नोटाबंदीच्या काळात 50 लाख लोक झाले बेरोजगार

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

-  शहरी आणि ग्रामीण भागातील कमी शिक्षण झालेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या या निर्णयानंतर देशातील तब्बल 50 लाख लोक बेरोजगार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल बंगळुरुतील अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या 'सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट'ने (सीएसई) जारी केला आहे. 

'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2019' या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकारवर विविध स्तरातून टीका केला जात आहे. नोटाबंदी करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे देशातील काळा पैसा बाहेर काढणे हा होता. मात्र, आता ही नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यानंतर याच नोटाबंदीच्या काळात देशातील तब्बल 50 लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमवाव्या लागल्याने ही बाब देशाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे या संस्थेचे अध्यक्ष अमित बसोले यांनी सांगितले.

दरम्यान, नोटाबंदीनंतरच्या चार महिन्यांतच या नोकऱ्या कमी झाल्याचे बसोले यांनी सांगितले. तसेच नोकऱ्या गमावणाऱ्या 50 लाख लोकांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील कमी शिक्षण झालेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 Lakh Lost Jobs Over 2 Years Trend Began Just After Demonetisation