आज सोनेखरेदीचा "अक्षय्य' आनंद! 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 May 2019

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध पेढ्यांनी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. अनेक सराफांनी घडणावळीच्या मजुरीवर 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली आहे.

मुंबई - साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध पेढ्यांनी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. अनेक सराफांनी घडणावळीच्या मजुरीवर 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली आहे. काहींनी सोनेखरेदीवर चांदीची वस्तू मोफत देऊ केली आहे. सोन्याचे भाव वाढले तरीही यंदाही सोने-चांदीला मागणी कायम असेल, असा सराफा बाजाराचा विश्‍वास आहे. ऑनलाईन मंचावरही सोने, चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. 

दिवाळीनंतर अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असतो. त्यानिमित्त ग्राहक मोठ्या संख्येने दागिने खरेदी करतात. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेक ग्राहक उद्याच दागिने विकत घेतील, असे "टायटन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. वेंकटरामण यांनी सांगितले. सार्वत्रिक निवडणुकांमुळे व्यवसायावर आणि ग्राहकांच्या खरेदीबाबतच्या निर्णयांवर परिणाम होणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मुहूर्ताला खरेदी केल्याने सोने अक्षय्य राहते, अशी ग्राहकांची श्रद्धा असल्याने पाडव्याच्या तुलनेत अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीत मोठी वाढ होते, असे मलबार गोल्ड अँड डायमंडचे अध्यक्ष अहमद एम.पी. यांनी सांगितले. यंदा विक्रीत 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

सोमवारचे भाव (प्रति दहा ग्रॅम) 
- स्टॅंडर्ड सोने - 31 हजार 508 रुपये 
- शुद्ध सोने - 31 हजार 675 रुपये 
- चांदी (प्रति किलो) - 36 हजार 945 रुपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshaya tritiya gold jewellery offers