आर्थिक सुबत्ता हवीय?

आदित्य मोडक
सोमवार, 7 मे 2018

आर्थिक शिस्त तरुणपणापासून लावून घेतल्यास आयुष्यभर योग्य लाइफस्टाइल जगण्याबरोबर उतारवयातही सन्मानाने आयुष्य जगता येऊ शकते. थोडक्‍यात आर्थिक सुबत्ता हवी असेल, तर काय करायला हवे, ते पाहूया.

आर्थिक शिस्त तरुणपणापासून लावून घेतल्यास आयुष्यभर योग्य लाइफस्टाइल जगण्याबरोबर उतारवयातही सन्मानाने आयुष्य जगता येऊ शकते. थोडक्‍यात आर्थिक सुबत्ता हवी असेल, तर काय करायला हवे, ते पाहूया.

माझ्याकडे पाच ते दहा वर्षांत पाच ते पंधरा लाख रुपयांची गंगाजळी असेल, असा विचार करणारे फारच कमी असतात. सध्याची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेता, भविष्यातही आतासारखेच जीवन जगण्यासाठी नोकरीच्या पहिल्या वर्षापासूनच बचतीची सवय आवश्‍यक आहे. यामुळेच आर्थिक समृद्धी मिळविता येते. म्हणूनच नोकरीला लागल्यावर आर्थिक उद्दिष्ट्ये (आपत्कालीन निधी, भविष्य निर्वाह निधी, घर आदी) निश्‍चित केली पाहिजेत. त्यानंतर आर्थिक ताळेबंद आखून योग्य ती रक्कम संबंधित उद्दिष्टासाठी वर्ग करणे व आढावा घेत राहणे एवढे करायलाच हवे. नोकरीत मर्यादित उत्पन्न असल्याने, आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या मार्गात काही खर्चिक गोष्टी येत राहतात. त्यामुळे महागडे मोबाईल, पर्यटन, वाहन यांसाठी खर्च करताना ‘युटिलिटी व्हॅल्यू’ लक्षात घेऊनच निर्णय घेणे आवश्‍यक असते. कारण कर्जावर घेतलेले घर सोडल्यास बाकी गोष्टींना तसे मूल्य राहत नाही. त्यामुळेच आर्थिक सुबत्ता किंवा समृद्धीच्या मार्गावर जाण्यासाठी काय करायला हवे, हे पाहूया.

बॅंकेतील रिकरिंग, ठेवी व पीपीएफ
नोकरीला लागल्यावर लगेचच एकदम मोठी ठेव बॅंकेत ठेवता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या वा तिसऱ्या पगारापासून बॅंकेत रिकरिंग खाते सुरू करावे. परिणामी, मुदतपूर्तीला चांगली रक्कम जमा होते. पगाराच्या किमान तीस टक्के रक्कम ही रिकरिंगसाठी निश्‍चित करावी. समजा तीस हजार रुपये मासिक वेतन असल्यास दरमहा नऊ हजार रुपयांचे रिकरिंग सुरू करावे. खर्चासाठी वीस टक्के रक्कम म्हणजे दरमहा सहा हजार रुपये ठेवावेत.

रिकरिंग खाते बॅंकेत उघडलेले चांगले; कारण मुदतपूर्तीला त्याचे ठेवीत रूपांतर करता येते. मुदतपूर्तीला रिकरिंगच्या विशिष्ट रकमेचे ठेवीत रूपांतर करावे व उरलेली रक्कम भविष्य निर्वाह निधीत (पीपीएफ) भरावी.

महिन्याला नऊ हजार रुपयांचे रिकरिंग सुरू असल्यास यातील दुसऱ्या वर्षापासून ७० हजार रुपयांची रक्कम ही तरलतेसाठी (लिक्विडिटी) ठेव म्हणून ठेवावी व उरलेली रक्कम ‘पीपीएफ’मध्ये गुंतविता येईल.  

म्युच्युअल फंड
भांडवली बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीनच हिताची ठरते. यामध्ये किमान पाच ते सात वर्षांचा कालावधी ठेवून गुंतवणूक करायला हवी. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. समजा मासिक उत्पन्न तीस हजार रुपये असल्यास त्यातून महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमार्फत (एसआयपी) करावी. एकाच फंडात गुंतवणूक न करता त्याचे समान भाग करून चार वेगवेगळ्या फंडांत दरमहा अडीच हजार रुपये गुंतवावेत. गुंतवणुकीसाठी चारही फंड वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, बॅलन्स फंडाची निवड करावी. ‘एसआयपी’मुळे शेअर बाजारातील चढ-उतारांपासून सरासरी गाठता येते; तसेच वेगवेगळ्या फंडांमुळे जोखीम कमी होऊन समतोलही साधता येतो.

टर्म इन्शुरन्स
आपल्याकडे टर्म इन्शुरन्स घेणारे कमी जण आहेत; पण हाच खरा इन्शुरन्स आहे. कमी वयात (तिशीच्या आत आणि कोणतेही व्यसन नसलेली हेल्दी व्यक्ती) असा इन्शुरन्स काढल्यास एक कोटी रुपयांच्या लाइफ कव्हरसाठी वार्षिक पाच ते दहा हजार रुपयांचा प्रीमियम पडू शकतो. (कंपन्यांनुसार प्रिमियमची रक्कम वेगवेगळी असते.) उत्पन्नातील दोन हजार रुपये हे इन्शुरन्स प्रीमियमसाठी ठेवावेत. यामधून टर्म प्लॅन व हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम सहज भरता येतो.

सोने-चांदी
सोने-चांदीतील गुंतवणुकीत दीर्घकाळात फायदा देऊन जाते. २०१७ मध्ये (अक्षय तृतीया ते अक्षय तृतीया) बॅंक ठेवींपेक्षा सोन्यामध्ये अधिक म्हणजे ७.७ टक्के परतावा मिळाला. सोने-चांदीत तरलता (लिक्विडिटी) सर्वाधिक आहे. सोने-चांदीतून लगेचच निधी उभारता येतो; तसेच सोने-चांदी ही जागतिक कमॉडिटी असल्याने ते एक प्रकारचे चलनच आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या या पर्यायाचा थोडा समावेश आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत हवा. सोन्याचा सरासरी एक ग्रॅमचा भाव तीन हजार रुपये असल्याचे गृहित धरल्यास महिन्याला किमान एक ग्रॅम सोने घेता येऊ शकते आणि वर्षअखेरीस बारा ग्रॅम सोने जमा होईल. पाच वर्षे सलग एक ग्रॅम सोने घेतल्यास साठ ग्रॅमपर्यंत सोने खरेदी होऊ शकते. लग्नकार्याची तरतूद म्हणूनही त्याकडे पाहता येते.

वरील उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे. उदाहरणातील मुलगा वा मुलगी हे पालकांकडे राहत असून, घरखर्च त्यांच्यावर अवलंबून नाही, असे गृहित धरले आहे. तरुणपणापासून आर्थिक शिस्त लावून घेतल्यास भविष्यात मोठी रक्कम उभी राहू शकते, हे कळण्यासाठी उदाहरण दिले आहे. त्यामुळेच नोकरीला लागल्यावर लग्न होईपर्यंत काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळल्यास नक्कीच चांगली रक्कम जमा होईल; तसेच लग्नानंतर आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करून आणि आर्थिक उद्दिष्टांची फेरआखणी करून त्यानुसार निधी वर्ग करता येईल. प्रथम बचत आणि मग गुंतवणुकीतूनच आर्थिक सुबत्ता निर्माण होऊ शकते, हे विसरू नका. आर्थिक सुबत्तेसाठी आतापासूनच प्रयत्न करा. शेवटचे पण महत्त्वाचे असे, की आर्थिक निर्णय घेताना वा कोणत्याही गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागार वा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे राहील.

Web Title: arthavishwa news Economic Submission