गुंतवणुकीची संधी: 'भारत बॉण्ड ईटीएफ'

अतुल सुळे
Monday, 1 June 2020

भारत बॉण्ड ईटीएफ हा निफ्टी भारत बॉण्ड इंडेक्सला ट्रॅक करतो.  करबचतही करायची असल्यास या योजनेत गुंतवणूक करावी.  मात्र मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक चालू ठेवायची तयारी असेल तर...   

डिसेंबर 2019 मध्ये भारतातील पहिला "बॉण्ड ईटीएफ' म्हणजेच "एक्सचेंज ट्रेडेड फंड' बाजारात "भारत बॉण्ड ईटीएफ' या नावाने दाखल झाला. या निमित्ताने गुंतवणूकदारांना केंद्र सरकारच्या काही ठराविक "ट्रिपल ए' रेटिंग असलेल्या "पीइसयु'च्या कर्ज रोख्यांत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. ही सरकारी योजना असून ती राबविण्याची जबाबदारी "एडलवाईज अॅसेट  मॅनेजमेंट कंपनी'ला देण्यात आली आहे. या पहिल्या सिरीजमध्ये एप्रिल 2023 व एप्रिल 2030 मध्ये मुदत पूर्ण होणारे दोन ईटीएफ लाँच करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या चांगल्या प्रतिसादामुळे सरकार 12 हजार 400 कोटी रुपये गोळा करू शकले. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एप्रिल 2025 व एप्रिल 2031 मध्ये मुदत पूर्ण होणारे दोन ईटीएफ लाँच होणार आहेत. हे फंड जुलै 2020 बाजारात दाखल होणार आहेत. या फंडाद्वारे सरकार 3 हजार कोटी रुपये + 11 हजार कोटी रुपये "ग्रीन शु ऑप्शन'. म्हणजे, एकूण 14 हजार कोटी रुपये गोळा करणार आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये समजून घेऊया.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

1) आतापर्यंत "भारत 22' व "सीपीएसई' हे दोन ईटीएफ अस्तित्वात होते. परंतु ते 'पीएसयु' (सरकारी कंपन्यांच्या) शेअरमध्ये गुंतवणूक करतात. तर "भारत बॉण्ड ईटीएफ' ट्रिपल ए रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक करतो.

2) फंडाची युनिट "एनएफओ'च्या काळात किंवा त्यानंतर दुय्यम बाजारातून (स्टॉक एक्सचेंजवरून) खरेदी करता येतात. त्यासाठी डीमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे. 

3) डीमॅट अकाऊंट नसल्यास, "भारत बॉण्डच्या फंड ऑफ फंड'मध्ये गुंतवणूक करू शकता. 

4)या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये व त्यापटीत गुंतवणूक करावी लागते. 

5) या योजनेला "लॉक इन' नसला तरी "फिक्स मॅच्युरिटी डेट' (एप्रिल 2025 व एप्रिल 2031) आहे.

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

6) मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळू शकतो याची कल्पना योजना सुरू होण्याच्या सुमारास देण्यात येते, ज्याला "इंडिकेटीव्ह यील्ड' असे म्हणतात. मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा मिळू शकतो. परंतु तो व्याजाच्या दरांच्या चढ-उतारावर अवलंबून असतो. 

7)तीन वर्षांच्या आत गुंतवणूक विकल्यास आपापल्या टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे अल्पकालीन भांडवली नफ्यावर प्राप्तिकर भरावा लागतो. तीन वर्षांनंतर विकल्यास "इंडेक्सेशन'च्या लाभानंतर झालेल्या दीर्घकालीन नफ्यावर 20 टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. 

8) हा ईटीएफ फक्त "ट्रिपल ए' मानांकित सार्वजनिक क्षेत्रातील कर्जरोख्यांत गुंतवणूक करीत असल्याने सुरक्षित असतो. शिवाय योजनेत अनिवासी भारतीय देखील गुंतवणूक करू शकतात. 

9) या फंडाचा व्यवस्थापन खर्च अत्यल्प म्हणजे 0.0005 टक्के असल्याने परतावा अधिक मिळू शकतो. 

10) युनिट्सची खरेदी विक्री सुलभ व्हावी म्हणून एडलवाईज मार्केट मेकर्स नेमते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारत बॉण्ड ईटीएफ हा निफ्टी भारत बॉण्ड इंडेक्सला ट्रॅक करतो. सिरीज क्रमांक एकमध्ये गुंतवणूक केलेल्या काही कंपन्यांची नावे: आरईसी, नाबार्ड पीएफसी, हुडको, एनएचएआय, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एक्झिम बँक, सीडबी, आयओसी, एचपीसीएल.

ट्रेडिंगच्या ऑफ अटर्नीच्या निकषांच्या अंमलबजावणीची मुदत सेबीने वाढवली

मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा सुरक्षितरित्या मिळवून, करबचतही करायची असल्यास या योजनेत गुंतवणूक करावी. मात्र मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक चालू ठेवायची तयारी असेल तर...

लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atule sule article about Investment Opportunity Bharat Bond ETF