Owl
Owl Sakal
टूरिझम

चकित करणारे ‘घबाड’

डॉ.सुधीर गायकवाड इनामदार

विदर्भातील बोर व्याघ्र प्रकल्पात वाघाचे तीन बछडे एकत्र दिसतात, अशी माहिती मिळाली आणि आम्ही थेट विदर्भ गाठला. तिथे पोहचल्यानंतर मात्र आम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे, हे कळले आणि उसने अवसान आणून जंगलभ्रमंती करताना आश्‍चर्यचकित करणारे मोठे ‘घबाड’च सापडले.

फेसबुकच्या पोस्ट कधी कधी किती दिशाभूल करणाऱ्या असतात, याचा अनुभव आम्हालाही आला. मे २०१५ मध्ये फेसबुकवर बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या बछड्यांचे फोटो सतत येत होते. आधी एक, नंतर दोन, नंतर चक्क तीन बछड्यांचे एकत्र फोटो. बछडेही खूपच छोटे व गोजिरवाणे होते. साहजिकच आम्हालाही त्यांचे फोटो टिपण्याची इच्छा झाली. अगदी लगेचच जाऊ या असे आम्ही चार मित्रांनी ठरवले. विमानाची तिकिटे पाहिली. आयत्या वेळेस ती खूपच महाग होती. ट्रेनची टू टायर तिकिटे उपलब्ध नव्हती. त्यामुळे फर्स्ट क्लासची तिकिटे काढून जाण्याचे ठरले.

बोर व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प. अतिशय सुंदर. बोर धरणाला लागूनच असलेला. त्यामुळे उन्हाळ्यातही थोडीफार हिरवळ असते. अन्यथा उन्हाळ्यात विदर्भात सर्वत्र रखरखाट असतो. केवळ १३८ चौ. किमी क्षेत्रफळ, त्यामुळे आम्ही सहा सफारी बुक केल्या. वाघ व बछडे हमखास दिसतीलच म्हणून. वर्धा जिल्ह्यातील हिंगणी तालुक्यात असलेले बोर अभयारण्य नागपूरपासून ६८ किमी अंतरावर. पोहोचायला दीड तास लागतो. मोठ्या आशेने आम्ही बोरला पोहोचलो. दुपारचे जेवण झाल्यावर जिप्सी व गाईडची वाट पाहत थांबलो असताना रिसॉर्ट परिसरातच एका बंद कूपनलिकेतून थेंब थेंब पाणी गळत होते. विदर्भातील मे महिन्यातील प्रचंड उकाड्यापासून थोडी सुटका मिळावी म्हणून मराठा सुतार, शिंजीर, रामगंगा असे विविध पक्षी तिथे साचलेल्या पाण्यात डुबक्या मारून स्वतःला ओले करून घेत होते व त्यांचे छायाचित्रण करण्यात आम्ही मग्न झालो. इतक्यातच कैलाश, आमचा गाईड आला.

जिप्सीत बसल्यावर आमचा पहिला प्रश्न, ‘दिसतायत ना रे पिल्ले?’ असे आम्ही उत्सुकतेने विचारले. त्यावर त्याने जरा चमत्कारिकपणेच आमच्याकडे पाहिले. ‘‘पिल्ले? आत्ता नाय बा पिल्ले. आत्ता वाघ नाहीयेत इथे.’’ आम्ही चक्क हादरलो. एकमेकांकडे पाहू लागलो. ज्यासाठी इतका आटा-पिटा करून आलो ते येथे नाहीत? अगदी पहिल्या सफारीच्या आधीच ज्या जंगलात वाघच नाहीत, त्या जंगलात आम्हाला सहा सफारी करायच्या आहेत आणि तेही वाघ शोधण्यासाठी... खूपच हिरमुसले झालो.

‘अरे, फेसबुकवर रोज फोटो दिसत आहेत?’

‘सर, ते फेब्रुवारीमध्ये काढलेले आहेत. तेव्हा पार्कमध्ये पाणवठ्याला पाणी होते. तेव्हा टायगर होते. आत्ता पाणी नसल्यामुळे टायगर बाहेर निघून गेले.’ त्याचे उत्तर मिळाले.

‘जाऊदे वाघ नाही तर निदान अस्वल तरी शोधू या,’ असे ठरले. जंगल मात्र सुंदर होते. मोरघार पिल्लासोबत एका उंच घरट्यावर दिसली. अस्वल मात्र दिसले नाही. पुढचे दोन दिवस विविध पक्षी दिसले. हरण, जंगली कुत्रे, ठिपकेवाले घुबड, चट्टेरी वन घुबड पहिले. अस्वल मात्र अजूनही नाही. आता शेवटची सफारी होती. कैलाश आम्हाला एका वेगळ्याच भागात घेऊन गेला. अस्वल दिसेल ही आशा होती. दीड तास फिरल्यावर एका ठिकाणी पाणी पिण्यास थांबलो आणि नजर सहज उजव्या बाजूच्या एका मोठ्या झाडाच्या ढोलीकडे गेली. केवळ पुरुषभर उंचीवर असलेल्या त्या ढोलीतून पटकन एका घुबडाच्या पिल्लाने डोकावून पाहिले व आम्हाला पाहून ते कुतूहलाने आमचे निरीक्षण करू लागले. कंठेरी शिंगळा घुबडाचे ते पिल्लू होते. इंडियन सकूप्स आऊल. आम्हीही संधी न दवडता, आलेली मरगळ झटकून पटापट छायाचित्रण करून घेतले. इतक्यात ढोलीत अजून एका पिल्लाची हालचाल जाणवली.

मात्र थोडा वेळ वाट पाहूनही ते बाहेर आले नाही व आम्हीही त्यांना त्रास होईल म्हणून तिथून निघालो. पुढे तासभर फिरूनही फारसे काही मिळाले नाही म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी आलो. पिल्ले दिसत नव्हती. सफारीची वेळ संपायला अजून अर्धा तास होता म्हणून तिथेच थोडा वेळ थांबायचे ठरले. मात्र घुबडांच्या पिल्लांची हालचाल जाणवत नव्हती. इतक्यात आमचा चालक कुजबुजला. पिल्ले दिसतायत. हो, ढोलीच्या विरुद्ध बाजूस ढोलीचे दुसरे तोंड होते व त्यातून दोन्ही पिल्ले डोकावून पाहत होती. आम्हीही योग्य ठिकाणी जिप्सी उभी करून त्यांचे छायाचित्रण सुरू केले. आपल्या आई-बाबांची वाट पाहत ती पिल्ले बाहेरच्या जगाचे निरीक्षण करत होती आणि अचानक गंमतच झाली. त्या ढोलीतून चक्क अजून एक पिल्लू डोकावून पाहू लागले. कंठेरी शिंगळा घुबडाची तीन छोटी पिल्ले आमच्या समोर आमच्या इतक्याच उंचीच्या ढोलीतून टकामका पाहत होती. मग काय विचारता. वाघ-अस्वल न दिसल्याचे आम्ही कधीच विसरलो व समोरचे ते दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त करू लागलो. वेळ संपत आल्याचेही भान राहिले नाही. आत्ता इतकी वर्षे झाली तरीही ती तीन पिल्ले अजूनही डोळ्यांसमोर दिसत आहेत. व्याघ्र प्रकल्पात फिरताना वाघांव्यतिरिक्त इतरही वन्यजीव असतात व त्यांचेही निरीक्षण तितकेच महत्त्वाचे असते याची जाणीव झाली. आमच्या दृष्टीने हे तीन घुबडांच्या पिल्लांचे घबाडच कॅमेऱ्यात बंदिस्त झाले होते.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT