‘ईटीएफ’ गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

सुधाकर कुलकर्णी
Monday, 16 November 2020

गुंतवणुकीसाठी एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘ईटीएफ’ हा एक चांगला पर्याय आहे. ‘ईटीएफ’ म्हणजे काय, यातील गुंतवणुकीचे फायदे काय व यात गुंतवणूक कशी करता येते, याची आज आपण थोडक्यात माहिती घेऊ.

एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंडासारखाच फंड असतो. मात्र, हा शेअर बाजारात ‘लिस्ट’ होत असल्याने शेअरप्रमाणे त्याची खरेदी-विक्री करता येते. याच्या युनिटची बाजारातील किंमत ‘अंडरलाइंग ॲसेट’च्या (मूलभूत मालमत्ता) किमतीनुसार कमी-जास्त होत असते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेंचमार्क म्युच्युअल फंडाने पहिला ‘निफ्टी ईटीएफ’ २००१ मध्ये बाजारात आणला होता. ‘ईटीएफ’साठी इक्विटी, बाँड, गोल्ड, करन्सी यासारख्या ‘अंडरलाइंग ॲसेट’ विचारात घेतल्या जातात. यामुळे ‘ईटीएफ’ शेअर व म्युच्युअल फंडासारखे असतात. यात गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते, डी-मॅट खाते व ब्रोकरकडे खाते असणे आवश्यक आहे. खरेदी-विक्री केलेल्या ईटीएफ युनिटची नोंद आपल्या डी-मॅट खात्यात होत असते.

‘ईटीएफ’ म्युच्युअल फंडासारखे असले, तरी यातील गुंतवणूक म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा पुढीलप्रमाणे फायदेशीर असते...

‘ईटीएफ’वरील भांडवली लाभ (कॅपिटल गेन) ‘ईटीएफ’ युनिटची प्रत्यक्ष विक्री केली जाते तेव्हाच विचारात घेऊन त्यानुसार ‘कॅपिटल गेन टॅक्स’ची आकारणी केली जाते. मात्र, म्युच्युअल फंडातील शेअरची खरेदी-विक्री वेळोवेळी चालू असते. त्यामुळे होणारी करआकारणी ‘ईटीएफ’पेक्षा जास्त होत असल्याने मिळणारा परतावा काही प्रमाणात कमी होतो.

‘ईटीएफ’ युनिटची खरेदी-विक्री एक्स्चेंजवर ‘स्पॉट प्राइस’ला होत असल्याने शेअरप्रमाणे डे-ट्रेडिंग करता येऊ शकते. असे म्युच्युअल फंडांच्या युनिटच्या बाबतीत करता येत नाही. कारण, म्युच्युअल फंडाच्या युनिटची खरेदी-विक्री दिवसाच्या ‘क्लोजिंग प्राइस’नुसार होत असते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘ईटीएफ’चे फंड मॅनेजमेंट चार्जेस व एक्स्पेंस रेशो हे म्युच्युअल फंडाच्या तुलनेने कमी असल्याने परतावा जास्त मिळू शकतो. गुंतवणूकदारास डेट, इक्विटी, गोल्ड, करन्सी ‘ईटीएफ’मध्ये सहजगत्या खरेदी-विक्री करता येते. प्रत्यक्ष सोने घेण्यापेक्षा ‘गोल्ड ईटीएफ’द्वारे सोन्यात गुंतवणूक करणे निश्चितच फायदेशीर ठरते.

ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची आहे; पण फारशी माहिती नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी ‘ईटीएफ’ हा चांगला पर्याय आहे. 

यात गुंतवणूक करताना पुढील बाबींचा प्रामुख्याने विचार करावा... 
मॉर्निंग स्टार रेटिंग
गेल्या तीन वर्षांचा परतावा
हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम 
लो ट्रॅकिंग एरर 
लो टोटल एक्स्पेंस रेशो

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
थोडक्यात असे म्हणता येईल, की ज्याला शेअर, म्युच्युअल फंड, बाँड, सोने, करन्सी यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारांत गुंतवणूक करावयाची आहे व तीही एकाच ठिकाणी व एकाच खात्यावर करावयाची आहे; त्यांनी वेगवेगळ्या ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करताना संबंधित ज्या ‘ईटीएफ’चे रेटिंग चांगले आहे, गेल्या तीन वर्षांचा परतावाही समाधानकारक आहे, एक्स्चेंजवर हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे; तसेच ट्रॅकिंग एरर व टोटल एक्स्पेंस रेशो कमी आहे, अशा ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक केल्यास ‘पॅसिव्ह इन्व्हेस्टर’सुद्धा (निष्क्रिय गुंतवणूकदार) चांगला परतावा मिळवू शकतो.
(लेखक सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर - सीएफपी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about ETF is a great investment option