esakal | पीटर लिंच यांचे सूत्र काय सांगते? 
sakal

बोलून बातमी शोधा

पीटर लिंच यांचे सूत्र काय सांगते? 

वॉरेन बफे यांच्याप्रमाणेच लिंच यांच्या मतेदेखील, कंपनी नक्की काय करते आणि पैसे कसे आणि किती मिळवते, हे कळत असेल तरच त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरते.

पीटर लिंच यांचे सूत्र काय सांगते? 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

यशस्वी गुंतवणूक करून सलग तेरा वर्षे २९ टक्के वार्षिक परतावा देणारे फंड मॅनेजर पीटर लिंच म्हणतात, शेअर बाजारात सामान्य व्यक्तीदेखील अशाप्रकारे असामान्य परतावा मिळवू शकते. यासाठी फक्त त्या दृष्टीने आजूबाजूला पाहणे आवश्‍यक आहे. लिंच यांच्या मते, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असता, त्या क्षेत्रातील जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळत असते. त्या माहितीचा वापर करून त्या क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राशी निगडित कोणत्या कंपनीला आगामी काळात फायदा मिळू शकतो, याचे विश्‍लेषण करा आणि मग त्या कंपनीच्या बिझनेस मॉडेल, बॅलन्स शीट, कॅश फ्लो आदींचे ‘फंडामेंटल ऍनॅलिसिस’ करून त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम फायदा मिळवता येऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

वॉरेन बफे यांच्याप्रमाणेच लिंच यांच्या मतेदेखील, कंपनी नक्की काय करते आणि पैसे कसे आणि किती मिळवते, हे कळत असेल तरच त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरते. लिंच म्हणतात, आर्थिक मंदीच्या काळातदेखील लोक ‘डंकिन डोनट्‌स’मध्ये येत होते आणि तेथील खाद्यपदार्थांचे सेवन करत होते. अशा वेळेस कोरियातील आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची चिंता करण्यापेक्षा मंदीतदेखील खाद्यपदार्थांची विक्री करून नफा मिळवत असलेल्या; तसेच सहज समजू शकणाऱ्या ‘डंकिन डोनट्‌स’सारख्या कंपनीच्या शेअरमध्ये लिंच यांनी गुंतवणूक करून १० पट परतावा मिळवला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याच पद्धतीने १९९३ व १९९४ मध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या बेबी सोप, शाम्पू, बॅंड-एड आदी विक्री करणाऱ्या; तसेच सहज समजू शकणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये लिंच यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मार्केटमधील मंदीमुळे; तसेच क्‍लिंटन यांच्या हेल्थकेअरमधील बदलत्या धोरणांच्या धास्तीमुळे हेल्थ केअरमधील कंपन्यांच्या शेअरने तेव्हा घसरण दर्शवली होती. यामध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ने देखील घसरण दर्शविली होती. मात्र, लिंच यांना माहीत होते, की ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा ५० टक्के नफा हा इंटरनॅशनल बिझनेसमुळे येतो. तसेच साबण, शाम्पू, बॅंड-एडच्या विक्रीवर बदलत्या हेल्थकेअरमधील धोरणांचा विशेष परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे कंपनीने नवीन प्रॉडक्‍टमधून विस्तार करण्याचे धोरण स्वीकारल्याने विक्रीमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. लिंच यांनी सल्ला दिलेल्या याच कंपनीच्या शेअरने १९९४ मध्ये केवळ दोन वर्षांत दुप्पट परतावा दिला. 

अशा प्रकारे सहज समजू शकणाऱ्या रोजच्या वापरातील वस्तूंची विक्री करणाऱ्या किंवा आजूबाजूला पाहिल्यावर सहज लक्षात येणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील टप्प्याटप्प्याने बाजाराचे मूल्यांकन लक्षात घेत गुंतवणूक करून दीर्घकाळात उत्तम नफा मिळवता येतो. 

इंडेक्‍स फंड हितावह
वॉरेन बफे यांच्या प्रमाणेच लिंच यांच्या मतेदेखील, कंपन्यांचा बिझनेस समजून घेऊन अशाप्रकारे गुंतवणूक करणे सर्वसामान्य व्यक्तीला शक्‍य नसल्यास धोका लक्षात घेऊन दीर्घकाळासाठी कमी खर्चाच्या ‘इंडेक्‍स फंडा’त दरमहा गुंतवणूक करणे हितावह ठरेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणत्या कंपन्यांकडे लक्ष द्याल? 
सहज समजू शकेल असा बिझनेस करणाऱ्या अनेक कंपन्या भारतातदेखील उत्तम व्यवसाय करीत आहेत. पॅराशूट-कोकोनट हेअर ऑइल विकणाऱ्या ‘मॅरिको’; तसेच गुड नाइट, हिट, हेअर डाय विकणाऱ्या ‘गोदरेज कन्झुमर’, बिस्कीटविक्री करणारी ‘ब्रिटानिया’, तसेच प्रॉक्‍टर अँड गॅम्बल हेल्थ लि. अशा अनेक कंपन्यांच्या शेअरचा विचार गुंतवणूकदार करू शकतात. मात्र, सद्यःस्थितीमध्ये मार्केटचे व्हॅल्यूएशन महाग असल्याने सर्व गुंतवणूक एकदम करण्याऐवजी बाजारभाव कमी-जास्त होण्याचा; तसेच बराच काळ भाव मर्यादित पातळ्यांमध्येच रेंगाळण्याचा धोका जाणून घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे योग्य ठरू शकेल. 
 
तेजी दर्शविल्यासच करा ‘ट्रेड’
मागील सप्ताहाअखेर शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने ७३० अंशांची घसरण दर्शविली आहे. यामुळे ट्रेडिंगचा विचार करता आगामी आठवड्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारामधून मंदीचे संकेत मिळत आहेत. आगामी आठवड्यासाठी १०,१९४ ही निफ्टीची महत्त्वाची पातळी आहे. आलेखानुसार बालाजी अमाईन्स जोपर्यंत ४४५ रु. तसेच श्री दिग्विजय सिमेंट ४५ रु.च्यावर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय संकेत मंदीचे असल्याने तसेच सद्यःस्थितीमध्ये बाजार महाग व्हॅल्यूएशनला असल्याने ‘ट्रेडिंग’ करताना गडबड करण्याऐवजी आगामी आठवड्यात निफ्टीने तसेच तेजीचा कल दर्शवणाऱ्या शेअर्सनेदेखील तेजी दर्शविल्यासच ट्रेडर्सने मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारून ‘स्टॉपलॉस’ ठेवून ‘ट्रेड’ करणे योग्य ठरेल.
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image
go to top