अर्थभान : ‘का डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?’

दीपावलीचा सण समाप्त होताच आठ नोव्हेंबर रोजी ‘पेटीएम’ या लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्मची मालक कंपनी असलेल्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा भारताच्या इतिहासातील ‘मेगा आयपीओ’ बाजारात दाखल झाला.
Vijay Shekhar Sharma
Vijay Shekhar SharmaSakal

दीपावलीचा सण समाप्त होताच आठ नोव्हेंबर रोजी ‘पेटीएम’ या लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्मची मालक कंपनी असलेल्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा भारताच्या इतिहासातील ‘मेगा आयपीओ’ बाजारात दाखल झाला. या रु. १८,३०० कोटींच्या इश्यूने ‘कोल इंडिया’चे रेकॉर्ड मोडले. या पैकी रु. ८३०० चे नवे शेअर जारी करण्यात येणार होते, तर रु. १०,००० कोटींची ‘ऑफर फॉर सेल’ होती. रु. १ दर्शनी मूल्याचा शेअर रु. २०८० ते रु. २१५० या किंमतपट्टयात देण्यात आला. कंपनी अजूनही तोट्यात असल्याने आणि भाव जास्त वाटल्याने या इश्यूला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तो जेमतेम १.८९ पट ‘सबस्क्राइब’ झाला. ‘ग्रे मार्केट’मधील ‘प्रीमियम’ही किरकोळ होते. अशातच ‘मक्वारी रिसर्च’ या संस्थेने ‘पेटीएम’ला ‘अंडरपरफॉर्म रेटिंग’ देऊन रु. १२०० चे प्राइस टार्गेट दिले! अशा परिस्थितीत १८ नोव्हेंबरला म्हणजे नोंदणीच्या (लिस्टिंग) दिवशी काय घडतेय, याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागलेली होती आणि ‘लिस्टिंग’च्या दिवशी जे घडले ते अभूतपूर्व होते!

एकीकडे या कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या डोळ्यात स्वप्नपूर्तीचे आनंदाश्रू दिसत होते, तर दुसरीकडे १० लाखांपेक्षा अधिक छोट्या गुंतवणूकदारांच्या डोळ्यांपुढे ‘लिस्टिंग’चा भाव बघून तारे चमकते होते! या शेअरची नोंद सुमारे ९ टक्के डिस्काउंटने रु. १९५५ ने झाली आणि बाजार बंद व्हायच्या आधी अर्धा तास, विक्रीच्या दबावामुळे २० टक्क्यांचे खालचे ‘सर्किट’ लागून भाव रु. १५६० पर्यंत कोसळला, म्हणजेच एका शेअरमागे रु. ५८९ (२७ टक्के) चे नुकसान!

या घटनाक्रमातून अनेकांना अनेक धडे मिळाले, ते असे-

  • छोट्या गुंतवणूकदारांनी ‘आयपीओ’ची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी. केवळ कंपनीचा ‘बँड’ लोकप्रिय आहे व शेजाऱ्याने इतर ‘आयपीओ’त भरपूर पैसा कमाविला म्हणून सरसकट सर्व इश्यूंना अर्ज करू नये.

  • कंपनीचे ‘व्हॅल्युएशन’ योग्य आहे का ते नीट तपासून पाहावे. गेली अनेक वर्षे तोट्यात असलेल्या व नफ्यात कधी येणार, हे माहित नसलेल्या कंपनीच्या रु. १ दर्शनी मूल्याच्या शेअरला रु. २१५० भाव देणे कितपत योग्य, हा प्रश्न स्वतःलाच विचारावा.

  • कंपन्यांनी, व्यवसायात स्थिरस्थावर होण्याआधी नफा कमाविण्याआधीच केवळ बाजारातील तेजीचा लाभ उठविण्यासाठी बाजारात ‘आयपीओ’ आणू नयेत.

  • कंपनीचे ‘बिझनेस मॉडेल’ नीट तपासून पाहावे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. ‘पेटीएम’बद्दल बोलायचे झाले, तर या कंपनीने अनेक व्यवसायात हात घातला आहे; पण नेतृत्व कोणत्याच व्यवसायात नाही. ‘डिजिटल पेमेंट’ व्यवसायातील पुढाकार व नेतृत्व ‘युपीआय’च्या स्पर्धेमुळे धोक्यात आले आहे.

  • बुक रनिंग लिड मॅनेजर, बँकरनी ‘आयपीओ’ची किंमत ठरविताना नव्या गुंतवणूकदारांना सुद्धा काहीतरी मिळेल, असा भाव ठरवावा.

  • ‘सेबी’ने ‘फिनटेक’ कंपन्यांची अवस्था ‘डॉटकॉम’ कंपन्यांसारखी होणार नाही ना, याची काळजी घ्यावी.

(लेखक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com