‘पेटीएम’ करो!

अतुल कहाते
Monday, 1 February 2021

नोटाबंदीच्या घोषणेनंतर ‘पेटीएम’ला एकदम सुगीचे दिवस आले.नोटांवर बंदी आल्यामुळे लोकांना आपले आर्थिक व्यवहार करताना असंख्य अडचणी येत असत.याचा फायदा उठवून ‘पेटीएम’ने खूप मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळविले.

खरे म्हणजे ‘पेटीएम’ हे तंत्रज्ञान नव्हे; ‘पेटीएम’ ही एक कंपनी आहे. असे असले तरी ‘पेटीएम’विषयी सगळीकडे खूप बोलले जाते आणि लोकांना ठिकठिकाणी या कंपनीचे बोधचिन्हसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर दिसत राहते, त्यामुळे त्याविषयी स्वतंत्रपणे लिहिणे गरजेचे आहे. ‘पेटीएम’ नक्की कशाची कंपनी आहे, याचे उत्तर देणे कठीण आहे. सुरवातीला ‘पेटीएम’चा उदय हा आपल्या स्मार्टफोनमधील आपले पैशांचे पाकीट (वॉलेट) अशा धर्तीवर झाला. कालांतराने ‘पेटीएम’ने इतरही अनेक गोष्टींमध्ये प्रवेश केल्यामुळे ‘पेटीएम’चा आवाका वाढत गेला.

नोटाबंदीच्या घोषणेनंतर ‘पेटीएम’ला एकदम सुगीचे दिवस आले. मोठ्या नोटांवर बंदी आल्यामुळे लोकांना आपले आर्थिक व्यवहार करताना असंख्य अडचणी येत असत. याचा फायदा उठवून ‘पेटीएम’ने खूप मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळविले. याचे कारण म्हणजे ग्राहक आणि दुकानदार किंवा पैसे देणारा आणि तो घेणारा या दोघांच्याही स्मार्टफोनवर ‘पेटीएम’चे अॅप असले, की काम व्हायचे. त्याद्वारे पैसे एकमेकांना हस्तांतरित करणे खूप सोपे झाले. अर्थात यासाठी मुळात आपल्या स्मार्टफोनमधील ‘पेटीएम’च्या वॉलेटमध्ये पैसे असायला हवेत. हे पैसे आपण आपले बॅंक खाते किंवा डेबिट कार्ड वापरून ‘पेटीएम’ वॉलेटमध्ये भरू शकतो. म्हणजेच जशी आपण थोडी रोकड रक्कम आपल्या खिशातील किंवा पर्समधील पाकिटात ठेवतो; तसेच आपण ‘डिजिटल’ किंवा आभासी पैसे ‘पेटीएम’ वॉलेटमध्ये ठेवतो. इतरांनी आपल्या ‘पेटीएम’ला पैसे पाठवले तर आपल्या ‘पेटीएम’ वॉलेटमधील शिल्लक असलेल्या रकमेचा आकडा त्या प्रमाणात वाढतो. आपण ‘पेटीएम’ने पैसे दिले, की आपल्या ‘पेटीएम’ वॉलेटमधील शिल्लक असलेल्या रकमेचा आकडा त्या प्रमाणात कमी होतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आधी उल्लेख करण्यात आलेल्या ‘युपीआय’ तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे ‘पेटीएम’च्या वाढीला एकदम खिळ बसली. त्याविषयी आपण पुढच्यावेळी बोलणार आहोत; पण थोडक्यात सांगायचे, तर ‘युपीआय’ने आपली बॅंक खातीच इतर लोकांच्या बॅंक खात्यांशी व्यवहार करण्यासाठी जोडून दिली. ‘पेटीएम’मध्ये असे होत नव्हते. ‘पेटीएम’कडे स्वतंत्रपणे पैसे ठेवावे लागायचे. यामुळे या आघाडीवर जरा मागे पडू लागताच या बाबतीत ‘पेटीएम’ने सुधारणा केल्या आणि स्वत:लाही ‘युपीआय’शी जोडून घेतले. म्हणजेच आता ‘पेटीएम’चा वापर ‘वॉलेट’ म्हणून किंवा बॅंक खात्याद्वारे; अशा दोन्ही पद्धतींनी शक्य झाला. त्याबरोबर ‘पेटीएम’चा वापर पुन्हा काही प्रमाणात वाढत गेला. आता तर ‘पेटीएम’ वापरून बिले भरणे, विमा योजना विकत घेणे, म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे यांसारख्या अनेक गोष्टीसुद्धा करता येतात.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul kahate writes article paytm