रूपी सहकारी बॅंकेला ११.८७ कोटींचा नफा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे- रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधाखाली असलेल्या रूपी सहकारी बॅंकेने ३१ मार्च २०१९ अखेर ३८.४० कोटींची कर्जवसुली केली असून, ११.८७ कोटींचा नफा मिळविला आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू केल्यापासून बॅंकेने ३७१ कोटी ४६ लाख रुपये थकीत कर्जवसुली केली. तसेच, विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रूपी बॅंकेच्या सुमारे पाच लाख ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षांत रूपी बॅंकेने थकीत कर्जदारांकडून एकूण २४२.७० कोटी रुपये वसूल केले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या हार्डशिप योजनेंतर्गत रूपी बॅंकेने आतापर्यंत ८२ हजार ४७१ ठेवीदारांना ३२६ कोटी ७३ लाख रुपये परत केले. कर्जवसुली आणि प्रशासकीय खर्चात कपात केल्यामुळे बॅंकेची गुंतवणूक १२ कोटी रुपयांनी वाढल्याची माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी दिली.

विलिनीकरणाबाबत  लवकरच तोडगा
ठेवीदारांच्या हक्‍काचे संरक्षण करण्यासाठी रूपी बॅंकेकडून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि राज्य सरकारकडे तोडगा काढण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. एखाद्या सक्षम बॅंकेत विलिनीकरण करण्यासोबतच ठेव विमा महामंडळाच्या मदतीने मालमत्ता, देणी हस्तांतरित करणे अथवा बॅंकेचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग सुचविला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने रूपी बॅंक विलिनीकरणाबाबत अनुकूलता दर्शविली आहे. त्यादृष्टीने विशेष तपासणी करण्यासाठी बॅंकेने मान्यता दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11.87 crores profit for Rupee Sahakari Bank