32 लाख डेबिट कार्ड ब्लॉक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

धोका टळेपर्यंत बॅंका "कार्ड ब्लॉक'ची कारवाई सुरूच ठेवणार आहेत. आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि येस बॅंक आदींनी त्यांच्या ग्राहकांना एटीएम कार्डचे पिन नंबर बदलण्याबाबत विचारणा केली आहे. तर एचडीएफसी बॅंकेने त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांना त्याच बॅंकांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

मुंबई : देशभरातील विविध बॅंकांची 32 लाख डेबिट कार्ड "ब्लॉक' करण्यात आली आहेत. बॅंकांची संरक्षित माहिती "लिक' झाल्याने कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून बॅंकांनी खबरदारीचे उपाय म्हणून ब्लॉक करण्याचा मार्ग अवलंबिला आहे.

बॅंकांची संरक्षित माहिती येस बॅंकेच्या हिताची पेमेंट्‌स सर्विसेसच्या यंत्रणेतील दोषातून लिक झाली आहे. हिताची कंपनी ही एटीएम सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी आहे.
देशभरातील बॅंकांमध्ये भारतीय स्टेट बॅंकेने सर्वाधिक सहा लाख कार्ड ब्लॉक केले आहेत.

याचसोबत बॅंक ऑफ बडोदा, आयडीबीआय, सेंट्रल बॅंक, आंध्र बॅंक आदी बॅंकांनीही खबरदारीची पावले उचलली आहेत. संरक्षित माहिती सुरक्षित होईपर्यंत ग्राहकांची मात्र असुविधा होणार आहे. धोका टळेपर्यंत बॅंका "कार्ड ब्लॉक'ची कारवाई सुरूच ठेवणार आहेत. आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि येस बॅंक आदींनी त्यांच्या ग्राहकांना एटीएम कार्डचे पिन नंबर बदलण्याबाबत विचारणा केली आहे. तर एचडीएफसी बॅंकेने त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांना त्याच बॅंकांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, भारतीय स्टेट बॅंकेकडून एनपीसीआय, मास्टर कार्ड आणि व्हिसा या कार्ड नेटवर्क कंपन्यांना सध्याच्या धोक्‍याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाची विचारणा
विविध बॅंकांचे 32 लाख डेबिट कार्ड ब्लॉक केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्रालयाने माहिती मागविली. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अतिरिक्‍त कारवाई करण्याची गरज आहे, असे सांगत बॅंकांनी आपल्या ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 Lakh Debit Cards blocked by Banks to avoid fraud