फिनटेक : ‘यूपीआय’चा आधुनिक अवतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPI

युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढला आहे. आतापर्यंत ‘यूपीआय’ची सुविधा फक्त स्मार्टफोनधारकच वापरू शकत असत.

फिनटेक : ‘यूपीआय’चा आधुनिक अवतार

युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढला आहे. आतापर्यंत ‘यूपीआय’ची सुविधा फक्त स्मार्टफोनधारकच वापरू शकत असत. ज्या लोकांकडे साधा, म्हणजेच फीचर फोन आहे, त्यांना या तंत्रज्ञानाचा वापर करता येत नसे. भारतामध्ये अजूनही बहुसंख्य लोकांकडे साधा फोन असल्यामुळे ते ‘यूपीआय’ तंत्रज्ञानापासून वंचित होते. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आता साधा फोन वापरत असलेल्या लोकांनाही ‘यूपीआय’ तंत्रज्ञान वापरता येईल, अशी घोषणा नुकतीच केली आहे.

‘यूपीआय’ तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा म्हणजे आपल्या बँकेच्या खात्याला आपण गुगल पे, फोन पे अशांसारख्या ॲपनी जोडू शकतो. त्यानंतर ही ॲप वापरत असलेल्या, तसेच ती वापरत नसलेल्या; पण बँक खाते असलेल्या कोणाबरोबरही आपण बँकांचे थेट व्यवहार करू शकतो. अर्थातच यासाठी इंटरनेटची गरज भासते. आता मात्र ज्या लोकांच्या फोनला इंटरनेट कनेक्शन नसेल, त्यांनासुद्धा ‘यूपीआय’ची सुविधा वापरता येईल. इंटरनेट नसताना ‘यूपीआय’ वापरणे कसे शक्‍य आहे, असा प्रश्‍न साहजिकच आपल्याला पडेल. याचे उत्तर म्हणजे मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानामध्ये संदेश पाठविण्यासाठी एसएमएस, युएसएसडी अशा प्रकारच्या सुविधा असतात. ज्या लोकांकडे साधा फोन आहे, त्यांनासुद्धा ‘यूपीआय’ वापरणे शक्य व्हावे, यासाठी आता नेमक्या याच प्रकारच्या सुविधांचा वापर केला जाईल. म्हणजेच त्यांच्याकडे साधा फोन असणे, तसेच त्यांच्या फोनला इंटरनेटचे कनेक्शन नसणे, या अडचणी आता दूर होतील.

साहजिकच ‘यूपीआय’ची व्याप्ती खूप वाढेल. तसेच बँकांचे छोटे-मोठे व्यवहार करण्यासाठी अशा लोकांना येत असलेल्या अडचणी, त्यांचा वाया जात असलेला वेळ या बाबींमध्येही बचत होईल. अर्थात स्मार्टफोनधारकांना ज्या सहजपणे ‘यूपीआय’ वापरणे शक्य असते, तितक्याच सहजपणे साध्या फोनवर कदाचित ‘यूपीआय’ वापरता येणार नाही. कारण अशा फोनवर ‘यूपीआय’ वापरणे म्हणजे थोडे कष्टाचे काम असेल. तरीही त्याबाबतीतील जुजबी प्रशिक्षण घेतल्यावर ‘यूपीआय’ वापरणे शक्य होईल.

सरसकट सर्वांकडे स्मार्ट फोन असणे अपेक्षित नाही, ही अडचण ओळखून रिझर्व्ह बँकेने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याच्या जोडीला महत्त्वाचा वाटणारा दुसरा एक मुद्दा म्हणजे नजीकच्या भविष्यात भारतामध्ये सरकारी आभासी चलन, म्हणजेच ‘डिजिटल रुपी’ अवतरण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी ‘यूपीआय’ आणि हे नवे आभासी चलन यांची नेमकी कशी सांगड घातली जाईल, याविषयी विलक्षण कुतूहल आहे. त्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या लोकसंख्येला आता ‘यूपीआय’मध्ये सामावून घेत, रिझर्व्ह बँकेने कदाचित ‘यूपीआय’ला आभासी चलनाशी जोडण्यासाठीची पावलेही उचलली असावीत. अर्थातच याविषयी आता काही ठामपणे सांगणे अवघड आहे; पण लवकरच त्याविषयीची स्पष्टता आपल्यासमोर येईल, असे वाटते.

Web Title: Atul Kahate Writes Fintek Upi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UPIAtul Kahate
go to top