'ही' महत्त्वाची कामे करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले वाचा सविस्तर..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

देशात मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते.केंद्रसरकारने महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.महत्त्वाची कामे करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. केंद्र सरकारने महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता ही महत्त्वाची कामे करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. यापैकी काही कामे घरी बसून ऑनलाईन माध्यमातून करता येणार आहे. तर इतर कामे "सोशल डिस्टन्सिंग' राखून पूर्ण करा.

1) पॅन व आधार जोडणी:
 पॅन व आधार जोडणी करण्यास फक्त 20 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पॅन व आधार क्रमांक जोडणीला केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जून 2020 पर्यंत जोडणी करता येईल. 

2) मागील वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र: ज्या करदात्यांनी 2018-19 या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र (आयटीआर) सादर केलेला नाही, अशा करदात्यांना 30 जूनपर्यंत शेवटची संधी आहे. 30 जूनपूर्वी करदाते 2018-19 या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र सादर करू शकतात. 

3) गुंतवणूक आणि करबचत : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खात्यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवली आहे. दरवर्षी किमान गुंतवणुकीचे "पीपीएफ' किंवा इतर अल्पबचत योजनेचे खाते सुरु केले असेल तर गेल्या वर्षीची किमान गुंतवणूक 30 जूनपर्यंत करता येईल. त्यानंतर गेल्यावर्षीसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर खातेदाराला दंड भरावा लागेल. प्राप्तिकरात सूट हवी असल्यास या महिन्यात 30 जूनपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे.  प्राप्तिकर कलम 80 सी आणि 80 डीनुसार गुंतवणूक करता येईल. कलम 80 अंतर्गत इतर उपकलमाअंतर्गत देखील खर्च किंवा गुंतवणूक करता येईल. उदा.80 डी, 80 ई, 80 जी, 80 जीजीए इ.

4) "पीपीएफ' सुरु ठेवण्यासाठी तात्काळ अर्ज भरा  : जर तुमच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची मुदतपूर्ती 31 मार्च 2020 रोजी झाली असल्यास खातेदारांना पीपीएफ खाते सुरु ठेवण्यासाठी 30 जूनपूर्वी अर्ज भरण्यास संधी आहे. लॉकडाउनमुळे अनेकांना पोस्टात जाऊन अर्ज भरता आला नव्हता. त्यावर केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.

5)ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजना : केंद्र सरकारने फेब्रुवारी ते एप्रिल 2020 या कालावधीत सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करण्यास 30 जूनपर्यंत  मुदतवाढ दिली आहे. निवृत्त  झाल्यावर एक महिन्यात सदर गुंतवणूक करावी लागते. फेब्रुवारी ते एप्रिल 2020 मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता 30 जूनपर्यंत ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेत गुंतवणुकीची संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Investment and tax savings PPF Senior Citizen Investment Plan