करूया संयमातून सुख-समृद्धीचा श्रीगणेशा! 

stockmarket
stockmarket

एकीकडे "लॉकडाउन'च्या काळात आर्थिक चक्र मंदावले असताना घरबसल्या "ऑनलाइन ट्रेडिंग' करून म्हणजेच शेअर्समध्ये खरेदी-विक्री करून झटपट पैसा मिळविण्यासाठी बऱ्याच नव्या मंडळींनी ट्रेडिंगसाठी डी-मॅट खाती उघडली आहेत. गेल्या चार महिन्यांत अशी लाखो खाती उघडली गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 
"लॉकडाउन'च्या काळात घरातून काम करण्याची संधी मिळाल्याने; तसेच अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्याने घरबसल्या पैसे मिळवण्याच्या उद्दिष्टाने अनेक जण (विशेषतः तरुणवर्ग) शेअर बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. यामध्ये रोजच्या रोज व्यवहार (डे ट्रेडिंग) करून पैसा कमाविण्याचे सर्वांत जास्त आकर्षण आहे. काही जणांना तर "ट्रेडिंग'चे एखादे ऍप डाउनलोड करून ट्रेडिंग करणे म्हणजे मोबाईल गेम असल्यासारखे वाटते. अनेक वेळा लोक शेअर बाजारात खेळायचे कसे, असे प्रश्न विचारतात. शेअर बाजारात पैसे गुंतविण्यासाठी विचार करण्याऐवजी अनेकांना हा मान्यताप्राप्त सट्टा वाटतो. मात्र, शेअर बाजारातील शेअर म्हणजे पत्त्याच्या कॅटमधील पत्ते नसतात. मोफत मिळणाऱ्या "टिप्स'च्या आधारे गुंतवणूक करून अनेक जण फसताना दिसतात. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात फसण्यापेक्षा, या क्षेत्रात संयम ठेवून सुख-समृद्धीचा श्रीगणेशा आता करायला हवा! 

संयम महत्त्वाचा!
गुंतवणूकगुरु पीटर लिंच म्हणतात, "प्रत्येक शेअरमागे एक कंपनी असते.' अल्पावधीत खूप शेअर चढ-उतार दाखवतात. मात्र, दीर्घकाळात हे शेअर कंपनीच्या कामगिरीप्रमाणे परतावा देतात. म्हणून वॉरेन बफे देखील म्हणतात, "मी शेअर खरेदी करताना केवळ शेअर घेत आहे, असा विचार करण्याऐवजी त्या कंपनीचा हिस्सा म्हणजेच भागीदार होत असल्याचा विचार करतो.' त्यांच्या मते, शेअर बाजारात "इम्पेशंट किंवा संयम नसलेल्या लोकांकडून "पेशन्स' म्हणजेच संयम असलेल्या लोकांकडे पैसे हस्तांतरीत होत राहतात. यामुळे "इम्पेशंट' होऊन, गडबड करून रोज "ट्रेडिंग' करण्यापेक्षा "पेशन्स' ठेवून गुंतवणूक करणे हिताचे ठरते. थोडक्‍यात, जर शेअर बाजारात आपण "पेशन्स' ठेवले नाहीत, तर आपण "पेशन्ट' होऊ शकतो. शेअर बाजारात रोजच्या रोज खरेदी-विक्री करून अनेक वर्षे नफा मिळवत राहणे, हे अत्यंत जोखमीचे; तसेच अवघड काम आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉंग टर्मसाठी गुंतवणूक 
सद्यःस्थितीमध्ये घरी बसून काम करताना वेळ मिळत आहे किंवा नोकरी गेली आहे म्हणून दरमहा उत्पन्न मिळविण्यासाठी शेअर बाजारात रोज खरेदी-विक्री करण्याचा विचार करणे अत्यंत घातक आहे. अनेक यशस्वी गुंतवणूकदारांचा; तसेच ट्रेडर्सचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते, की "इंट्रा डे' किंवा "डे ट्रेडिंग'पेक्षा शॉर्ट टर्म-मिडीयम टर्म ट्रेडिंग करणे; तसेच उत्तम कामगिरी दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये लॉंग टर्मसाठी बाजाराचे व्हॅल्युएशन तपासून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरते. यामुळे गुंतवणूकदारांनी एकूण गुंतवणुकीसाठी राखीव ठेवलेल्या भांडवलातील शॉर्ट टर्म, मिडियम टर्म ट्रेडिंगसाठी कमी हिस्सा ठेवणे आणि लॉंग टर्मच्या गुंतवणुकीसाठी जास्त हिस्सा ठेवणे हितावह ठरते. मात्र, अनेक वेळा लोक झटपट पैसे मिळविण्यासाठी जोखीम न ओळखता, अभ्यास न करता शेअर बाजारात रोज मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेतात. 

"स्टॉपलॉस'चा वापर गरजेचा 
सर्वसामान्य गुंतवणूकदाराने शेअर बाजारात "रोज आओगे तो रोते हुए जाओगे, कम आओगे तो कमाते हुए जाओगे,' हा मंत्र लक्षात ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. ट्रेडिंग असो, की लॉंग टर्मची गुंतवणूक; कितीही अभ्यास केला तरी देखील शेअर बाजारात निर्णय चुकू शकतात. यामुळे ट्रेडिंग करताना आलेखानुसार दिशा ओळखून "स्टॉपलॉस'चा वापर करणे गरजेचे असते. तसेच एकाच कंपनीच्या शेअरमध्ये संपूर्ण भांडवल गुंतविण्याऐवजी बाजाराच्या व्हॅल्युएशनुसार विविध कंपन्यांची निवड करणे आवश्‍यक असते. घरी बसून वेळ मिळत आहे म्हणून शेअर बाजारात प्रवेश करण्याऐवजी बाजाराचा अभ्यास करून बाजारात गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. यासाठी या क्षेत्रातील जाणकार, अनुभवी तज्ज्ञांची मदत आणि सल्ला घेणे हितावह ठरते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"एशियन पेंट्‌स'कडे लक्ष हवे! 
आगामी कालावधीसाठी आलेखानुसार, एशियन पेंट्‌स या कंपनीच्या शेअरने ऑक्‍टोबर 2019 पासून रु. 1916 ते 1431 या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात रु. 1958 ला बंद भाव देत मर्यादित चढ-उतारांच्या अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार, एशियन पेंट्‌स या शेअरचा भाव रु. 1695 या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार दर्शवत आणखी वाढ दर्शविणे अपेक्षित आहे. कोरोनापूर्व काळात कंपनीने विक्री तसेच नफ्यात वर्षागणिक उत्तम वाढ नोंदविली आहे. एशियन पेंट्‌स ही पेंट क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. ही कंपनी उत्तम "रिटर्न्स ऑन इनव्हेस्टेड कॅपिटल'; तसेच वार्षिक तत्त्वावर मिळकतीमध्ये उत्तम वाढ दाखवित असल्याने, कंपनीच्या शेअरचा "प्राईस अर्निंग रेशो' महाग असूनदेखील लॉंग टर्ममध्ये उत्तम परतावा दिला आहे. ट्रेडिंग करताना अशा पद्धतीने टेक्‍नो-फंडामेंटल पद्धतीचा अवलंब करून रु. 1695 पातळीचा "स्टॉपलॉस' ठेवून या शेअरमध्ये मध्यम अवधीसाठी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. तसेच लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करताना देखील एशियन पेंट्‌स यासारख्या फंडामेंटल्सनुसार सक्षम कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे योग्य ठरेल. मात्र, मागील लेखामध्ये नमूद केल्यानुसार, बाजार सध्या महाग व्हॅल्युएशनला असल्याने मर्यादितच भांडवल गुंतविणे; तसेच ट्रेडिंग करताना "स्टॉपलॉस'चा वापर करणे आवश्‍यक आहे. 

(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com