Nagraj Manjule and Snehal Chaudhary
Nagraj Manjule and Snehal Chaudhary Sakal
सप्तरंग

‘तिच्या’ भविष्यासाठीचं पाऊल...!

संदीप काळे sandip.kale@esakal.com

हातामध्ये रंगीबेरंगी फलक घेऊन घोषणा देणारे रॅलीतले सर्वजण एकदम उत्साहात होते.

मी बुलडाण्याकडे निघालो होतो. वातावरणात उकाडा होता. वर आकाशात पाहिलं तर ढगांची गर्दी होती. आजूबाजूच्या शेतांमध्ये त्या उकाड्यातही शेतकरी मशागतीची कामं करत होते. पावसाच्या सरी बरसतील कधी आणि बी कधी टाकावं, असं त्या शेतकऱ्यांना झालं होतं. आम्ही प्रवासाचा पुढचा टप्पा गाठत असताना रस्त्यामध्ये एका छोट्याशा गावात एक रॅली निघाली होती.

हातामध्ये रंगीबेरंगी फलक घेऊन घोषणा देणारे रॅलीतले सर्वजण एकदम उत्साहात होते. ‘आदर करा, आदर करा, स्त्री-आरोग्याचा आदर करा’, ‘भारतमाता की जय’, ‘ पुढे चला रे पुढे चला, गांधीजी की जय बोला’ अशा घोषणा देणाऱ्या मुली आघाडीवर होत्या. त्या रॅलीमध्ये एक ‘साडी’ होती. त्या साडीला कुंकू लावत, तिच्या पाया पडत महिला तिला पूजत होत्या. मी गाडी थांबवली. बाजूला एक आजोबा होते, त्यांना विचारलं, ‘आज गावात काही कार्यक्रम आहे का?’ आजोबा चिडून मला म्हणाले, ‘‘यांना काम-धंदे नाहीत, वेड्यासारखं काहीही बोलत सुटलेत. गावातली चार डोकी पेटवायची आणि काहीही करायचं.’ मी आजोबांना पुन्हा विचारलं, ‘काय झालं नेमकं?’ ‘अहो, ज्या बाईला शिवायचं नाही, ज्या बाईला कावळा शिवला, त्या बाईला मंदिरात जाऊ द्या म्हणे, याला काही अर्थ आहे का?’ मी आजोबांशी बराच वेळ बोलल्यावर त्यांना काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आलं. मी त्या गावातल्या मंदिरात गेलो, मंदिरातून शाळेत गेलो. तिथल्या लोकांशी बोललो, काही मुलांशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं, ही रॅली काय आहे, त्या आजोबांचा राग का आहे?

मी ज्या गावात उभा होतो त्या गावाचं नाव ‘कोलवड’. गावात महिला-मुलींच्या आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं. त्याच गावातल्या काही डॉक्टर मुली, मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या मुलींनी या मुली आणि महिलांच्या आजारपणाचा शोध घेतला. त्या मुलींच्या लक्षात आलं, मासिक पाळीबद्दल खूप गैरसमज आहेत, त्यातून या महिलांमध्ये आजाराचं प्रमाण वाढतं. काही ठिकाणी मृत्यूही येतो. त्या डॉक्टर मुलींनी महिलांच्या आरोग्यावर उत्तम काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा शोध घेतला. त्या माध्यमातून या गावात जनजागृतीचं काम केलं.

केवळ जनजागृती केली नाही, तर सर्व साधनं गरजूंना मोफत दिली. त्या मुलींचं काम पाहून आपली युवा पिढी इतकी जागरूक आहे, याचं मला आश्चर्य वाटलं. ती रॅली गावातून परतली. अमित शिंदे यांनी माझ्याशी सर्वांची ओळख करून दिली. ज्या संस्थेने पुढाकार घेऊन हे काम उभं केलं, त्या ‘क्षितिज फाउंडेशन’च्या स्नेहल चौधरी-कदम (७७७४०१००६३) यांची आणि माझी ओळख झाली.

डॉ. गायत्री सावजी, सुभाष पाटील, प्रेम इंगळे असे अनेक जण या कामात सक्रिय आहेत. मी ज्या शाळेत होतो, तिथं तीनशे मुली होत्या. त्या मुलींमध्ये मागच्या आठ दिवसांत मासिक पाळी, त्या काळात घ्यायची काळजी याविषयी पूर्ण जागृती झाली, असं त्या मुली सांगत होत्या. त्या शाळेतल्या मुलींशी बोलणं झाल्यावर गावातल्या काही महिला आणि मुलींशी स्नेहल बोलत होत्या आणि मी ते सारं ऐकत होतो. सर्वांचं बोलून झाल्यावर त्याच शाळेत मी आणि स्नेहल दोघे बसलो. स्नेहल यांनी मला त्यांच्या कामाचा आवाका सांगितला, त्यांनी उभं केलेलं काम सांगितलं. ते सर्व ऐकून मी एकदम थक्क झालो. राज्यातल्या कानाकोपऱ्यांत जाऊन स्नेहल यांनी हजारो महिलांचे, मुलींचे प्राण वाचवलेत.

स्नेहल चौधरी-कदम या वाशीममधल्या सेलूबाजार इथल्या. त्या लातूरला शिकायला होत्या, तेव्हा त्या अनेक सेवाभावी चळवळींत, संस्थांमध्ये काम करायच्या. एका अनाथ आश्रमामध्ये त्या एकदा गेल्या होत्या, तेव्हा एका मुलीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. ‘‘त्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. होणारा रक्तस्राव पाहून ती मुलगी ‘मला ब्लडकॅन्सर झाला’ असं आतून ओरडत होती. सायंकाळी आम्ही खिडकीतून तिला समजावलं, तेव्हा तिने दरवाजा उघडला. आम्ही त्या दिवशी तिथं नसतो, तर तिने नक्कीच जिवाचं बरं-वाईट केलं असतं,’’ स्नेहल सांगत होत्या, ‘‘ते घडलं केवळ योग्य ती माहिती नसल्यामुळे. मी जेव्हा राज्यातल्या अशा छोट्या-छोट्या घटनांचं संशोधन केलं, तेव्हा ज्या महिला, मुली मासिक पाळीबाबत अनभिज्ञ होत्या, त्यांचं प्रमाण खूप मोठं होतं. यातून वाढणारे आजार आणि मृत्यूचं प्रमाणही खूप मोठं होतं.

मी माझं शिक्षण पूर्ण केलं. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. आई-वडिलांनी विचारलं, ‘पुढं कुठल्या देशात, कुठल्या कंपनीमध्ये काम करणार आहेस?’ तेव्हा मी आई-वडिलांना सांगितलं, ‘मला मासिक पाळीच्या समस्येवर महिलांसाठी पूर्णवेळ काम करायचंय.’ त्यांना धक्का बसला असावा. मी ‘क्षितिज’ संस्था उभी केली. या संस्थेच्या माध्यमातून मागच्या सात वर्षांमध्ये राज्यभरात काम केलं.

आता जेव्हा माझं काम माझे आई-वडील पाहतात, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. केवळ ‘मासिक पाळी’ या विषयावरच नाही, तर राज्यामध्ये प्रज्ञाचक्षू, मूकबधिर, दिव्यांग, मतिमंद असणाऱ्या मुलांसाठीही अनेक उपक्रम ‘क्षितिज’च्या माध्यमातून आम्ही हाती घेतले. आर्थिक अडचणी आहेत; पण तरीही आमची उभी राहण्यासाठीची धडपड कायम आहे.’’ ग्रामीण भागातल्या दहा शाळांपैकी तीन शाळांमध्येच योग्य त्या टॉयलेटची व्यवस्था आहे. सायकलने शाळेपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मुली, दिवसभर शेतामध्ये काम करणाऱ्या महिला या सॅनिटरी पॅड विकत घेऊच शकत नाहीत. अशा अनेक महिलांच्या कथा स्नेहल यांच्याकडे आहेत. ‘‘आम्ही पुणे परिसरात एका अंगणवाडीत मासिक पाळीविषयी बोललो, तर तिथल्या आजीबाईंनी अंगणवाडीच्या बाजूचं मंदिर धुऊन काढलं, अशी मानसिकता अजूनही आहे. आम्हाला अनेक ठिकाणी शिव्याशाप मिळतात. उच्चशिक्षित मुलीही मासिक पाळीच्या अनेक अंधश्रद्धांना बळी पडल्या आहेत,’’ स्नेहल सांगतात.

स्नेहल यांनी बनवलेले रिपोर्ट, जे शासनाला सादर करण्यात आलेले आहेत, त्या माध्यमातून सरकार महिलांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या व्याधींवर सक्रिय झालं आहे. स्नेहल यांचे यजमान सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांची बदली जिथं होते, तिथं त्यांचं नव्याने ऑफिस सुरू होतं. मला बुलडाणा इथं जायचं होतं आणि स्नेहल यांनाही बुलडाणा इथंच जायचं होतं. आम्ही दोघे जण एकाच गाडीमध्ये बसलो. जाताना अनेक विषय चर्चिले गेले. काही अंतरावर गाडी थांबली. स्नेहल म्हणाल्या, ‘‘चला, आपण काही महिलांना भेटू या.’’ तिथं असणाऱ्या महिला स्नेहल यांची वाट बघत थांबल्या होत्या. सोबत असणारे पॅडचे बॉक्स स्नेहल त्या महिलांना देत म्हणाल्या, ‘‘मावशी, आता तब्येत कशी आहे?’’ त्या मावशी म्हणाल्या, ‘‘बरी आहे बाई..!’’ आमच्या बोलण्यामध्ये पुन्हा त्या गावातील महिलांच्या आरोग्याचा विषय पुढे आला. छोट्या-छोट्या कारणांवरून स्त्रियांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या जातात, त्याचं मुख्य कारण मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांनी केलेलं दुर्लक्ष, त्यातून झालेले आजार हे असल्याचं अनेक वेळा पुढे आलं आहे. यातून अनेक महिला, मुली जिवानिशी कशा गेल्या याचं उदाहरण स्नेहल मला सांगत होत्या.

बुलडाण्यात जाऊन स्नेहल यांच्या घरासमोर आमची गाडी येऊन थांबली. पत्रकार मित्र राजेंद्र काळे माझी वाट बघत थांबले होते. स्नेहल यांनी त्यांचे यजमान सचिन कदम यांच्याशी माझी ओळख करून दिली. स्नेहल यांनी उभं केलेलं काम, त्याचे अल्बम, वृत्तपत्रीय कात्रणं, त्यांनी सरकारला दिलेले प्रोजेक्ट, अनेक महिला-मुलींचे जीव वाचवण्याचे प्रसंग त्या कागदपत्र, फोटोंवरून मला दिसत होते.

एक शिक्षित असलेली मुलगी, ठरवलं तर इथल्या अनेक मुली आणि महिलांच्या आरोग्यासाठी खूप मोठं योगदान देऊ शकते, हजारोंचे प्राण वाचवू शकते, हे स्नेहल यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलं.

मी स्नेहल यांच्याकडून परत निघालो. निघताना माझ्या मनात खूप प्रश्न होते. आपलं राज्य स्त्री-आरोग्याबाबत किती मागे आहे, त्यांच्या आरोग्याची आपण काहीच काळजी घेत नाही. स्नेहल यांच्यासारख्या महिला, त्यांच्या ‘क्षितिज’सारख्या संस्था, स्त्रियांच्या आरोग्यावर लढणाऱ्या त्या प्रत्येकीला, त्या संस्थेला आपण मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, बरोबर ना..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT