marathi poet gopinath ganesh talvalkar esakal
सप्तरंग

रानपांखरा आणि काही कणिका!

- डॉ. नीरज देव

भक्तीमार्गी असलेल्या गोपीनाथांनी आशियातील धर्मदीप हा सर्व धर्मांचा यथातथ्य परिचय करणारा ग्रंथ लिहिला. बुद्धायन हे बुद्धावरचे खंडकाव्य लिहिले; तर ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेल्या या कवीने ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हा रसग्रहणात्मक ग्रंथ लिहिला.

नंदिता, छायाप्रकाश, आकाशमंदिर अशा कादंबऱ्या लिहिल्या. मूलतः बालकाव्य नि बालसाहित्यात रमणाऱ्या या कवीने सहज सुंदर अशा निसर्गकविता, प्रेमकविताही लिहिल्या. कवीचे साहित्य क्षेत्रातील नाव बालकविता नि बालसाहित्यामुळे गाजलेले आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet gopinath ganesh talvalkar nashik)

गोपीनाथ गणेश तळवलकर अर्थात कवी गोपीनाथ (१९०७ ते २०००) यांचा जन्म मध्य प्रदेशातील मांडला येथील. कवीला मराठीचा परिचय तसा पुण्याला आल्यावर वयाच्या पाच-सहाव्या वर्षी झाला. कवीचे शिक्षण पुणे व डोंबिवलीत झाले.

एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, तारकुंडे हे सारे त्यांचे वर्गमित्र होते. घरातील परिस्थितीमुळे त्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्याचमुळे काही काळ पाचोरा, जळगाव येथे शिक्षकाची नोकरी करावी लागली.

पुढे पुण्यातील आनंद मासिकाचे संस्थापक-संपादक वासुदेव गोविंद आपटे यांनी त्यांना मदतनीस म्हणून बोलाविले. तळवलकरांनी सुमारे ३५ वर्षे आनंद मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. क्वचितच कोणी एखाद्या नियतकालिकाचे संपादकत्व इतकी वर्षे सांभाळले असेल.

तत्कालीनांना हे मजेदार वाटत होते, म्हणून कॉम्रेड श्रीपाद डांगे एकदा तळवलकरांना उद्देशून म्हणाले होते, ‘गोपीनाथ, तुम्ही आनंद आणि रोमंटीझम सोडत नाही असे दिसते’. आचार्य अत्रे यावर कोटी करताना म्हणायचे, ‘गोपीनाथ सदा ‘आनंदा’त असतात’.

कोणी काही म्हणो, गोपीनाथांनी ‘आनंद’चे संपादकत्व व्रत म्हणूनच चालविले. कवीचे एक भाऊ शरद तळवलकर मराठीत नट म्हणून सुविख्यात होते; तर पुतणे गोविंद तळवलकर महाराष्ट्र टाइम्सचे दीर्घकाळ संपादक होते. म्हणजेच कवीचे घराणे कलावंत नि साहित्यिकाने पूर्ण होते, त्यात कवी अग्रभागी होते.

भक्तिमार्गी असलेल्या गोपीनाथांनी आशियातील धर्मदीप हा सर्वधर्मांचा यथातथ्य परिचय करणारा ग्रंथ लिहिला. बुद्धयन हे बुद्धावरचे खंडकाव्य लिहिले; तर ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेल्या या कवीने ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हा रसग्रहणात्मक ग्रंथ लिहिला.

नंदिता, छायाप्रकाश, आकाशमंदिर अशा कादंबऱ्या लिहिल्या. मूलतः बालकाव्य नि बालसाहित्यात रमणाऱ्या या कवीने सहज सुंदर अशा निसर्गकविता, प्रेमकविताही लिहिल्या. कवीचे साहित्य क्षेत्रातील नाव बालकविता नि बालसाहित्यामुळे गाजलेले आहे.

‘रायबा’ ही कवीची अत्यंत प्रसिद्ध रचना आहे. तीत शहरात शिकायला गेलेल्या मुलाविषयी त्याचे वडील काय-काय कल्पना करतात, नि त्यांचा जीव त्याच्यासाठी कसा तळमळत असतो, याचे सहज, सुबक नि सरळ वर्णन केलेले आहे. मुलाविषयी वडिलांच्या मनातील विचार चित्रीत करताना कवी लिहितो,

‘लई गुणाचा पांडू माझा मन लावी लिहिण्यात

खेड्यावरती आला नाही आठ-दहा दिवसांत’

अभ्यासात मग्न असल्याने मुलगा आठ-दहा दिवसांत गावी येऊ शकला नाही, या विचारात त्याचे वडील रायबा कामधंदा सोडून, त्याच्यासाठी जेवण घेऊन शहरात जातात.

केवळ एवढेच कथानक असलेली ही कविता त्यातील वास्तविकतेला सहज सुंदर काव्यरूप चढविल्याने विलोभनीय झालेली आहे; तर ‘बाळ जातो दूर देशा’ या कवितेत गावी निघालेल्या मुलाच्या विरहाने नि काळजीने व्याकूळ झालेल्या आईचे विचारचित्र रेखाटले आहे,

‘बाळ जातो दूर देशा मन गेलें वेडावून ।

आज सकाळपासून ।।

हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी ।

डोळ्यांचे न खळे पाणी ।।’

यात वर्णिलेली आईची मनोदशा कवीने हुबेहूब चितारली आहे. मुलगा गावाला निघणार म्हणून तिला काहीच सुधरत नाही. हे करू की ते करू, त्याच्यासोबत काय-काय देऊ, अशा एक ना अनेक विचारांनी ती गोंधळून गेलीय.

शेवटी ती त्याला आठवणीने पत्र पाठवायची आठवण देते. मोबाईल नि माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तिची भोळी आस कशी कळणार; पण त्यातील काळजीचा सूर सुज्ञास चटकन ध्यानात येईल नि ‘घार उडते आकाशी । लक्ष तिचे पिलापाशी’ हे तिचे उद्‌गार मनाला भावून जातील.

कवीने टांका हा जपानी काव्यप्रकार मराठीत आणला. त्यात एखादी भावना, कल्पना किंवा विचार मुख्य असतो आणि काव्यार्थ रूपकात्मक भाषेत सुचविलेला असतो.

यात पाच चरण असून, पहिले नि शेवटचे दोन सयमक असतात. या जपानी टांक्यास कणिका असे मराठी नाव मिळाले. दोन वृत्ती या कणिकेत कवी सांगतो,

‘तरुवरुनी पडलें पिकलेलें फळ खालीं

तों रमे शोधनीं शास्त्रज्ञाची मती

परि सहृदय कोणी वदे व्यथित होउनी

येईल काय हें फळ फिरुनी कवी

तुटलेली प्रीती येईल का सांधतां?’

या पाच ओळींच्या कणिकेत एका क्षुल्लक घटनेतून दोन वृत्ती दोन विशाल अर्थ काढताना सापडतात. फळ खाली पडताना पाहून शास्त्रज्ञ त्याची कारणमीमांसा शोधू लागला; तर कवीला त्यात हरवलेली प्रीती पडताना दिसली.

ती पुन्हा सांधता येईल का? हा प्रश्न त्याला सतावू लागला. शास्त्रज्ञ विश्लेषण, तर कवी संश्लेषण करण्याची वृत्ती धारण करतात. त्याचेच दर्शन या कणिकेत कवी दाखवितो; तर सागराचा रत्नशोध या कणिकेत तो सांगतो,

‘काढिलीं चतुर्दश रत्नें जलधींतुनी

खवळला सारखा तो तेव्हांपासुनी

शोधाया त्यांते पुनःपुन्हा ये वरी

ये परत किनारा सोडुन तूं प्रियतमे

नेईल कदाचित तुलाच तो संभ्रमे!’

समुद्रमंथनाच्यावेळी चौदा रत्ने काढण्यात आली होती, याचा संदर्भ घेत कवी सांगतो, की ती चौदा रत्ने काढल्याने समुद्र खवळला व आपल्या हरविलेल्या रत्नांना शोधण्यासाठी लाटा बनून तो वारंवार पृथ्वीकडे झेपावू लागला.

तितक्यात त्याला स्मरते त्याची प्रियतमा. ती किनाऱ्यावर गेली. तिला पाहून आपले हरवलेले रत्न ते हेच, हा संभ्रम त्याला पडेल नि तो प्रियतमेलाच खेचून नेईल, या संभ्रमातून तो प्रियतमेला सांगतो, ‘तू किनाऱ्यावरून चटकन परत फिर’ या सर्वांगसुंदर कणिकेतील वैशिष्ट्य म्हणजे कवीचा संभ्रम कवी समुद्रावर आरोप करतोय. त्यामुळे पाच ओळींची ही छोटीशी कणिका एखाद्या दीर्घकाव्याचा आनंद देऊन जाते.

‘रानपांखरा’ या कवितेत कवी रानपाखराला उद्देशून विचारतो, की कतू रोज सकाळी मला भेटायला माझ्या घरी येतोस. गोड-गोड गाणे गाऊन मला उठवतोस. तुझे शरीर निळसर आहे. त्यावर ठिबक्यांची झालर टाकलेली आहे. तुझे डोळे तर रत्नासारखे चमकदार नि तजेलदार आहेत. तुला पाहून मला प्रश्न पडतो,

‘पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला

अफाट आभाळांतुन कैसें उडतां येतें तुला?’

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोणाही चाणाक्ष मुलाच्या मनात येणारा प्रश्नच कवीला येथे पडतो. त्याच्या लक्षात येते, की सूर्य उगवताच रानपाखरू येते नि तो मावळताच तेही अंतर्धान पावते.

सूर्यही त्या दूरच्या डोंगरापलीकडून येतो अन् ते पाखरूही त्याच डोंगरापलीकडून येते नि सूर्य दूर कोठेतरी जाताच तेही जाते, यातूनच त्याला प्रश्न पडतो,

सूर्यासंगें जासी येसी सदाकदा कां बरें

शेजारीं आहेत काय रे परस्परांचीं घरें?

ज्याअर्थी तुम्ही दोघे सोबत-सोबत येतात त्याअर्थी तुम्हा दोघांची घरे शेजारी-शेजारीच असावीत का? येथे कवी करीत असलेली कल्पना बालकवीच्या विलक्षण प्रतिभेचाच पुनःप्रत्यय वाचकाला करून देते. कवीला वाटते, ते रानपाखरू छोटेसे आहे.

त्याला इतक्या दूर एकट्याला कसे बरे धाडावे? या विचाराने त्याची आई त्याला सूर्यासोबत धाडत असावी, ही कल्पना व्यक्त करताना कवी त्याला पुसतो,

‘देह एवढा, अपाय कोणी करील तुजला इथे,

म्हणून का तुज रवीबरोबर माय तुझी धाडिते?’

ही निरागस कल्पना कुणीतरी बालकवीच करू जाणे. त्याच तंद्रीत तो त्याला विचारतो, ‘घरी गेल्यावर तू तुझ्या आईला माझ्याविषयी, माझ्या छानदार बंगल्याविषयी सांगतोस की नाही? बहुधा सांगत असावास, ‘हे रानपाखरू रोजच आपल्या घरी येते.

मग एकदा तरी त्याने आपल्याला त्याच्या घरी न्यायला हवे की नाही? पण हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्याच्या लक्षात नाही आले तरी आपण त्याच्या लक्षात आणून द्यायला हवे. या मिषाने तो त्याला सांगतो,

‘तू मला तुझ्या पंखावर बसवून तुझ्या घरी घेऊन चल.

मलाही तुझे घर पाहू दे. तेथे

माय तुझी येईल, सूर्यही भेटेल;

भेटायला मजा येईल सख्या पांखरा, नेइं एकदा मला’

तेथे तुझी आई अन तुझ्या घराशेजारी राहणारा सूर्यही भेटायला येईल. किती मजा येईल, असे म्हणत कवी पुन्हा एकदा त्याला त्याच्या घरी नेण्यासाठी गळ घालीत कविता संपवितो. कवीची ही कविता सरस उतरली असून, त्याच्या काव्यप्रतिभेची साक्ष द्यायला पुरेशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Sends Notice to South Indian Stars: साउथ इंडियन फिल्मस्टार विजय देवरकोंडा, राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज 'ED'च्या रडारावर!

Prithvi Shaw: भारताच्या क्रिकेटरनं तब्बल १७ किलो वजन केलं कमी! पीटरसन म्हणतोय, 'पृथ्वी शॉला कोणीतरी हे दाखवा'

Manikrao Kokate Rummy Video: कोकाटेंचा 'पत्ते', तटकरेंच्या अंगावर, चव्हाणांचा राडा, दादांना गोत्यात आणणार?

Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; मृतदेह टाकला उसाच्या शेतात, तोंडावर वर्मी घाव, मुलगा आहे सैन्य दलात

ट्रम्प यांच्या दाव्यावरून गोंधळ, १ विधेयक मंजूर, न्यायमूर्तींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव अन्...; संसदेत पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT