलेलं आहे. त्याला दिसणारा "बॅटमॅन' वेगळाच असतो. "इन्सेप्शन', "इंटरस्टेलार', "प्रेस्टिज' सारखे वेगळ्याच धाटणीचे सिनेमे नोलानच करू जाणे. हा दिग्दर्शक स्वत:च एक प्रतिभाविष्काराचं नवीन उदाहरण होऊन बसला आहे. त्याचा "डंकर्क'ही असाच थक्‍क करणारा. हा चित्रपट चुकवणं केवळ अशक्‍य.
* * *

ही घटना साधारणत: 1940 सालच्या मे महिन्यातली. अखेरच्या आठवड्यातली. डंकर्कच्या सुनसान रस्त्यांवर सहा सैनिक चालत निघाले आहेत. बहुधा घाबरलेले आहेत. कुठून आपल्या नावाची गोळी येईल, सांगता येत नाही. संपूर्ण प्रदेश शत्रूनं घेरलेला आहे. आसमंतात चिटपाखरू नाही. रस्त्यालगतच्या वस्तीमध्ये सामसूम दिसते आहे. शक्‍य तितक्‍या भराभर पावलं उचलत किनारा गाठायचा. तिथं आपलं सैन्य तिष्ठत बसलं आहे. त्यांना जाऊन मिळायचं. एकदा आपल्या लोकांत जाऊन पडलं, की जरा बरं...इतक्‍यात कुठून तरी बंदुकीची फैर झडली. निमिषार्धात ते अर्धा डझन सैनिक धुळीत लोळले. त्यातला एक टॉमी, कसाबसा धडपडत, कुुंपणं ओलांडत, गोळ्या चुकवत निघाला.

जर्मन सैन्यानं दोस्त फौजांची काहीच्या काहीच कोंडी केली होती. एक दहा मैलांची चिंचोळी किनारपट्‌टी सोडली, तर उत्तर फ्रान्समध्ये काहीही हाती उरलं नव्हतं. जर्मन रणगाडे फ्रेंच भूमीवर धडधडत होते. इथं, या भागातही ते केव्हाच पोचले असते; पण मधल्या मुलखात काही ठिकाणी मरणाचा चिखल झाल्यानं थोडे खोळंबले होते इतकंच. हरमान गोअरिंगच्या अधिपत्याखालच्या "लुफ्तवाफ'ची लढाऊ विमानं घिरट्या घालत होती. आदेश मिळाला, की लागलीच ब्रिटिश-फ्रेंच-बेल्जियमच्या असहाय सैन्यावर बॉम्बचा वर्षाव करून मामला खतम करण्यासाठी ती उत्सुक होती. युद्धाचं पारडंच फिरलं असतं. सुरवातीलाच दोस्तांचा "दी एंड' झाला असता.
कमालीच्या सायासानं टॉमीनं किनारा गाठला. हुश्‍श केलं.
* * *

पुढं अफाट समुद्र आणि तिच्यात घुसलेला एकमेव, डगमगता धक्‍का... हे एवढंच आता दोस्तांच्या फौजेकडं शिल्लक उरलं आहे.
किनाऱ्यावर आल्या आल्या टॉमीनं पहिलं समुद्राकडे पाठ करून स्वत:ला "मोकळं' केलं. गिब्सन नावाचा एक सैनिक शेजारीच आणखी एका मित्र-सैनिकाला एकटाच मूठमाती देत होता. टॉमी त्याला मदत करायला सरसावला, तेवढ्यात जर्मन स्टुका विमानांनी हल्ला करून दाणादाण उडवली. टॉमीच्या डोळ्यांदेखत सैनिकांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या.

एका जखमी सैनिकाचं स्ट्रेचर उचलून टॉमी आणि गिब्सननं धक्‍क्‍यावरल्या नौकेवर चढून पळ काढण्याचं ठरवलं; पण या बोटीत त्यांचा नंबर लागला नाही. त्यांना सांगितलं गेलं, की थांबावं लागेल. कधीपर्यंत? मरेपर्यंत!
टॉमी. गिब्सन आणि ऍलेक्‍स. तीन पराभूत सैनिक. किनाऱ्यावर दिशाहीन भटकताना त्यांना दूरवर एक गंजत पडलेली युद्धनौका दिसली. बरीचशी पाण्यात, काहीशी वाळूत अडलेली. तिघंही त्या युद्धनौकेत दडून बसले. आणखीही काही सैनिक तिथं होते; पण हा एरिया तसा धोकादायक होता. कारण तिथं जर्मनांचा ताबा होता. उंच पहाडावरून जर्मन सैनिक या निकामी नौकेचा नेमबाजीच्या सरावासाठी लक्ष्य म्हणून उपयोग करत होते. बंदुकीच्या गोळ्यांनी नौकेला आणखी भोकं पडली, आणि समुद्राचं पाणी आत येऊ लागलं. त्या संकटाच्या प्रसंगात गिब्सनचा कावा सगळ्यांना कळला. गिब्सन लेकाचा फ्रेंच सैनिक निघाला. एका मृत ब्रिटिश सैनिकाचा गणवेष चोरून त्याला पहिल्या बोटीतून पळ काढायचा होता. त्याला तिथंच मरायला सोडून टॉमी आणि अन्य सैनिक पळाले. ब्रिटिश नौदलाचे कमांडंट बोल्टन यांना एव्हाना कळून चुकलं होतं, की इथून सुरक्षित परत जाणं अशक्‍य आहे... केवळ अशक्‍य; पण तेव्हाच ब्रिटनच्या किनाऱ्यावरचे काही होडीवाले आपापल्या चिमुकल्या होड्या पाण्यात लोटत होते.
* * *

स्थानिकांच्या छोट्यामोठ्या बोटींना मोहिमेत सामील करून घेण्यासाठी ब्रिटिश नौदल धडपडत होतं. त्यांच्या हाकेला "ओ' देऊन डॉसन नावाच्या एका नौकामालकानं आपली छोटीशी बोट काढली. बोटीचं नाव होतं- मूनस्टोन. सोबतीला आपलं शहाणं पोरगं, पीटरला हाताशी घेतलं. पीटरचा मित्र होता एक- जॉर्ज नावाचा. थोडा खुळचट होता; पण चांगला होता. "मीसुद्धा येतो,' असा तो हटून बसला.
""तू नको बे...घरी जा. ही काही सहल नाहीये..,'' डॉसननं त्याला झटकलं. पीटरला काही बोलता येईना.
""...पण माझा काहीतरी उपयोग होईलच ना... तुम्हाला, देशाला!'' जॉर्ज म्हणाला.
शेवटी त्यालाही बोटीवर घेऊन डॉसननं डंकर्कच्या दिशेनं बोट हाकारली. वर आभाळात काही ढग तरंगत होते. खाली निळाशार समुद्र हेलकावत होता. दूरवर डॉसनला एक ठिपका तरंगताना दिसला. त्यानं बोट त्या दिशेनं नेली. लांबूनच एक चक्‍कर काटली. एक बुडालेल्या अवस्थेतली ती ब्रिटिश नौका होती. निरखून पाहिल्यावर त्याला दिसलं, की एक सैनिकही तिथं दिसतोय. मेलेला असावा. त्यानं बोट आणखी जवळ नेली. सैनिक अर्धमेल्या अवस्थेत होता.
डॉसननं त्याला बोटीवर घेतलं. सैनिक काहीही बोलत नव्हता. जखमी तर होताच. जॉर्जनं त्याला चहा पाजायचा प्रयत्न केला. तो त्यानं उडवून लावला. शेवटी तर त्याची शुद्ध हरपली... त्याला जाग आली, तेव्हा लक्षात आलं, की डॉसन डंकर्ककडेच निघाला आहे. च्यामारी! त्या मरणाच्या खाईत स्वत:हून निघालाय! सैनिकानं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातापायीत जॉर्ज दाणकन्‌ भेलकांडला आणि खाली पडला. पीटरनं त्याची शुश्रूषा केली; पण जॉर्जला शुद्ध आल्यावर कळून चुकलं, की आपल्याला काहीही दिसत नाहीये... जॉर्ज आंधळा झाला होता.
परत फिरण्यात आता काही हशील नव्हतं. डॉसन खूपच पुढे आला होता. पुढे त्याला आणखी एका ब्रिटिश विमानाचे अवशेष दिसले. त्याच्या कॉकपीटमध्ये शुद्ध हरपलेला एक पायलटही दिसला. डॉसननं त्यालाही उचललं...
* * *

काही तासांपूर्वी :
ब्रिटिश नौदलाची तीन स्पिटफायर विमानं तेवढी डंकर्कमध्ये अडकलेल्या सैनिकांचा बचाव करायच्या स्थितीत होती. एक स्क्‍वाड्रन लीडर, पायलट फॅरिअर आणि आणखी एक पायलट कॉलिन्स. तिघांची तीन भंगार विमानं. दूरवर एक जर्मन विमान दिसू लागलं. एमई 109 जातीचं असावं. स्क्‍वाड्रन लीडरनं त्या विमानाच्या दिशेनं झेप घेतली; पण ते जर्मन विमान एकटं नव्हतं. त्याच्या पाठोपाठ रोंरावत आलेल्या दुसऱ्याच शत्रूविमानानं स्क्‍वाड्रन लीडरचं स्पिटफायर विमान हवेतच उडवलं. फॅरिअर आणि कॉलिन्स गोंधळून घिरट्या घालत राहिले.
कॉलिन्सच्या विमानाच्या शेपटीलाही आग लागली. भेलकांडत खाली समुद्रात कॉलिन्सचं विमान कोसळताना फॅरिअरनं पाहिलं होतं. कॉलिन्सनं इजेक्‍ट होण्याचा प्रयत्न केला होता; पण नाही जमलं. थाडकन तो समुद्रात कोसळला. कॉकपिटमध्ये पाणी शिरताना तेवढं त्याला जाणवलं. त्याची शुद्ध हरपली.
जगण्याचं पूर्ण भान आलं, तेव्हा कॉलिन्सला कळलं की तो मूनस्टोन नावाच्या छोट्या बोटीवर आहे.
* * *

काही तासांपूर्वी :
विशाल आभाळात फॅरिअर एकटाच उरला होता. समोरच्या नियंत्रणाकडे त्यानं नजर टाकली. इंधन संपत आलं असावं. काटा हलत नव्हता; पण इंधनाच्या शेवटच्या थेंबापर्यंत उडायचं आणि लढायचं त्यानं ठरवलं. खाली समुद्रावर छोट्याछोट्या होड्या डंकर्कच्या एकमेव धक्‍क्‍याशी गर्दी करताना दिसत होत्या. त्यातल्याच एका होडीत टॉमी आणि ऍलेक्‍स चढले होते. अर्थात थोडं पुढे येताक्षणी जर्मनांनी समुद्रात पेरलेले पाणसुरुंग आणि वरून आग ओकणारी जर्मन बॉम्बर विमानं यांच्या फुफाट्यात ते अडकले. फॅरिअरनं त्या धुमश्‍चक्रीत आपलं विमान घातलं.
बॉम्बनं विदीर्ण झालेल्या होडीतून दिशाहीन पोहत निघालेल्या टॉमी आणि ऍलेक्‍सला अखेर डॉसननंच आपल्या बोटीवर ओढून घेतलं. हा एक विलक्षण योगायोग होता. आकाश, समुद्र, जमिनीवर घडलेल्या तीन कहाण्या डॉसनच्या बोटीवर एकवटल्या होत्या. कहाण्या तीन. शेवट एक.
....फॅरिअरनं शत्रूची दोन डॉर्निअर विमानं वेधून डंकर्कचा धक्‍का सुरक्षित ठेवला, आणि मगच किनाऱ्यावरच्या वाळूवर क्रॅश लॅंडिंग केलं. विमानाला स्वहस्ते आग लावून तो शत्रूच्या स्वाधीन झाला.
* * *

दरम्यान, डॉसनच्या बोटीवर आंधळा झालेला जॉर्ज देवाघरी गेला होता. जिवाच्या करारानं लढणारा कॉलिन्स, जखमी सैनिक, टॉमी आणि ऍलेक्‍स हे सारे त्याच देवदूताच्या बोटीवरून मायदेशी परतले. युद्ध चर्चिलनं संपवलं हे खरं; पण ते तडीला नेलं होतं या चिवट सैनिकांनी. कुठलाही संबंध नसलेल्या डॉसननं... असे कितीतरी डॉसन त्यावेळी समुद्रात आपले सैनिक वाचवत होते.
"डंकर्क'ची ही कहाणी बघताना चर्चिलचा विसर पडतो. हिटलर फार थिटा वाटायला लागतो. दुसऱ्या महायुद्धातल्या शौर्याला चिकटलेली कारुण्याची झालर तेवढी डोळ्यांसमोर थरथरत राहाते. हा अनुभव विषण्ण करणारा आहे.
* * *

क्रिस्तोफर नोलाननं डंकर्कची ही कहाणी स्वत:च लिहिली. पटकथाही स्वत:च तयार केली. संवाद अगदीच तोकडे आहेत, तेही त्यानंच लिहिले. दिग्दर्शनही स्वत:च केलं. सबकुछ नोलान असा हा चित्रपट जगातील सर्वोत्कृष्ट युद्धपटांपैकी एक आहे, यात वाद नाही. मार्क रायलन्सनं यात साकारलेला डॉसन केवळ वेड लावणारा आहे. या गुणी नटानं "ब्रिज ऑफ स्पाइज' या स्टिव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटात रशियन गुप्तहेर असा काही पेश केला होता, की स्तिमित व्हावं. केनेथ ब्रेनाव या नावाजलेल्या दिग्दर्शक-नटानं साकारलेला कमांडंट बोल्टन अफलातून आहे; पण ह्या चित्रपटात ठायी ठायी दिसतो तो दिग्दर्शक नोलानच.

सायस्ली फॉक्‍स स्मिथ (सीएफएस) यांच्या कवितेसारखीच त्याची मांडणी आहे. फक्‍त त्यातलं देशप्रेम थोडं कमी करायचं, आणि वास्तविक जगातल्या कलहाचा रंग अधिक गडद करायचा. बाकी म्हणाल, तर "डंकर्क' हा एक चित्रमय पोवाडाच आहे.
महाभारतात पार्थपुत्र अभिमन्यूला कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करता आला. सुभद्रेच्या उदरात असताना तो तेवढी विद्या तो शिकला होता म्हणे; पण सभोवताली शत्रूचं रिंगण असताना त्याचा भेद करून बाहेर पडण्याचं कौशल्य मात्र त्याच्याठायी नव्हतं. कारण त्याचं रहस्य त्याला उकललंच नव्हतं कधी... कोवळा अभिमन्यू युद्धाच्या तेराव्या दिवशी धारातीर्थी पडला. एक सर्वसामान्य, नि:शस्त्र माणुसकीचा हात त्याला चक्रव्यूहातून बाहेर काढू शकला असता का? शक्‍य आहे, शक्‍य आहे...तीन लाखांची फौज सर्वसामान्य खलाशी आणि नाखवे वाचवू शकतात तर एकटा अभिमन्यू का नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT