बँक ऑफ बडोदाने सुरु केल्या 'स्टार्ट-अप' शाखा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

बँक ऑफ बडोदाने स्टार्ट-अपसाठी दहा शहरांमध्ये शाखा सुरु केल्या आहेत.

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने स्टार्ट-अपसाठी दहा शहरांमध्ये शाखा सुरु केल्या आहेत.  स्टार्ट-अपमध्ये बँकिंग पार्टनर म्हणून जोडण्यासाठी बँक प्रयत्न करणार आहे. येत्या दोन वर्षांत किमान 1000 स्टार्ट-अपशी जोडले जाण्याचा बँकेचा मानस आहे. 

स्टार्ट-अप्समुळे रोजगारनिर्मिती होऊन आणि नावीन्य साधले जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप व्यवस्था आहे. देशात 15 हजारांहून अधिक स्टार्ट-अप्सना सरकारने मान्यता दिली आहे. बँकेने बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेस विविध प्रकारची बँकिंग उत्पादने व सेवा सादर करणार असून त्यांची निर्मिती स्टार्ट-अप्सच्या विशेष बँकिंग गरजांच्या अनुषंगाने केली आहे. उत्पादनांमध्ये बँकेच्या सध्याच्या उत्पादनांबरोबरच, कस्टमाइज्ड स्टार्ट-अप करंट अकाउंट, अद्ययावत पेमेंट गेटवे, कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड व क्रेडिट सुविधा यांचा समावेश आहे.

“स्टार्ट-अप्सच्या विशिष्ट गरजांबद्दल मार्केट रिसर्चमधून मिळालेल्या तपशिलानुसार आम्ही हा कार्यक्रम तयार केला आहे. बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेसमध्ये विशेष रिलेशनशिप मॅनेजर असतील आणि ते स्टार्ट-अप्सबरोबर भागीदारी करतील व त्यांना सहभागी करून घेतील. यामुळे सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया योजनेतही योगदान दिले जाईल.” अशी माहिती बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी दिली. 

सध्या, बँकेने गुरूग्राम, दिल्ली, नोएडा, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, पुणे व हैदराबाद अशा देशातील महत्त्वाच्या स्टार्ट-अप केंद्रांवर 10 स्टार्ट-अप ब्रँच सुरू केल्या आहेत. पुढील टप्प्यात, बँक लखनऊ, इंदोर, कोलकाता, कोची व चंडीगड येथे स्टार्ट-अप शाखा सुरू करणार आहे. स्टार्ट-अप्ससाठी परिपूर्ण बँकिंग सेवा देण्याबरोबरच, स्टार्ट-अप्सना क्लाउड क्रेडिट, को-वर्किंग स्पेस, कायदेशीर/अकाउंटिंग सेवा व डिजिटल मार्केटिंग अशा अन्य सेवा देण्यासाठी बँकेने अशा सेवा देणाऱ्यांशी भागीदारी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of Baroda launches 'startup branches' in 10 cities