Education
Education sakal
सप्तरंग

‘वळण’दार ‘श्री’गणेशा

अवतरण टीम

शालेय जीवनात आमच्या काळात दगडी पाट्या होत्या. त्या गेल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस, पत्रा आणि प्लास्टिक आलं. तेही गेलं. पेन्सिलची जागा पेनने घेतली.

- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com

शालेय जीवनात आमच्या काळात दगडी पाट्या होत्या. त्या गेल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस, पत्रा आणि प्लास्टिक आलं. तेही गेलं. पेन्सिलची जागा पेनने घेतली. पाटीने हाताला लावलेलं वळण सुटू नये म्हणून वडिलांनी बोरू आणि शाईची बाटली आणून समोर ठेवली. बोरू व्यवस्थित तासून दौतीत थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि मग कागदावर ‘श्री’ लिहून सुरुवात करायची. बोरूने लिहिताना कागदावर एक विशिष्ट दाब द्यावा लागतो, हळूहळू चित्त एकाग्र होत जातं, जाणिवांची नाळ नकळत अक्षरांशी जोडली जाते... अक्षरं बोलायला लागतात.

मला आजही लिखाणासाठी हातात लेखणी आणि कागद लागतो. कम्प्युटरवर किंवा मोबाईल फोनवर टाईप करताना सुलभता असते; पण समाधान नसतं. मानसिक, बौद्धिक, शारीरिक सगळी स्पंदनं हातातल्या पेनच्या नीबच्या टोकातून कागदावर उमटत जातात तेव्हा प्रसववेणा सरत जाण्याचा भास होतो. शेवटचा पूर्णविरामाचा टिंब दिल्यावर जे श्रांतक्लांत वाटतं आणि हातातल्या कागदाकडे पाहताना जो तृप्तीचा नि:श्वास येतो, त्याची तुलना होऊ शकत नाही.

अर्थात हे वैयक्तिक मत आहे आणि त्याची मुळं ही फार पूर्वी काळ्याशार दगडी पाटीवर गिरवलेल्या पांढऱ्या अक्षरांत असावीत. ज्यांनी बालपणात अशा पाट्या वापरल्या आहेत, त्यांना ही गंमत कळेल. या पाट्या पडून फुटू नयेत म्हणून अतोनात काळजी घ्यावी लागे. गुरुजी पाटीवर बाराखड्या आणि आकडे काढून द्यायचे, ती गिरवायची. एकाच पाटीवर दोनतीन विषयांचे गृहपाठही केले जायचे. पाटपोट जागा करत ते लिहायचे आणि मग पाटी भिंतीला टेकवून उभी करून ठेवायची. दुसऱ्या दिवशी ती सांभाळत शाळेला नेणं ही कसरतच असायची.

डस्टर हा प्रकार तेव्हा नव्हता. आईने दिलेला एखादा फडका नाही तर फ्रॉक किंवा शर्टाच्या टोकानं पुरायचं. क्वचित एखाद्याने पाटी पुसण्यासाठी बोटं ओली करायला तोंडात घातलीच तर ‘‘गाढवा! सरस्वती आहे ना ती, तिला थुंकी लावतोस काय रे!’’ म्हणून मास्तर दणकन धपाटा घालायचे. लिहिण्यासाठी वाण्याच्या दुकानात जी पांढरीशुभ्र पेन्सिलची कांडी मिळायची, तिला ओली करून नाकाजवळ नेली की गच्च ओल्या मातीचा गंध श्वासात भरायचा. कॅल्शियमची कमी असलेली पोरं ती पेन्सिल चघळायची आणि मास्तरांचे अजूनच धपाटे खायची.

प्रतीकात्मक सरस्वती ही पाटीवर जितकी सुंदर दिसते तितकी कुठेच दिसत नाही, असं माझं मत आहे. सरस्वती पूजनाच्या दिवशी आमच्या शाळेत ‘सगळ्यात सुंदर सरस्वती’ला बक्षीस दिलं जायचं. बहुतांश वेळेला माझी ही सरस्वती चुकायचीच; सुदैवाने तिने तरीही अजून साथ सोडली नाहीय ही गोष्ट वेगळी.

आदिवासी परिक्षेत्रातली मुलंही शाळेत असल्याने कधी कधी शासनाकडून पाटीवाटपाचा कार्यक्रम व्हायचा आणि मग सगळ्यांनाच नव्या पाट्या मिळायच्या. आजच्या मुलांना ps3-ps4 वगैरे मिळाल्यावर जसा आनंद होतो, तितकाच ती पाटी हातात घेतल्यावर व्हायचा. ‘माझी पाटी तुझ्या पाटीपेक्षा कशी छान’ हे पटवण्यात पुढचे काही दिवस जायचे.

पाटीचा अजून एक उपयोग म्हणजे पाऊस आला तर पाटी सरळ डोक्यावर ठेवून घराकडे धावत सुटायचं. त्या दिवसांत गुरुजी गृहपाठही कमीच द्यायचे, कारण ‘पावसानं पाटी पुसली’ हे एकच कारण मुलांना पुरायचं. मास्तरांच्या तक्रारी वाढल्यावर मग वडील पाटी प्लास्टिकमध्ये गुंडाळून द्यायला लागले, पण तरीही ‘पाटी ओली झाली’ ही सबब अस्मादिकांनी बराच काळ वापरल्याचं स्मरतंय.

हळूहळू दगडी पाट्या गेल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस, पत्रा आणि प्लास्टिक आलं. तेही गेलं. पेन्सिलची जागा पेनने घेतली. पाटीने हाताला लावलेलं वळण सुटू नये म्हणून वडिलांनी बोरू आणि शाईची बाटली आणून समोर ठेवली. बोरू व्यवस्थित तासून दौतीत थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि मग कागदावर ‘श्री’ लिहून सुरुवात करायची. बोरूने लिहिताना कागदावर एक विशिष्ट दाब द्यावा लागतो, हळूहळू चित्त एकाग्र होत जातं, जाणिवांची नाळ नकळत अक्षरांशी जोडली जाते... अक्षरं बोलायला लागतात.

रूथ ओझेकी या अमेरिकन लेखिकेने छापील अक्षर आणि हस्ताक्षर यातला फरक फार सुंदर विशद केलाय. रूथ म्हणते, ‘छापील अक्षर म्हणजे अत्यंत वस्तुनिष्ठ, अंदाज लावण्यायोग्य असा वाचकांच्या डोळ्यांशी केलेला यांत्रिक व्यवहार असतो. याउलट हस्ताक्षर हे वाचकाच्या डोळ्यांसाठी आव्हान असतं, ते आपल्यातला गर्भित अर्थ हळुवारपणे उलगडत नेतं. शरीराच्या त्वचेइतकंच जे जवळचं, खासगी आणि जिव्हाळ्याचं वाटतं ते म्हणजे हस्ताक्षर.’ म्हणूनच लेखणीने लिहिलेल्या पत्राची सर ही कम्प्युटरच्या मेलला आणि मोबाईलच्या मेसेजला कधीही येणार नाही.

शरीराला असो वा विचारांना, वळण हे प्रयत्नपूर्वकच लावावं लागतं. एका विचारवंताच्या मते ‘हस्ताक्षर सुधारणा ही आपल्यातल्या बऱ्याच चांगल्या बदलांची सुरुवात असू शकते.’ प्रयत्न करून बघायला हरकत नाही, नाही का!

(लेखिका व्हॉईस थेरपिस्ट आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT