विदर्भ

‘मोहा’तच दडलेय आदिवासींच्या उद्धाराचे गुपित!

सकाळ वृत्तसेवा

देवरी (जि. गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका आदिवासीबहुल क्षेत्र असून नक्षलग्रस्त आहे. बेरोजगारी, कुपोषण, उपासमार, कमी उत्पन्न, स्थलांतर या येथील मुख्य समस्या. जंगलव्याप्त भाग असल्याने निसर्गाने येथे मुक्त हस्ते उधळण करण्यास कुठलीही कमी केली नाही. मोह, पळस, हिरडा, बेहडा, आवळा, साग, साल यांसारख्या अनेक औषधी झाडांपासून विविध वस्तूंची निर्मिती करता येते. त्यातल्या त्यात आदिवासींचा ‘कल्पवृक्ष’ असलेल्या मोहाचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बहुगुणी मोहावर प्रक्रिया उद्योग ही येथील मुख्य गरज आहे. वनांमधील दुर्मीळ वनस्पतींचा उपयोग, फायदे आणि त्याचे औषधी गुणधर्म आदिवासी जाणून आहेत.

रानावनांत पायपीट करून त्यांनी जमा केलेल्या या रानमेव्याला भावच मिळत नाही. मेहनतीचेही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होते. त्यामुळे वनांवर आधारित प्रक्रिया उद्योग झाल्यास येथे उत्पादित मालाला बाजारपेठेसोबत चांगला भावही मिळेल. विशेष म्हणजे कच्चा माल येथेच उपलब्ध होत असल्याने कमी खर्चात उद्योगनिर्मिती करता येईल. शेतीतील धानाचा हंगाम संपला की स्थानिकांना रोजगारच राहात नाही. मग पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी ते शहराकडे धाव घेतात. परंतु तिकडेही त्यांचे शोषणच होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन प्रत्येकाच्या उदरभरणाशी संबंधित हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

आयुर्वेदात नमूद असलेल्या बहुतांश वनस्पती येथील जंगलात आढळतात. ज्यांची संपूर्ण माहिती आदिवासींना आहे. आदिवासी जमातीच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने आदिवासींची उन्नती होत नाही. देवरी तालुक्यातील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथे वनोत्पादनावर आधारित उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. बांबूपासून कलाकृती तयार करणे, मोहफुलांपासून औषध तयार करणे, जडीबुटीपासून औषधे, खते तयार करणे, गुरांसाठी चारा, वस्त्र, मध, डिंक, राळ आदी तयार करण्यातून मोठे उत्पन्न मिळविता येऊ शकते.

आदिवासींचा कल्पवृक्ष मोहफूल

खरिपातील धानाचा हंगाम आटोपल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांना रोजगाराचे दुसरे साधनच राहात नाही. त्यामुळे त्यांना परराज्यात स्थलांतर करावे लागते. हा तालुका बव्हंशी वनांनी व्यापलेला आहे. मोहफूल, हिरडा, बेहडा व अन्य वनोपज तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. मोहफुलांच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणून ओखळले जाते. वनोपजापासून आर्थिक सुबत्ता मिळविण्याचा आदिवासींचा प्रयत्न आहे. परंतु, प्रक्रिया उद्योगाची वानवा आहे. उद्योग उभारणीसाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीदेखील उदासीन आहेत. त्यामुळे आदिवासींना पोट भरण्यासाठी परजिल्ह्यात स्थलांतर करावेच लागते. आदिवासी समाजबांधव मोहफूल व फळांचा अन्न म्हणूनही उपयोग करतात. बैलघाणीत मोहफूल व फळाचे तेल काढतात. या तेलाचा स्‍वयंपाकासाठी उपयोगही करतात तर बियांची पेंड तयार करतात. मोहफुलांच्या बिया वाळल्यावर त्यातून तुपासारखे तेल निघते म्हणून माेहफुलाला इंग्रजीत ‘वॉटर ट्री’ असेही म्हटले जाते.

नैसर्गिक ठेवा उत्पन्नाचे मोठे साधन

रानावनात राहणाऱ्या आदिवासींसाठी मोहफूल उत्पन्नाचे मोठे साधन आहे. त्यामुळे उन्‍हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवरच होते. मोहफुलात साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी लोक मद्य बनवितात. या मद्यात ‘ब’ जीवनसत्व असते. विवाह व इतर सणाच्या दिवशी मोहफुलाचे मद्य प्राशन करणे आदिवासी समाजात पवित्र मानले जाते. कोणताही आजार झाल्यास ठाकर, कातकरी, कोटकू, गोंड, माडिया या आदिवासी जमातीतील लोक मोहफुलाच्या दारूचा उपयोग औषध म्हणून करतात. तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. इतर कोणत्याही टाॅनिकपेक्षा अशाप्रकारचे अन्न उत्तम टॉनिक आहे, असे आदिवासी समाजबांधव समजतात.

कोरोना संसर्गामुळे बेरोजगारी वाढली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे म्हटले होते. परंतु हे आश्वासन हवेत विरले. देवरीसारख्या आदिवासी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्‍त तालुक्यात मोहफुले, फळ व बेहडा, हिरडा, आवळा यांसारख्या वनोपजावर आधारित लघुउद्योग उभारले गेले तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. या क्षेत्रात अशा प्रकारचे लघुउद्योग उभारले गेले तर निश्‍चितच येथील नागरिक दुसऱ्या शहरात धाव घेणार नाही.
- सहसराम कोरोटे, आमदार, देवरी विधानसभा मतदारसंघ
या क्षेत्रातील आदिवासी, गैरआदिवासी, शेतकरी, शेतमजूर गोरगरीब लोक वनोपज गोळा करून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात. परंतु, या उत्पन्नाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. देवरी एमआयडीसी किंवा ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग स्‍थापन केल्यास वनउपजद्वारे निर्माण होणाऱ्या वस्तूंची मार्केटिंग होईल. सोबतच येथील लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. धानाची रोवणी झाल्यानंतर येथील लोक रोजगाराच्या शोधात दुसऱ्या शहराकडे निघून जातात. वनोपजावर आधारित लघुउद्योग असल्यास शेतीला जोडधंदा म्हणून त्याचा फायदा होईल.
- रमेश ताराम, राष्ट्रवादी काँग्रेस, विधानसभा अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT