कोरोनाविरुद्ध आर्थिक मोर्चे बांधणी करू या!

अतुल सुळे
Monday, 20 April 2020

देशाच्या अर्थव्यवस्थेला 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अधिक खीळ बसली आहे.सरकारने व कंपन्यांनी आपापले आर्थिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना या अदृश्य शत्रूने जगभर धुमाकूळ घातला आहे. यामुळे किती जणांचा बळी जाणार व तो कधी नियंत्रणात हे कोणीच सांगू शकत नाही. आधीच अडचणीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अधिक खीळ बसली आहे. सरकारने व कंपन्यांनी आपापले आर्थिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेक जणांना 30 टक्के आणि 50 टक्के पगार कपातीला सामोरे जावे लागणार आहे. कित्येक जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत, व्यवसाय बंद पडणार आहे. मात्र अशा बिकट संकटाने घाबरून न जाता त्याला धैर्याने तोंड देण्यासाठी आर्थिक मोर्चे बांधणी कशी करावी ते थोडक्यात बघुया.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) सर्वप्रथम आपल्या संपत्तीचा आढावा घ्या. उदा. आपल्याकडे 'रिअल इस्टेट', सोने, मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, शेअर, म्युच्युअल फंड, पोस्टाच्या योजना आणि बचत खात्यात किती गुंतवणूक आहे याची नोंद करा.

2) सध्याच्या परिस्थितीत तरलतेला (लिक्विडीटी) प्राधान्य द्या म्हणजे फारसे नुकसान न होता आपल्याला किती 'कॅश' उभी करता येईल  ते पहा. कारण सध्या 'कॅश इज किंग'

3) आपल्या खर्चाचे वर्गीकरण करून कोणता खर्च कमी करता येईल, याचे पर्याय तपासून पहा.

4) उत्पन्न वाढवण्यासाठी इतर पर्याय तपासून पहा.

5) रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, वित्तीय संस्थानी देऊ केलेल्या तीन महिन्यांच्या 'ईएमआय हॉलिडे'ची सवलत विचारपूर्वक आणि आवश्यकता असल्यास घ्या.

6)आपल्या स्वतःच्या 'एफडी', 'आरडी'वर अथवा 'एनएससी'वर कमी व्याजदराने कर्ज काढून जास्त व्याजदराची कर्जे फेडून टाका. उदा. वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डचे कर्ज.

7)फारच निकड पडल्यास आपल्या 'पीपीएफ' किंवा 'पीएफ'मधून पैसे उचला.

8)जेष्ठ नागरिक 'रिव्हर्स मॉर्गेज' किंवा 'लोन अगेंस्ट  प्रॉपर्टी'चा विचार करू शकता.

9)आरोग्य विम्याचे हप्ते (प्रीमियम) एकरकमी न भरता मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही हप्त्यात भरा.10) म्युच्युअल फंडात मोठी रक्कम जमा असल्यास 'एसडब्ल्युपी'द्वारे (सिस्टेमॅटिक विदड्रॉल प्लॅन) नियमित ठराविक रक्कम मिळवू शकता. आवश्यकता असेल तरच म्युच्युअल फंडातील रक्कम काढा अन्यथा त्यात भर घाला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक आरोग्य सांभाळताना आपली आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. म्हणतात ना 'सर सलामत तो पगडी पचास'.

 'टफ टाईम्स डू नॉट लास्ट बट टफ इन्स्टिट्युशन्स अँड टफ पीपल डू'. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा.

चला तर सर्वजण मिळून याही संकटावर धैर्याने मात करू या...!

(लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul sule article about financial