'त्या' काकूंना हसण्यापूर्वी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

१८०० रुपये म्हणजे किती हे समजून घेताना त्या काकूंची तारांबळ उडते, तशीच काहीशी परिस्थिती सुशिक्षित लोकांची पण असते. भारतीयांच्या एका सर्वेक्षणात काय आढळून आले आहे, ते सांगणाऱ्या या पोस्टचा सारांश

घरकाम करणाऱ्या एका काकूंचा १८०० रूपयांच्या हिशेबाचा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या क्‍लिपवर खूप जण हसलेही असतील. ‘आज जे त्या काकूंना समजत नव्हतं, ते आपल्याला समजतंय,’ म्हणून आपण शिक्षित आहोत, असा समज करून ‘ट्रोल’ करणे सोपे आहे; पण आपल्यातीलही ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जण अजून आर्थिकदृष्ट्या अशिक्षित आहेत, हे सांगणारी त्यावरील पोस्ट डोळे उघडायला लावणारी आहे. त्या काकूंवर हसण्यापूर्वी त्यावर आपण सर्वांनीच नजर टाकायला हवी. ज्या पद्धतीने १८०० रुपये म्हणजे किती हे समजून घेताना त्या काकूंची तारांबळ उडते, तशीच काहीशी परिस्थिती सुशिक्षित लोकांची पण असते. भारतीयांच्या एका सर्वेक्षणात काय आढळून आले आहे, ते सांगणाऱ्या या पोस्टचा सारांश - 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 1.  स्वतःच्या कुटुंबाचा महिन्याचा नक्की खर्च किती, हे ७० टक्के लोकांना सांगता येत नाही.
   
 2.  बचत आणि गुंतवणूक यातील फरक ५० टक्के लोकांना सांगता येत नाही.
   
 3. संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२ टक्के इतकी कमी आहे. 
   
 4. ‘ॲसेट ॲलोकेशन’ म्हणजे काय, हे ८८ टक्के भारतीयांना ठावूक नाही.
   
 5. ‘रिटर्न्स’ हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय, हे सांगणारे फक्त २ टक्के भारतीय निघाले.
   
 6. ६७ टक्के भारतीय हे ‘लाईफ इन्शुरन्स’लाच गुंतवणूक समजतात.
   
 7. वयाची चाळीशी उलटली तरी ४० टक्के लोकांना अजून टर्म इन्शुरन्स म्हणजे काय हे माहीत नाही.
   
 8.  भारतात फक्त ५ टक्के लोक आरोग्य विमा घेतात.
   
 9. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे २२ टक्के भारतीय ‘एसआयपी’ हे एका योजनेचे नाव आहे, असे समजतात.
   
 10. भारतीय शेअर बाजार हा जगातील जुन्या शेअर बाजारांपैकी एक असूनही फक्त ४ टक्के लोकच शेअरमध्ये गुंतवणूक करतात. गेल्या ३७ वर्षांत तब्बल १५.६८ टक्के परतावा देवूनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात.
   
 11. स्वतःचा इन्कम टॅक्‍स कसा ‘कॅल्क्‍युलेट’ होतो, हे अजून ६० टक्के लोकांना माहीत नाही.
   
 12. नोकरी आणि व्यवसाय करून १० वर्षे झाल्यानंतरही अनेकांना पुढील ३-६ महिन्यांच्या खर्चाची तरतूद करून ठेवता आलेली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तात्पर्य  - केवळ १८०० रुपयांचा हिशेब लावता न आल्याने त्या काकूंच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही. पण वैयक्तिक जीवनाशी निगडित आर्थिक विषयात आपण अज्ञानी राहिलो तर भविष्यात त्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. तेव्हा काकूंना हसण्यापूर्वी आपणही आर्थिक साक्षर बनायला हवे, नाही का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about bill of Rs 1800 for a domestic worker aunts video