‘निफ्टी’ १० हजार अंशांचा मोठा अडथळा ओलांडेल?     

राजेंद्र सूर्यवंशी
सोमवार, 24 जुलै 2017

शेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-‘निफ्टी’ बहुचर्चित १० हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बाजारात ‘करेक्‍शन’ येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत केले जाते. हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे ‘करेक्‍शन’ लगेच सुरू होण्याची शक्‍यता दिसत नाही. ‘करेक्‍शन’ येण्याची पूर्वसूचना देणारी परिमाणे तसे संकेत दर्शवत नाहीत. परकी व देशी वित्तीय संस्थांचा बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. एप्रिल ते जून महिन्यात परकी गुंतवणूकदारांनी विक्री केली असतानाही, देशी गुंतवणुकीच्या आधारे ‘निफ्टी’ ५.५ टक्के वाढला. सध्या दोघेही खरेदी करीत आहेत.

शेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-‘निफ्टी’ बहुचर्चित १० हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बाजारात ‘करेक्‍शन’ येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत केले जाते. हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे ‘करेक्‍शन’ लगेच सुरू होण्याची शक्‍यता दिसत नाही. ‘करेक्‍शन’ येण्याची पूर्वसूचना देणारी परिमाणे तसे संकेत दर्शवत नाहीत. परकी व देशी वित्तीय संस्थांचा बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. एप्रिल ते जून महिन्यात परकी गुंतवणूकदारांनी विक्री केली असतानाही, देशी गुंतवणुकीच्या आधारे ‘निफ्टी’ ५.५ टक्के वाढला. सध्या दोघेही खरेदी करीत आहेत. या खरेदीमागे, पुढील महिन्यात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता, संपूर्ण देशात अपेक्षेप्रमाणे पडत असलेला पाऊस, वस्तू व सेवाकराची संपूर्ण देशात अंमलबजावणी व त्यामुळे देशाच्या महसुलात होणारी वाढ, जून तिमाहीचे कंपन्यांचे निकाल चांगले असतील, या बाबी गृहीत आहे. जून तिमाहीतील आतापर्यंत जाहीर झालेले निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. सध्याच्या परिस्थितीत ९७५० अंशांपर्यंत ‘करेक्‍शन’ झाल्यास, परत तेथून ‘निफ्टी’ १०,२५० अंशांच्या दिशेने वाढण्याची शक्‍यता आहे. भारत-चीन सीमेवरील तणावात वाढ झाल्यास बाजारात अचानक मोठी घसरण होण्याची भीतीही आहे. हा तणाव युद्धात परावर्तीत होणार नाही, अस बाजार मानून चालत आहे. परंतु, या बाजूने सावध असणे उचित राहील.    

तांत्रिक कल कसा राहील?
शुक्रवारच्या दिवसअखेर ‘निफ्टी’ ९९१० अंशांच्या पातळीवर बंद झाला आहे. तांत्रिक आलेखानुसार, या पातळीपासून वरच्या दिशेने १० हजार अंशांवर मोठा अडथळा असून, खालच्या दिशेने ९८३० अंशांवर छोटा आधार असून; या खाली ९७५० हा मोठा आधार आहे. सध्या १० हजार व ९७५० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. लगेच १० हजार अंशांची पातळी ओलांडण्याची क्षमता बाजारात दिसत नाही. पण ९७५० अंशांपर्यंत ‘करेक्‍शन’ झाल्यास, पुढील वाढीत १० हजार अंशाची पातळी ओलांडून १०,२५० अंशांच्या दिशेने ‘निफ्टी’ जाण्याची शक्‍यता आहे. ९७५० अंशांखाली लगेच जाण्याची भीती नाही. परंतु पुढील काळात लपलेल्या अनपेक्षित घटनांनी ‘निफ्टी’ ९७५० अंशांखाली घसरला, तर पुढे मोठे ‘करेक्‍शन’ सुरू झाले, असे मानता येईल.  

खरेदी करण्यासारखे.....
मल्टी कमॉडीटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्‍स)
(सध्याचा भाव ः रु. ११२७, उद्दिष्ट ः रु. १६५०)
वस्तूंची खरेदी-विक्री करण्याची सुविधा देणारी एकमेव कंपनी आहे. या खरेदी-विक्रीवर स्थिर करआकारणीतून कंपनीला कमाई होते. व्यवसायाचे स्वरूप पाहता या कंपनीच्या कमाईत निरंतर वाढच होत राहील. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत खरेदीसाठी उत्तम कंपनी वाटते. कंपनीचे निकाल पाहता, मिळणारा महसूल व निव्वळ नफा यांचे प्रमाण स्थिर आहे. पी/ई ३८ व पी/बीव्ही ३.६ आहे. उद्योगाचा पी/ई ५६, विकास दर ०.९९ व निव्वळ नफ्याचे प्रमाण ४६.६२ टक्के असल्याने आज या कंपनीत गुंतवणूक करण्यास वाव आहे. विकासदर सर्वांत आकर्षक असल्याने यात केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम लाभ होण्याची शक्‍यता आहे. या शेअरमध्ये पुढील एका वर्षात रु. १६५० पर्यंत भाववाढ होण्याची आशा करता येईल.

(डिस्क्‍लेमर - लेखक शेअर बाजाराचे संशोधक-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthavishwa 'Nifty' will cross a big block of 10 thousand degrees?