esakal | कठीण समय येता, "पीपीएफ' कामास येई... 
sakal

बोलून बातमी शोधा

कठीण समय येता, "पीपीएफ' कामास येई... 

उद्योग-व्यवहार ठप्प झाले आहेत.बऱ्याच जणांना वेतनकपात,कर्मचारीकपात यासारख्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.अशा आणीबाणीच्या प्रसंगी तुमच्याकडे"पब्लिक प्रॉव्हिडंट फंड'अर्थात"पीपीएफ'चे खाते आधार देऊ शकते

कठीण समय येता, "पीपीएफ' कामास येई... 

sakal_logo
By
मुकुंद लेले

कोविड-19 च्या संकटामुळे सगळीकडे लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे उद्योग-व्यवहार ठप्प झाले आहेत. बऱ्याच जणांना वेतनकपात, कर्मचारीकपात यासारख्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी तुमच्याकडे "इमर्जन्सी फंड' नसेल तर "पब्लिक प्रॉव्हिडंट फंड' अर्थात "पीपीएफ'चे खाते आधार देऊ शकते. शिवाय, कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने या योजनेसाठी काही सवलतीही दिल्या आहेत. यानिमित्ताने "पीपीएफ'च्या काही महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर नजर टाकूया. 

- नव्या बदलांनुसार, "पीपीएफ'मध्ये सरलेल्या आर्थिक वर्षातील (2019-20) करबचतीची गुंतवणूक 30 जूनपर्यंत करता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- 31 मार्च 2020 पर्यंत ज्यांना या खात्यात किमान रक्कम (500 रुपये) भरता आलेली नसेल, त्यांना 30 जूनपर्यंत 50 रुपयांचे दंडशुल्क न देता पैसे भरता येणार आहेत. 

- "पीपीएफ'मध्ये आता एका आर्थिक वर्षात (दीड लाख रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत) कितीही वेळा पैसे भरता येणार आहेत. पूर्वी जास्तीतजास्त 12 वेळा पैसे भरण्याची मुभा होती. 

- "पीपीएफ'च्या खात्यात आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यांत पैसे भरल्यास जास्तीत जास्त लाभ मिळविता येऊ शकतो. महिन्याच्या पाच तारखेपर्यंत खात्यात पैसे भरल्यास त्या महिन्यापासूनच व्याज सुरू होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- चालू तिमाहीसाठी "पीपीएफ'चा व्याजदर कमी करून 7.1 टक्‍क्‍यांवर आणला असला तरी बॅंकांतील एफडीचे सध्याचे व्याजदर, सुरक्षितता, करबचतीची सवलत आणि करमुक्त व्याज या कारणांमुळे ही योजना अधिक आकर्षक ठरताना दिसते. 

- मूळ योजना 15 वर्षांची असली तरी त्यापुढे खात्यात पैसे भरणे चालू ठेवून किंवा पैसे न भरताही 5-5 वर्षांसाठी कितीही वेळा मुदत वाढविता येते. 

- खाते सुरू केल्यानंतर सातव्या आर्थिक वर्षात तुम्हाला पाचव्या आर्थिक वर्षानंतरच्या शिलकी रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येते. 

- खाते सुरू केल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून सहाव्या वर्षापर्यंत आधीच्या वर्षातील शिल्लक रकमेच्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत कर्जही मिळू शकते. 

- या कर्जावर "पीपीएफ'चे सध्याचे व्याज सोडून अतिरिक्त 1 टक्‍क्‍याने व्याज लागू होते. पूर्वी ते 2 टक्के होते. (उदा. 7.1 अधिक 1 टक्का) 

- सध्याच्या काळात पैशाची गरज असेल तर पर्सनल लोनच्या (व्याजदर ः 12 ते 18 टक्के) तुलनेत असे कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते. 

- म्युच्युअल फंडाचा लाभांशही आता गुंतवणूकदाराच्या हातात करपात्र ठरणार असल्याने, करमुक्त उत्पन्नाची जननी समजल्या जाणाऱ्या "पीपीएफचे महत्त्व वाढले आहे. 

- या खात्यातील शिल्लक कोणत्याही आदेशानुसार किंवा न्यायालयाच्या "डिक्री'अंतर्गत जप्तीच्या अधीन असत नाही. 

- हे खाते किमान पंधरा वर्षांसाठी असल्याने मुदतीपूर्वी बंद करता येत नव्हते. आता खातेदाराच्या सहचऱ्याचे, मुलांचे, पालकांचे गंभीर आजारपण किंवा खातेदाराच्या वा खातेदारावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या शुल्कासाठी; तसेच परदेशातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षणसंस्थेत प्रवेशनिश्‍चितीच्या खर्चासाठी किंवा निवासी व्यक्ती अनिवासी झाल्यास पाच वर्षांनंतर खाते बंद करून संपूर्ण रक्कम परत घेता येऊ शकते. असे करताना खातेदाराला मिळालेल्या व्याजाच्या एक टक्का व्याज परत करावे लागते. 

- खाते मुदतपूर्व वा मुदतपूर्तीनंतर बंद झाल्यास नवे खाते उघडण्याचा पर्याय आता उपलब्ध करण्यात आला आहे. 

- हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) तसेच अनिवासी भारतीयांना (एनआरआय) "पीपीएफ'चे खाते उघडता येत नाही.