trekking
trekking 
टूरिझम

भटकंतीचा 'सुवर्ण त्रिकोण'

पंकज झरेकर

भटकंती - पंकज झरेकर
महाराष्ट्र, एक नवलाईने भरलेली आणि पराक्रमाने भारलेली भूमी! उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या विशाल बाहूने अथांग सागराला बांध जरी घातला असला, तरी विविधतेने नटलेल्या या भूमीत एकसमान एकजीवता ठासून भरलेली आहे. पायथ्याशी खळाळता ''उच्छल जलधी तरंग'' लेऊन माथ्याशी रौद्र पाषाणकडे मिरवणारा सह्याद्री, त्याच्या कुशीत निपजलेली विविध प्रकारची वने, तिथला अधिवास, दऱ्याखोऱ्यांतून घुमणारा वारा, लपलेली मंदिरे, किल्ले आणि काही अजब जागा... काही निसर्गानेच बहाल केलेल्या, तर काही मानवाने आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर कौशल्याची सांगड घालून निर्माण केलेल्या.

जून ते सप्टेंबर सह्याद्रीच्या डोंगरकुशीत पाऊस माहेराला येतो, उत्साहात सळसळतो. अशा दिवसांत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून आवडती गाणी लावून ड्राइव्हची मजाच औरच. रिपरिपत्या पावसातून एका लयीत चाललेली गाडी, सोबत तलत-लता-रफी खास आपल्यासाठीच गातायेत. गाडीच्या चाहुलीनं थबकून एखादं जनावरं आपल्याकडं वळून पाहतंय. शिवारांत पाऊस नाचतोय, ओढ्यांतून खेळतोय, गाडीच्या टपावर ताल धरतोय, काचेवर खिदळतोय. उघड्या खिडकीतून गालांना चोरटा स्पर्श करतोय.

सह्याद्रीच्या कातळांवर चांदीच्या घागरी कड्यांवरून उड्या घेतायत, मैदानांत लाल-तांबड्या नद्या उफाड्याने रोरावतायेत. अशा घनभरल्या दिवशी कुठेतरी पाऊस अचानक विसावतो. थंडीच्या दिवसांत आसपासच्या भवतालाने पांघरलेली धुक्याची गोधडी, त्यातून मिणमिणणारे गावकुसातले दिवे, चुलीच्या धुराने त्यातून काढलेल्या वेलांट्या, मंदिरांतून ऐकू येणारे काकड्याचे अस्पष्ट स्वर, जागेजागी पेटलेल्या शेकोट्या, भाजलेल्या हुरड्याचा दरवळ. त्यात अचानक दृष्टीस पडलेले प्राचीन मंदिर, एखादी बांधीव गढी, एखादा अजब सृष्टीचा चमत्कार. 

उन्हाळ्यात गावोगाव सुरू झालेला यात्रांचा सीझन, त्यात भेटणारे परिचित-अपरिचित चेहरे, त्यातून निरंतर पाझरणारा मराठी संस्कृतीचा झरा, वेगवेगळ्या रुढी-परंपरा, रंगणारी कुस्तीची मैदाने. यासोबत अपरिचित गावचा अजूनही पाणी राखून असलेला तलाव, त्याच्या काठाशी लावलेला तंबू, डोईवर ‘आकाश सारे, माळून तारे’, मित्रांच्या साथीने उत्तररात्रीपर्यंत रंगलेल्या गप्पा. गवत सगळे वाळून गेल्याने दिवसा ठळक दिसणारे प्राचीन अवशेष, वीरगळ, इतिहासाच्या पाऊलखुणा सारे काही आपल्या आदिम पूर्वजांचा माग काढणारे.

कोकणात समुद्राच्या साक्षीने अनुभवलेला सूर्यास्त, क्षितिजावर हेलकावणाऱ्या होड्या, बंदरावरची लगबग, वाळूत रेखलेली अक्षरं आणि केलेले किल्ले, उडणारे समुद्रपक्षी, त्यांनी टिपलेले मासे, घरगुती सुग्रास शाकाहारी आणि मांसाहारी जेवण. 

देशावर माणदेशातलं आदरातिथ्य, अस्सल पुणेरी साजूक तुपातलं जेवण, खानदेशातले वांगी रोडगे, मांडे. नाशिकची तर्रीबाज मिसळ, तिथली गुलाबी थंडी, अनेक धरणांचा शेजार, बागलाणात असलेल्या अजंठा-सातमाळ रांगेतल्या कैक किल्ल्यांचा सहवास, नगरची येसूराची आमटी, अस्सल मासवाडीचं ताट. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची आगळी खासीयत आहे.

पुणे-मुंबई-नाशिक या पट्ट्याला महाराष्ट्राचा सुवर्णत्रिकोण म्हणतात. एकमेकांपासून फारफार तर दीडदोनशे किलोमीटर दूर असलेल्या या शहरांपासून असे अनुभव मिळण्याकरिता फार दूर जावे लागत नाही. गाडीने तासा-दोनतासांत एका हटके ठिकाणी जाऊन तिथला आगळा अनुभव झोळीत बांधून त्याच दिवशी परत येऊ शकू, अशा कैक अजब जागा या त्रिकोणात आणि त्याच्या अवतीभोवती आहेत. 
येत्या काही आठवड्यांत आपण अशाच काही जागांचा परिचय करून घेऊया! आहात ना सॅक भरून तयार?

(लेखक आयटी इंजिनिअर असून, ‘भटकंती अनलिमिटेड’ हा ट्रेकिंग ग्रुप चालवतात.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT