स्मार्ट खबरदारी : नवे AIS कसे आहे?

प्राप्तिकर विभागाने नुकतेच एक नवे वार्षिक माहितीपत्र (AIS) अस्तित्वात आणले आहे.
स्मार्ट खबरदारी : नवे AIS कसे आहे?

प्राप्तिकर विभागाने नुकतेच एक नवे वार्षिक माहितीपत्र (AIS) अस्तित्वात आणले आहे, ज्यामध्ये करदात्याला त्याला मिळालेले व्याज, लाभांश, सिक्युरिटीज व्यवहार, म्युच्युअल फंड व्यवहार, परदेशातून आलेला पैसा आदी आर्थिक गोष्टींची माहिती सविस्तरपणे दिसायला लागणार आहे. अशा या AIS बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर आपण अनेक वर्षे सध्या फॉर्म २६AS पाहात होतो, ज्यामध्ये आपल्याला एखाद्या आर्थिक वर्षात कपात झालेली ‘टीडीएस’ची रक्कम, ‘टीसीएस’ची रक्कम, आपण भरलेला प्राप्तिकर, मिळालेला परतावा (रिफंड) आदींची माहिती पाहायला मिळते. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सुधारित फॉर्म २६AS ची घोषणा केली होती; ज्यामध्ये करदात्याला वरील बाबींसोबतच इतरही आर्थिक गोष्टी तपशीलासह पाहायला मिळतील. या अनुषंगाने आता नव्या सुधारित वार्षिक माहितीपत्रामध्ये (AIS) करदात्यांना मिळालेले व्याज, लाभांश, सिक्युरिटीज व्यवहार, म्युच्युअल फंड व्यवहार, अचल मालमत्ता व्यवहार, परदेशी व्यवहार, क्रेडिट कार्ड व्यवहार आदी महत्त्वाच्या आर्थिक बाबींचा समावेश केला गेला आहे; ज्यामुळे आता हे नवे वार्षिक माहितीपत्र हे आतापर्यंतच्या असलेल्या फॉर्म २६AS पेक्षा बरेच व्यापक असे ठरेल.

फॉर्म २६AS संपुष्टात येईल का?

नवे AIS पूर्णपणे प्रमाणित आणि कार्यान्वीत होईपर्यंत फॉर्म २६AS हा सुद्धा अस्तित्वात राहील, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

करदात्यांनी काय करणे अपेक्षित आहे?

प्रत्येक करदात्याने आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आता फॉर्म २६AS सोबतच नव्याने अंमलात आणलेले वार्षिक माहितीपत्रसुद्धा काळजीपूर्वक पाहणे आणि त्यानुसार योग्य ती सर्व माहिती आपल्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये नमूद करणे अपेक्षित आहे.

AIS कोठे पाहता येऊ शकते?

आपले नवे सुधारित वार्षिक माहितीपत्र (AIS) पाहणे अगदी सहजसोपे आहे. त्यासाठी करदात्याला प्राप्तिकर ई-फायलींची वेबसाईट (https://www.incometax.gov.in) वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर ‘सर्व्हिसेस’ अंतर्गत सर्वांत शेवटी ‘वार्षिक माहितीपत्र (AIS)’ या विकल्पाची निवड करावी लागेल.

AIS मधील माहितीशी सहमत नसाल तर?

नव्या वार्षिक माहितीपत्रामध्ये आर्थिक व्यवहारांबद्दल दिसणारी माहिती चुकीची वाटू शकते किंवा अशी आर्थिक माहिती दिसू शकते, जी प्रत्यक्ष करदात्याशी निगडीत नसून, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी किंवा दुसऱ्या एखाद्या वर्षाशी संबंधित असेल किंवा असेही होऊ शकते, की एकाच व्यवहाराची माहिती दोनदा दिसत असेल, तर अशा परिस्थितीत करदात्याला त्याच AIS मध्ये ऑनलाईन फीडबॅक दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. फॉर्म २६AS मध्ये अशी फीडबॅक म्हणजेच अभिप्राय दाखल करण्याची सुविधा नव्हती.

AIS डाऊनलोड करून सेव्ह करता येईल?

याचे उत्तर अर्थातच होय आहे. वर माहिती दिल्याप्रमाणे, प्राप्तिकराच्या ई-फाइलिंगच्या नव्या संकेतस्थळावर लॉग इन करून ‘सर्व्हिसेस’ अंतर्गत वार्षिक माहितीपत्र या विकल्पाची निवड केल्यावर तेथेच तुम्हाला ‘डाउनलोड’ हा पर्याय दिसेल. तेथून तुम्ही ‘पीडीएफ’ फॉर्मेटमध्ये आपले आर्थिक वर्ष २०-२१ चे AIS डाऊनलोड करू शकता. अशी ही पीडीएफ फाईल उघडण्यासाठी तुमचा PAN आणि जन्मतारीख एकत्रित करून पासवर्ड म्हणून टाकावा. यामध्ये करदात्याला सविस्तर तपशीलाद्वारे माहितीसुद्धा पाहायला मिळेल; तसेच सारांशसुद्धा पाहायला मिळेल.

तात्पर्य - ही सविस्तर माहिती वाचून आपल्याला हे लक्षात आलेच असेल, की फॉर्म २६AS च्या तुलनेत हा नव्याने आलेला AIS हा अधिक व्यापक आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठीची बरीचशी माहिती तुम्हाला यामधूनच प्राप्त होईल आणि सर्वांत महत्त्वाचे ऑनलाईन फीडबॅक/अभिप्राय देण्याचा पर्याय देऊन प्राप्तिकर विभागाने चूकदुरुस्तीची मुभा सुद्धा करदात्यांना दिली आहे हे महत्त्वाचे! त्यामुळे प्रत्येक करदात्याने आपले विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी फॉर्म २६AS सोबतच वरील वार्षिक माहितीपत्रसुद्धा (AIS) आठवणीने पाहून मग त्याप्रमाणे विवरणपत्र दाखल करावे; जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नोटीस आदी गोष्टी टाळू शकता. आता कोणत्याही उत्पन्नाची आणि आर्थिक व्यवहाराची माहिती न लपविता सर्व गोष्टी विवरणपत्रामध्ये जाहीर करायला विसरू नका. कारण आता तुमच्या जवळपास सर्वच उत्पन्नाची आणि व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विभागाकडे पूर्वीपासूनच असणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com