‘अर्थ’बोध : ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’ | Book | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

the psychology of money
‘अर्थ’बोध : ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’

‘अर्थ’बोध : ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’

sakal_logo
By
अतुल सुळे

‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’ या पुस्तकाचे लेखक ‘द कोलॅबोरेटिव्ह फंड’चे भागीदार आणि प्रख्यात स्तंभलेखक आहेत. अनेक जणांचा असा समज असतो, की पैसा कमविणे, बचत आणि गुंतवणूक करणे, पैशाचे व्यवस्थापन करणे, संपत्तीनिर्मिती करणे यासाठी गणिती बुद्धी, फॉर्म्युले, कॉम्प्युटरचे ज्ञान यांची आवश्यकता असते. परंतु, या पुस्तकात लेखकाने अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे, की पैसा हे आनंद मिळण्याचे केवळ एक साधन असून, पैशाकडे बघण्याची आपली मानसिकता कशी आहे, यावरून सुद्धा तुम्ही आयुष्यात सुख-समाधान आणि शांती प्राप्त करू शकणार आहात की नाही, ते ठरत असते.

या पुस्तकातील काही ठळक मुद्दे असे...

  • अर्थविश्व हे इतके गुंतागुंतीचे आहे, की बऱ्याच गोष्टीत नशिबाचा भाग असतो, हे मान्य करा. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका; विनयी राहा; तसेच पैसा नसेल तर स्वतःला दोषही देऊ नका.

  • जेवढा तुमचा अहंकार कमी, तेवढी तुमची संपत्ती अधिक! दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही महागड्या वस्तू खरेदी केल्या तर संपत्तीनिर्मिती होणार नाही. श्रीमंती ही दिसते, तर संपत्ती दिसत नाही. तुमचा अहंकार आणि तुमचे उत्पन्न यातील फरक म्हणजेच बचत!

  • बचत करण्यासाठी काही उद्दिष्ट असलेच पाहिजे, असे नाही. भविष्यकाळात येऊ शकणाऱ्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी बचत करणे गरजेचे असते.

  • पैशाचे अशा पद्धतीने व्यवस्थापन करा, की तुम्हाला रात्री सुखाची झोप लागेल.

  • तुम्हाला उत्तम गुंतवणूकदार व्हायचे असेल, तर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या वाढीसाठी जास्तीत जास्त वेळ द्या.

  • पैशाचा सदुपयोग आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी करून घ्या.

  • तुमच्या गुंतवणुकीच्या करिअरमध्ये चुका होणारच हे मान्य करा; फक्त एवढ्या मोठ्या चुका करू नका, की तुमची सर्वच्या सर्व संपत्तीच नाहीशी होईल.

पैशाकडे पाहण्याचा संतुलित दृष्टिकोन प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

loading image
go to top