esakal | चर्चा चकाकत्या सोन्याची! 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सोने हे चलनाप्रमाणे मूल्यवान आहे. त्यामुळे काळाच्या ओघात गुंतवणुकीचे नवे पर्याय आले असले तरी आधुनिक काळातही जोखीम संरक्षणासाठी सोन्यातील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जायला हवे... 

चर्चा चकाकत्या सोन्याची! 

sakal_logo
By
आदित्य मोडक

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्याचा भाव झपाझप वर गेला आणि त्याने विक्रमी पातळी गाठली. मध्यंतरी दहा ग्रॅमला 55 हजार रुपयांपर्यंत गेलेले सोने आता 52 हजार रुपयांवर आले आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र सोन्याची चर्चा होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्यात आता गुंतवणूक करावी की नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. सोने आधुनिक भाषेत कमॉडिटी असले तरी सोने सर्वकालीन महत्त्वाचे आहे. कारण सोन्याएवढे शाश्वत मूल्य अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांत नाही. सोने हे चलनाप्रमाणे मूल्यवान आहे. त्यामुळे काळाच्या ओघात गुंतवणुकीचे नवे पर्याय आले असले तरी आधुनिक काळातही जोखीम संरक्षणासाठी सोन्यातील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जायला हवे. 

मोठ्या प्रमाणात कधी वाढ? 
जगात अस्थिरता निर्माण झाल्यावर गुंतवणुकीचा हमखास पर्याय म्हणून सोन्याकडेच गुंतवणूकदार वळतात, याचे अनेक दाखले देता येऊ शकतात. 1970 मध्ये जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थितीमुळे सोन्याचा भाव वाढला. 1980 च्या सुरवातीला इराक-इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने वाढून 850 डॉलरवर गेले होते. त्यानंतर दुसरी मोठी रॅली जागतिक वित्तीय पेच म्हणजे 2008 नंतर आली. त्यामुळे 2011 मध्ये सोने 1900 डॉलरपर्यंत गेले होते. पण, त्यानंतर पुन्हा जागतिक पातळीवर स्थिरता येऊ लागल्यावर सोने "करेक्‍ट'ही झाले. 2019 पासून पुन्हा जागतिक पातळीवर भू-राजकीय अस्थिरता, व्यापारयुद्ध, मंदी आदींमुळे सोने पुन्हा मागणीत येऊ लागले. विविध देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनीदेखील संभाव्य स्थिती लक्षात घेऊन 2019 पासून सोन्यात गुंतवणूक करायला सुरवात केली आणि आगामी काळातही होत राहील, अशीच शक्‍यता आहे. तसेच, डॉलरमधील गुंतवणूक कमी करून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले. तसेच, कोव्हिड-19 ला जागतिक साथ म्हणून घोषित केल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था "लॉकडाउन'मध्ये अडकली. जोखीम कमी करण्यासाठी चलनाएवढे मूल्य असणाऱ्या सोन्यात गुंतवणूक करण्यास पसंती दिली गेली. त्यामुळेच सोन्यात मार्चनंतर "रॅली' दिसू लागली आणि ऑगस्टमध्ये सोने प्रति औंस 2070 डॉलरच्या पातळीवर गेले. मार्चपासून सोन्याने 30 टक्के परतावा दिला आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजून वाढणार का? 
रशियाने कोव्हिड-19 वर प्रतिबंधात्मक लस शोधल्याचा केलेला दावा आणि एबीएन ऍम्रोने कमॉडिटी फायनान्स बंद केल्याने अनेक कमॉडिटी ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूक संस्थांची रोख तरलता कमी झाली. त्याचबरोबर "प्रॉफिट बुकिंग'साठी सोने-चांदी बाजारात विक्रीचा दबाव आला. परिणामी, सोने प्रति औंस 2070 डॉलरवरून बुधवारी (12 ऑगस्ट) सकाळच्या सत्रात प्रति औंस 1870 डॉलरवर म्हणजेच प्रति औंस 200 डॉलरने खाली आले. 200 डॉलर वाढण्यासाठी सोन्याला 15 दिवसांचा कालावधी लागला होता आणि घटण्यास केवळ तीन दिवस पुरे पडले. सध्याची परिस्थिती पाहता जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, अशी स्थिती नाही. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, भू-राजकीय अस्थिरता, व्याजदर या गोष्टी अस्थिर राहणे हे सोन्यावर परिणाम करणारे घटक आहेत. अल्पकाळासाठी सोने-चांदीतील कमकुवतपणा हा दीर्घकालीन सकारात्मक ताकदीला बदलू शकणार नाही. जोपर्यंत बाजारात अस्थिरता असेल, तोपर्यंत सोने भाव खात राहणार, ही वस्तुस्थिती आहे. 

'वर्क फ्रॉम होम' करत असाल तर जास्तीचा कर देण्याची तयारी ठेवा

दीर्घकालीन फायदा 
सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करताना अल्पकालीन तेजी-मंदीला भुलता कामा नये. सोने व चांदीत गुंतवणूक करताना तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. दीर्घकालीन विचार केल्यास, सोन्याचे 14 टक्‍क्‍यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास सरासरी 30 हजार रुपयांवर असणारे सोने 50 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. यावरूनच लक्षात येईल, की सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने व भावात तीव्र चढ-उतार नसताना सोने-चांदीत गुंतवणूक करावी. यामुळे सरासरी भाव मिळून फायदा वाढण्याची शक्‍यता वाढते. सोन्यात असणारी चलनक्षमता, रोकडसुलभता यांच्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोत सोने हे असायलाच हवे. कारण, अडचणीत किंवा गुंतवणुकीत चांगला परतावा देणारे ते अक्षय माध्यम आहे. कमॉडिटीत गुंतवणूक करताना भाव खाली आल्यावर त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचा हेतू ठेवावा. 
भारतीयांची मानसिकता ही सोन्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचीच आहे. सोन्याच्या दागिन्यांशी भारतीयांचे भावनीक नाते असते. यामुळे सोन्यातील गुंतवणुकीवर होणारा दीर्घकालीन फायदा गुंतवणूकदारांना अनुभवायला मिळतो. 

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट; तसेच सोने-चांदीचे अभ्यासक आहेत.) 

loading image
go to top