खुशखबर! एक तारेखपासून ऑनलाइन व्यवहार फ्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

आता पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कार्यप्रणालीतील आयएमपीएस सेवा गुरुवारपासून पूर्णपणे मोफत होणार आहे.

औरंगाबाद - भारतीय स्टेट बॅंक ग्राहकांसाठी सातत्याने बदल करीत आहे. पुढील महिन्यात म्हणजे एक ऑगस्टपासून बॅंकेकडून ऑनलाइन सुविधांशी संबंधित शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे आता पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कार्यप्रणालीतील आयएमपीएस सेवा गुरुवारपासून पूर्णपणे मोफत होणार आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. 

आरबीआयकडून या सुविधांसाठी सूट देण्यात आली होती. त्यानंतर आता एसबीआयने आपल्या ग्राहकांना या सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून होणार असल्याने स्टेट बॅंकेच्या ऑनलाइन व्यवहारावर आयएमपीएस शुल्क द्यावे लागणार नाही. एसबीआयचे इंटरनेट बॅंकिंग आणि मोबाईल बॅंकिंगच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करताना ग्राहकाकडून आता आयएमपीएस शुल्क वसूल केले जाणार नाही. तसेच सर्वच टप्प्यांतील एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्क 20 टक्‍क्‍यांनी कमी केले. 

शिवाय एक हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन पैसे हस्तांतरित केल्यास आयएमपीएस शुल्क मोजावे लागणार नाही. आयएमपीएस ही एक इन्स्टंट इंटरबॅंक इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा आहे. यात काही वेळातच मोठी रक्कम एका खात्यावरून दुसऱ्या खात्यात पाठवली जाते. 24 तास ही सेवा अविरत सुरू असते. आता ही सुविधा वापरून ग्राहक दिवसातून कधीही पैसे ट्रान्सफर करू शकतात. या सुविधेतून जास्तीत जास्त दोन लाख रुपये ट्रान्सफर करू शकता येणार असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI to remove IMPS charges on internet banking