नोटा रद्द झाल्यानंतरचे बदललेले असेही दिवस! 

100 rupee notes
100 rupee notes

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री रु. 500 व 1000 च्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. बातमी काही सेकंदात वाऱ्यासारखी पसरली. टीव्ही, मोबाईलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचली. "त्या' वेळेपासून आतापर्यंत अनेकांच्या मनात, घराघरांत, मित्रमंडळी, कार्यालयीन सहकारी यांच्यात काय झाले, काय विचार आले, काय अनुभव आले, काय भावना अनुभवल्या, ते मांडायचा हा प्रयत्न... 

"त्या' दिवशी बातमी ऐकल्यावर थोडा वेळ विश्‍वासच बसत नव्हता. मग सुरू झाले ते एकमेकांना सांगायचा प्रयत्न. ""मी तुला मागेच सांगितले होते, मला याचा अंदाज होताच, मोदी असे काहीतरी करणार...,'' हे सांगायला सुरू झाले. त्यासाठी एकमेकांची साक्ष काढणेही सुरू झाले. सरकारच्या निर्णयावर काही जण खूपच खूष झाले, काही जण (जबरदस्तीने) आपण खूष असल्याचे भासवायला लागले. ज्याच्या त्याच्या मनात हिशेब व आढावा सुरू झाला. काही जण सल्ला देणारे झाले, तर बरेच जण घेणारे झाले. तोपर्यंत अफवा सुरू झाल्या. रात्री "एटीएम' केंद्रांसमोर मोठ्या रांगा लागल्या. त्यातच दुसऱ्या दिवशी बॅंका बंद... पेट्रोल पंपांवर रांगा सुरू झाल्या. महागड्या गाड्या घेतलेले लोक पेट्रोल, डिझेलच्या रांगेत उभे राहताना दिसू लागले, तर सोन्याचा भाव अचानक गगनाला भिडल्याचे कळू लागले. कालपर्यंत ज्या नोटांमध्ये "मोठी ताकद' होती, ती एका क्षणात संपली होती. ज्या नोटांची ऊब होती, रुबाब होता, सत्ता होती, ती एक क्षणात गायब झाली होती. नोटा रद्द होऊन फक्त बदलल्या जाणार आहेत, हे समजत होते; पण मन मानत नव्हते. 

दुसऱ्याच दिवसापासून सी.एं.ना फोन सुरू झाले. त्यांचा भाव अचानक वाढला होता. प्रत्येक जण दाखवत होता, तसा मला काही फार "प्रॉब्लेम' नाहीये, मी कालच "कॅश' कशी दिली, हेही सांगू लागला. त्याच वेळी, नुकतेच झालेले "कॅश'चे व्यवहार वांद्यात पडायला लागले होते. ज्यांना देणे होते ते फोन करून "कॅश' न्यायची विनंती करायला लागले, अर्थातच जुन्या नोटांमध्ये! 

खरी गंमत झाली ती गृहिणींची. कालपर्यंत विचारले तर त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण अचानक त्याच्याकडून पैसे बाहेर येऊ लागले. पत्नी, आई, बहीण कोणीही असो, अनेक वर्षे काटकसर करून अडीअडचणीला राहावेत म्हणून त्यांनी पैसे साठवले होते. आडवळणाने "माझ्याकडच्या नोटांचे काय होणार?,' असे प्रश्‍न विचारायला लागले. आता जुन्या नोटा बॅंकेत भरण्याची व बदलण्याची सोयपण झाली आहे. पण गृहिणींना "माझ्या कपाटातले पैसे म्हणजेच माझे पैसे'. बॅंकेत भरले म्हणजे ते माझे राहत नाहीत, असे अजूनही वाटते आहे.

आतापर्यंत सर्वाधिक आकर्षणाच्या नोटा न चालणाऱ्या झाल्या, त्यांचे नाव क्षणात "जुन्या नोटा' झाले. अगदी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेटीएम असले, तरी चहा, नाश्‍ता, जेवण करायला, भाजी, दूध व इतर किरकोळ खरेदीला पैसे तर हवेतच. 500, 1000 च्या नोटा बाद झाल्यानंतर 100, 50, 20, 10 ला खूपच किंमत आली. लहानपणी आपण "व्यापार' हा खेळ खेळायचो. आपण खूप श्रीमंत झालेलो असताना अचानक खेळ थांबवून, आवरायला लागायची वेळ यावी, तसे वाटायला लागले. 

निर्णयानंतर एक आठवडा झाला तरी या धक्‍क्‍यातून अजून बरेच जण सावरत आहेत. खरे तर पैशाची किंमत यानिमित्ताने कळली. गेल्या आठवडाभरात आपल्या गरजा किती कमी होऊ शकतात, हे समजले. एक दिवसाच्या पूर्वीच्या खर्चात संपूर्ण आठवडा निघाला. नेहमीच्या किराणा, भाजी, चहा, हॉटेलवाल्यांनी बिलाचे पैसे नंतर द्या, असे सांगून माणुसकीचे दर्शन घडवले. काहींनी जुन्या 500, 1000च्या नोटा घेतो; पण पूर्ण रकमेचा माल घ्यावा लागेल, असा प्रेमळ (जबरदस्तीचा) आग्रह केला. जुन्या नोटा "खपतात' म्हणून लोकांनी भविष्यासाठी जादा माल खरेदी केला. जुन्या नोटा चालतात म्हणून लोक वारंवार डिझेल, पेट्रोल भरायला लागले. जुन्या नोटा घेणे जेथे सुरू आहे, तेथे जाऊन जुनी येणी देऊ लागले. अल्पावधीत "ई-वॉलेट'चा वापर वाढला. जो तो आपल्यापेक्षा जास्त अडचण कोणाला आहे, ते ऐकून सुखावू लागला. त्याचबरोबरीने पंतप्रधानांचे भाषण सर्वत्र ऐकले जाऊ लागले. देशप्रेम अचानक प्रचंड वाढायला लागले. देशाच्या भवितव्याबाबत प्रत्येकाच्या मनात आशा उंचावल्या, तर दुसरीकडे विरोधकांकडून "मोदीविरोधी सूर' उमटू लागले. एका बाजूला मोदींबद्दल प्रचंड आदर, तर दुसऱ्या बाजूला धसका... थोड्या दिवसांनी नवीन काय येणार? मोदी हे आता कठोर निर्णय घेऊ शकतात व ते कृतीत आणू शकतात, हे समजून येऊ लागले आणि कर चुकविणाऱ्यांचे धाबे दणाणले. मूळ धंदा-व्यवसायावरील लक्ष कमी होऊन घरातील "कॅश'चे काय करायचे, याचीच काळजी आणि चिंता! अर्थात "कर नाही त्याला डर कशाला' या म्हणीची प्रचितीही आली. ज्यांनी सर्व हिशेब व्यवस्थित ठेवले आहेत, कर भरले आहेत, ती मंडळी खूप खूष आहेत. इतके दिवस, "आपण संपूर्ण कर भरतो व इतर भरत नाहीत, हे कसे चालते?' या मनातील प्रश्‍नाला दिलासादायक उत्तर मिळाले आहे. "सच्चाईला शाबासकी' आणि करचोरी करणाऱ्यांना दणका बसल्याचे समाधान अवर्णनीय आहे. आता एकदा घरातील सर्व पैसे बॅंकेत भरले, की कपाटातील पैसे हा विचारच मनात येणार नाही. त्यानंतर बॅंकेच्या खात्यातून पैसे काढून खर्च करताना विचार केला जाईल, वायफळ खर्च कमी होतील.

थोड्याच दिवसांत परिस्थिती निवळायला लागेल. नव्या नोटा तसेच कमी मूल्याच्या नोटा चलनात यायला लागल्या आहेत. जो निर्णय सरकारने घेतला आहे, तो अनपेक्षित असला तरी काळ्या पैशाला काही प्रमाणात तरी आळा घालणारा आहे. दीर्घकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगला ठरू शकणारा आहे. ज्यांनी बेहिशेबी पैसा जमवला आहे, त्यांना 30 डिसेंबरपर्यंत नोटा बदलता येणार नाहीत. त्यांच्याबद्दल कोणालाच सहानुभूती असणार नाही. प्रामाणिकपणे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना चिंता, काळजी करण्याचे कारण नाही. विनाकारण भयभीत होऊन रोज बॅंका किंवा पोस्टासमोर गर्दी करण्याची गरज नाही. "देशासाठी मलाही काहीतरी करायचे आहे,' असे विचार मनात बाळगऱ्यांनी अशा परिस्थितीत थोडा संयम पाळून परिपक्वतेचे दर्शन घडविले तरी ते पुरेसे आहे... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com