
Adani Group : अदानी समूह देशात करणार १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक
मुंबई : अदानी उद्योगसमूह पुढील दहा वर्षांत देशात १०० अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करणार असल्याचे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सिंगापूर येथे फोर्ब्स ग्लोबल सीईओ परिषदेत सांगितले. हरीत हायड्रोजनमुळे भारत एक दिवस ऊर्जा निर्यातदार बनू शकेल, असा दावाही अदानी यांनी केला. देशात केल्या जाणाऱ्या १०० अब्ज डॉलर गुंतवणुकीपैकी ७० टक्के गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रात केली जाणार असल्याचे गौतम अदानी यांनी समूहाच्या नवीन ऊर्जा योजनांचा खुलासा करताना सांगितले.
बंदरांचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जाईल, यातून ४५ गिगावॅट्स हायब्रीड नवीकरणीय ऊर्जा निर्मिती होईल, सौर पॅनेल, पवनचक्क्या व हायड्रोजन इलेक्ट्रोलायझरसाठी तीन गिगा कारखाने उभारण्यात येणार असल्याचेही अदानी यांनी सांगितले. बंदरे, विमानतळ, हरित ऊर्जा, सिमेंट आणि डेटा सेंटर्स क्षेत्रातही विस्तार केलेला अदानी समूह सौर ऊर्जा क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठा उद्योगसमूह आहे. कंपनीची सध्या २० गिगा वॅट ऊर्जा क्षमता असून, नव्या प्रकल्पामुळे ऊर्जा क्षमता ४५ गिगा वॅटने वाढणार आहे.