पाडव्यानिमित्त दागिन्यांची खरेदी ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 October 2019

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी दसऱ्यानंतर दिवाळी सणासाठी सोने-चांदी खरेदी करण्यास पसंती दिली.

पुणे - दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन व पाडव्यासाठी पुणेकरांनी सोने-चांदी खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विशेषत- साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या पाडव्यासाठी सोने-चांदी खरेदीसाठी लोकांनी प्राधान्य दिले. त्यादृष्टीने रविवारी शहरातील सराफी पेढ्यांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी दसऱ्यानंतर दिवाळी सणासाठी सोने-चांदी खरेदी करण्यास पसंती दिली. शुक्रवारी व शनिवारी शहरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांनी रविवारी सोने खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्यास प्राधान्य दिले. लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ या मध्यवर्ती भागांसह डेक्कन, कर्वे रस्ता, पौड फाटा या भागांमधील सराफी दुकानांमध्ये सकाळपासूनच गर्दी केली होती. सोन्या-चांदीची नाणी, सोन्या-चांदीची लक्ष्मी व गणपतीची मूर्ती, सोन्याची वेढणी यासह सोन्याची विविध प्रकारची दागिने नागरिकांनी खरेदी केले. पाडव्यासाठीची खरेदी सोमवारी करण्याऐवजी रविवारीच खरेदी करण्यावर नागरिकांनी भर दिला. 

विशेषत- दिवाळीनंतर लग्नसराईचे दिवस सुरू होत असल्याने आणि पाडव्याचा मुहूर्त साधून अनेकांनी लग्नासाठी आवश्‍यक दागिन्यांची खरेदी करण्यासाठी कुटुंबांसह हजेरी लावली. मध्यवर्ती भागातील सराफी बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दरम्यान, खरेदीसाठी वाढलेल्या गर्दीमुळे सराफी दुकानांमधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, प्रत्येक ग्राहकास त्यांच्या आवडी-निवडी व "बजेट'नुसार दागिने निवडून देण्यास कर्मचाऱ्यांनी मदत केली. 

""यंदा दसऱ्यापासूनच सोने-चांदी खरेदी करण्यास नागरिकांनी पसंती दर्शविली. विशेषत- दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन व पाडव्यासाठी खरेदी करण्यासाठी रविवारी नागरिकांनी गर्दी केली होती. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारी आणखी गर्दी वाढेल.'' 
-फत्तेचंद रांका, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार, फेडरेशन. 

""दिवाळीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे विविध प्रकार बाजारामध्ये येतात. त्यामुळे ग्राहक दिवाळीमध्ये दागिने खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. लग्नासाठीची खरेदीही यानिमित्ताने केली जात आहे.'' 
-अभय गाडगीळ, भागीदार, पी. एन. गाडगीळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewelry Shopping for Diwali Padwa