एअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा पगाराच्या प्रतिक्षेत...

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पगाराची प्रतिक्षा करावी लागते आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यासाठीचा पगार झालेला नाही.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पगाराची प्रतिक्षा करावी लागते आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यासाठीचा पगार झालेला नाही. यावर्षी चौथ्यांदा हा प्रकार घडला आहे. याआधी  एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे वेतनसुद्धा थकले होते. एअर इंडिया दिवाळखोरीतून जाते आहे. 

अलीकडच्या काळात घडलेल्या काही घडामोडींनी एअर इंडियाच्या अडचणीत वाढच झाली आहे. आधी गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या उदासिनतेमुळे एअर इंडियात निराशेचे वातावरण होते. त्यातच आता एअर इंडियातल्या 11,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा समोर आला आहे. कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगारच अद्याप मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे एअरलाईन्स कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार त्याच महिन्यातल्या 30 किंवा 31 तारखेला होतो.. कर्मचाऱ्यांना वेतन न मिळण्यामागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. एअर इंडियाची आर्थिक कोंडी जरी झालेली असली तरी कर्मचाऱ्यांचा पगार न होण्यामागचे कारण व्यवस्थापनाने अधिकृतरित्या कळवलेले नाही. आमचा पगारही होत नाही आणि व्यवस्थापन याबद्दल काही बोलतही नाही अशी कर्मचाऱ्यांची व्यथा आहे. याआधी बॅंक ऑफ बडोदा एअर इंडियाच्या पाठीशी उभी राहिली होती. 

एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने केंद्र सरकारलाच आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. याआधी 2012 साली युपीएच्या आघाडी सरकारच्या काळात केंद्राने एअर इंडियाला पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 2021 सालापर्यंत एअर इंडियाला 30,231 कोटी रुपये मिळण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी एअर इंडियाला 26,000 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर मात्र जून 2017 मध्ये केंद्र सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीरणाचा निर्णय घेतला होता. एअर इंडियावर असलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India delays salaries again