सध्या तरी ‘कुछ ना करो!’

भूषण गोडबोले
Monday, 3 February 2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्‍समध्ये अपेक्षित असा कोणताही बदल न केल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या पडझडीमुळे शनिवारी ‘सेन्सेक्‍स’ने ९८७ अंशांची, तर ‘निफ्टी’ने ३०० अंशांची पडझड नोंदविली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्‍समध्ये अपेक्षित असा कोणताही बदल न केल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या पडझडीमुळे शनिवारी ‘सेन्सेक्‍स’ने ९८७ अंशांची, तर ‘निफ्टी’ने ३०० अंशांची पडझड नोंदविली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारकडून ‘गुगली’
केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आदी क्षेत्रांसह पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रामुख्याने भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र, कर भरणाऱ्यांसाठी कोणी किती कर भरावा, यासाठी दोन वेगवेगळे पर्याय दिले आहेत. तसेच, कंपनीला भरावा लागणारा लाभांश वितरण कर (डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्‍स) हटवून डिव्हिडंडवरील टॅक्‍स गुंतवणूकदाराकडे फिरवला आहे. एकंदरीत, अर्थसंकल्पात गुगली टाकल्याचे लक्षात येत आहे. 

टॅक्‍स वाचण्यासाठी नव्या टॅक्‍स स्लॅबप्रमाणे टॅक्‍स भरण्याचे ठरविल्यास इन्शुरन्स हप्त्यावरील सूट रद्द होणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद केले ेआहे. त्यामुळे इन्शुरन्स सेक्‍टरमधील अनेक कंपन्यांच्या शेअरने एका दिवसात मोठ्या प्रमाणात पडझड दर्शविली.

बाजाराची पाहणी आवश्‍यक
अर्थसंकल्प तर जाहीर झाला. आता शॉर्टटर्मसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. शॉर्टटर्मसाठी ट्रेडिंग करताना ज्याप्रमाणे आलेख पाहणे योग्य ठरते, त्याचप्रमाणे लाँगटर्मसाठी गुंतवणूक करताना फंडामेंटली बाजार स्वस्त आहे का महाग, तसेच ज्या कंपनीमध्ये दीर्घावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, ती कंपनी काय करते, तसेच फंडामेंटली ती कंपनी स्वस्त आहे का महाग आहे, हे तपासणेदेखील तितकेच आवश्‍यक असते. यामुळे अर्थसंकल्पानंतर आगामी कालावधीमध्ये लाँगटर्मसाठी गुंतवणूक करतानादेखील बाजाराची या सर्व दृष्टिकोनातून वेळोवेळी पाहणी करणे योग्य ठरेल.

खरेदी टाळणे योग्य ठरेल
सद्यःस्थितीमध्ये बाजाराचा कल नकारात्मक दिसत आहे. करोना व्हायरस तसेच आर्थिक मंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्येदेखील पडझड झाल्याचे दिसत आहे. अशा वेळेस जोपर्यंत तेजीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत ‘ट्रेडर्स’नी खरेदीचा मोह आवरून ‘कुछ तो करो’पेक्षा ‘कुछ ना करो’चा पवित्रा घेणे योग्य ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole article