बॅंकांच्या ठेवीवरील व्याजादरात कपात

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने नागरिकांनी बॅंकेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केल्याने बॅंकांच्या व्याजदरात कपात होत असल्याचे चित्र आहे. स्टेट बॅंकेपाठोपाठ खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बॅंकांनी विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकांकडून 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बॅंकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या महितीनुसार, 390 दिवस ते दोनवर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 7.25 टक्‍क्‍यांवरून करून तो आता 7.10 टक्के केला आहे. एचडीएफसी बॅंकेने मोठ्या म्हणजेच रु. एक ते पाच कोटींच्या ठेवीवरील व्याजदर 0.25 टक्‍क्‍यांनी कमी केले आहेत. तो दर आता 6.5 टक्के असेल. शिवाय एक वर्षाच्या मुदत ठेवीसाठीचा व्याजदर 7 टक्‍क्‍यांवरून कमी करून 6.75 टक्के केला आहे. बॅंकेचे नवीन दर आजपासून लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बॅंकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि बॅंकेतील खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. परिणामी बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एसबीआयने एक वर्ष ते 455 दिवसांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदर 0.15 टक्‍क्‍यांनी कमी करून 6.90 टक्के करण्यात आला आहे. याआधी तो 7.05 टक्के होता. त्याचप्रमाणे 456 दिवस ते दोनवर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 7.10 टक्‍क्‍यांवरून कमी करून तो आता 6.95 टक्के केला आहे. तसेच दोन वर्ष ते तीन वर्षादरम्यानच्या मुदत ठेवीवर 6.85 टक्के दराने व्याज मिळेल. आता आणखी देखील काही बॅंकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात केली जाण्याची शक्‍यता आहे. तसेच येत्या 7 डिसेंबरला आरबीआय पतधोरण आढावा घेणार आहे. त्यामध्ये रेपोदरात कपात करण्याची शक्‍यता असल्याने कर्जाचे दर देखील कमी होण्याची आशा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks deposits interest rate down