मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेगळा गुंतवणूक विचार

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेगळा गुंतवणूक विचार

हल्ली खूप मुलांना शिकण्याचा कंटाळा असतो आणि गणित विषय तर नकोच असतो. मध्यंतरी बरेच व्हिडिओ ‘व्हॉट्‌सॲप’ला येत होते, की ज्यामध्ये मुलगा म्हणतो, ‘मला गणित नाही कळत आणि आवडतदेखील नाही.’ मुलांना जबरदस्ती नाही करायला पाहिजे, हे नक्की. त्याऐवजी मुलांना गणित किंवा अर्थशास्त्र या गोष्टी शिकण्यासाठी आपण जर त्यांना उद्युक्त करू शकलो, तर नक्कीच काहीतरी चांगले घडू शकेल... 

मी विचार करत बसलो होतो आणि अचानक एक कल्पना सुचली- लहानपणापासून आपल्याकडे एक प्रथा आहे, की तू जर अमुक टक्के मार्क मिळवले, तर तुला मी एक छान गिफ्ट घेईन किंवा तुमचे मूल जेव्हा तुमच्याकडे काही मागते, तेव्हा तुम्ही सांगता, तू जर इतके टक्के मार्क मिळवलेस, तर मी तुला जे पाहिजे ते घेईन. लहान मुलांसाठी त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांचे गेम्स, खेळणी, सायकल आदी गोष्टी. यामध्ये आई- वडिलांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी साध्य करायच्या असतात, त्या म्हणजे त्यांच्या पाल्याला शिक्षणामध्ये आवड निर्माण करणे आणि त्याला जे पाहिजे ते त्याला देणे. आता मी तुम्हाला एक अशी कल्पना सुचवणार आहे, की ज्यामधून तुम्ही हे दोन्ही साध्य करू शकताच; पण त्यासोबत तुम्ही त्याच्यासाठी पैसे बचत करून ते वाढवूसुद्धा शकता. 

तुमच्या घराजवळच्या एका चांगल्या बॅंकेत पाल्याच्या नावाने बचत खाते उघडायचे. सुरवातीला आठवड्यातून एकदा त्याला बॅंकेत घेऊन जायचे, कमीत कमी १२५ रुपये (जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार) त्याच्याकडून जमा करवून घ्यायचे. असे तुम्हाला आठवड्यामधून एकदा करायचे आहे. हे केल्याने त्याला बॅंकेचे व्यवहार हाताळायला आणि समजायला हळूहळू सुरवात होईल. काही दिवसांनी तो स्वतः बॅंकेत जाईल आणि काही वर्षांनी हे सगळे व्यवहार ऑनलाइनपण करेल. 

आता दर आठवड्याला १२५ प्रमाणे एका महिन्यानंतर ५०० रुपये जमा होतील. त्या ५०० रुपयांची दरमहा ‘लार्ज कॅप इक्विटी फंडा’मध्ये ‘एसआयपी’ चालू करायची. हे करीत असताना तुमच्या पाल्याला पूर्ण माहिती द्यायची, की तुम्ही काय आणि का करत आहात ते! ही शिकवणूक त्याच्यासाठी अमूल्य ठरणार आहे. या सर्व गोष्टींमध्ये अजून फायदा असा आहे, की तुमचा तुमच्या पाल्यासोबत संवाद वाढणार आहे, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला आणखी सोपे जाणार आहे. 

आता दरमहा तुम्ही ५०० रुपये जे म्युच्युअल फंडामध्ये ‘एसआयपी’च्या रूपात गुंतवणूक करीत आहात, त्यामुळे एक वर्षानंतर सहा हजार रुपये जमा होणार आहेत. म्हणजे बचत तर होणारच आहे; पण ही नुसती बचत नसून गुंतवणूक आहे आणि शेअर बाजार जसा वर- खाली होणार, तसा या गुंतवणुकीतून परतावा मिळणार व कालांतराने ते पैसे वाढू शकणार आहेत. 
जेव्हा ते पैसे वाढणार आहेत, त्यावेळेला तुमच्या मुलाची उत्सुकता नक्की वाढेल आणि तुम्हाला तो प्रश्नही विचारेल, की आपण एवढेच पैसे गुंतवले; पण मग हे वाढले कसे? त्या वेळी या पैशांची आधी बचत, मग गुंतवणूक आणि त्यातून परतावा कसा मिळत गेला, ही माहिती तुम्ही त्याला द्यायची. जर तुम्ही ही गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी केली, तर तुमच्या नकळत ९० हजार रुपयांची बचत होणार आणि पंधरा वर्षांत ‘मॅजिक ऑफ कम्पाउंडिंग’मुळे ते वाढणार देखील आहेत. असे पैसे वाढल्यानंतर तुम्हाला पाल्यासाठी पाहिजे तो गेम, खेळणे किंवा सायकल घेणे सोपे जाणार आणि त्याचबरोबर पाल्यामध्ये शिकण्याची इच्छा निर्माण होणार. या गोष्टी करून तुम्ही त्याला ‘एक्‍स्पोजर’, अनुभव, संधी व ज्ञान देत आहात, की जे त्याला मोठा झाल्यावर म्हणजे कदाचित कमवायला लागल्यावर उपयोगी पडणारे असेल. 
आपल्या भारतीय मानसिकतेप्रमाणे आपले उच्चशिक्षण साधारण २१ ते २५ वयामध्ये होते, मग आपण नोकरी- व्यवसाय करायला सुरवात करतो. २८ ते ३२ मध्ये लग्न होते आणि ३५ ते ३८ मध्ये आपले मूल शाळेत जायला सुरवात करते. तेव्हा जबाबदारी वाढते आणि मग कळते, की आता आपण बचत आणि गुंतवणूक करायला सुरवात केली पाहिजे. 

परंतु वर लिहिल्याप्रमाणे, लहानपणापासूनच बचत आणि गुंतवणुकीची सवय लावल्यास मुलांना त्याचे महत्त्व लवकर कळू शकेल. 

जर तुम्हाला पटले असेल, तर लगेच कामाला लागा. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल उचलूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com