गोल्ड करा होल्ड!

अमित मोडक 
Monday, 13 January 2020

अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले.

अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने १५०० डॉलर प्रति औंसवरून १६११ डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४२ हजार रुपयांवर पोचला होता. यामुळे नव्याने सोने-चांदी खरेदी करताना टप्प्याटप्प्याने घेणे आवश्‍यक आहे. मात्र आता त्यात करेक्‍शन येत आहे. अचानक झालेली भाव वाढ आणि घट यामागील कारणे जाणून घेऊयात :

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायकॉलॉजिकल डिमांड
सोन्याच्या भावात अचानक आलेली तेजी अनेकांना अनाकलनीय वाटेल. मात्र ज्या वेळी जगात कुठेही भूराजकीय वा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांना सोने हा एकमेव गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय वाटतो. या वेळी आलेल्या तेजीला अमेरिका व इराण या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत होती. वास्तविक अशावेळी सोन्याची उपलब्धता हा मुद्दाच नसतो. तर सोन्याला मागणी येईल या अपेक्षेने सट्टेबाज प्रत्यक्ष मागणीपूर्वीच वायदेबाजारात सोन्याचे भाव चढवितात. त्यामुळे अशा स्थितीत ‘फिजिकल डिमांड’ न वाढता ‘सायकॉलॉजिकल डिमांड’ तयार होते. सध्या असणारी अस्थिरता ही अल्पवधीत संपेल व पुन्हा एकदा स्थिर भावाने सोने-चांदी उपलब्ध होतील. यामुळे सध्यातरी ‘गोल्ड’ खरेदी-विक्रीचा निर्णय ‘होल्ड’ करणे फायदेशीर ...!

इतिहास काय सांगतो?
सोन्यात अशाप्रकारची तेजी पहिल्यांदाच आलेली नाही. या अगोदरदेखील १९८० मध्ये इराक- इराण युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव २०० डॉलर्सनी वधारले होते. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे ब्रेक्‍झिटवेळीदेखील सोन्याचे भाव ५० डॉलरने अचानक वाढले होते. मात्र नंतर त्यात ‘करेक्‍शन’ही झाले. अस्थिर परिस्थितीमुळे अनेक वेळा भीती निर्माण होऊन अपेक्षेपेक्षा भावात जास्त चढउतार होतात.

सोने खरेदी करताना... 
गुंतवणूकदारांनी तातडीने गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक करणे श्रेयस्कर नसते. सोन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. भौगोलिक, आर्थिक अस्थिरेतेची कारणे, सुधारणांची माहिती नीट समजावून घेऊन त्याचे एकंदरीत काय परिणाम असतील हे लक्षात घेऊन निर्णय केल्यास अल्पकालीन नुकासान टाळून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.

...तर १७०० डॉलरची पातळी
भूराजकीय वा आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक देशांची चलने कमकुवत होतात. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बॅंकांना देखील चलनापेक्षा सोन्यातील गुंतवणूक शाश्वत वाटते आहे. परिणामी सद्यस्थितीत ब्रेक्‍झिट, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, अमेरिका -चीन व्यापार युद्धसारख्या अनेक कारणांमुळे जगातील मध्यवर्ती बॅंकांचा मागील महिन्यात सोन्याकडे ओढा वाढत आहे. मध्यवर्ती बॅंकांची सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्यक्ष ‘फिजिकल डिमांड’ वाढून सोन्याच्या उपलब्धतेत अचानक घट होऊ शकते. यापुढेही मध्यवर्ती बॅंकांचे खरेदीचे सत्र असेच सुरू राहिले तर सोन्याच्या भावामध्ये असाधारणप्रकारची तेजी येऊन अल्पकाळासाठी सोने प्रति औंस १७०० डॉलरची पातळी गाठू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit modak article Gold prices rise