esakal | 'टेक्नो-फंडा अॅप्रोच' फायदेशीर ठरेल
sakal

बोलून बातमी शोधा

Techno-Funda Approach

‘लॉकडाउन’च्या काळात फास्ट मुव्हिंग कन्झुमर गुड्‌स (एफएमसीजी) म्हणजेच रोजच्या वापरातील वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा; तसेच फार्मा कंपन्यांचा व्यापार काही प्रमाणात सुरु होताच.

'टेक्नो-फंडा अॅप्रोच' फायदेशीर ठरेल

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ ३८,०४०, तर ‘निफ्टी’ ११,२१४ अंशांवर बंद झाले. आलेखानुसार पुढील आठवड्यासाठी १०,८८२ ही ‘निफ्टी’ची आणि ३६,९१० ही ‘सेन्सेक्‍स’साठी महत्त्वाची आधार पातळी आहे. शॉर्टटर्म चार्टनुसार बर्जर पेंट्‌स, अपोलो टायर्स, अल्केम लॅब, डेल्टा कॉर्प आदी कंपन्यांचे आलेख तेजीचा कल दर्शवत आहेत. 

अपोलो टायर्स आणि बर्जर पेंट्‌स
अपोलो टायर्स या कंपनीच्या शेअरने ८ जुलैपासून रु. ११९ या भावपातळीपासून घसरण दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात पुन्हा ११९ या पातळीच्या वर म्हणजेच या ‘रेजिस्टन्स’च्या वर रु. १२३ ला बंद भाव दिला. आलेखानुसार ‘ब्रेकआऊट’ देत अल्पावधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत रु. ११० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत शॉर्टटर्ममधे आणखी वाढ दर्शवू शकतो. बर्जर पेंट्‌स या कंपनीच्या शेअरने २८ एप्रिल २०२० रोजी रु. ५४६; तसेच पुन्हा २४ जून २०२० रोजी रु. ५५२ या पातळीपासून घसरण दर्शविली होती. थोडक्‍यात, ५४६ ते ५५२ हा बर्जर पेंट्‌स या कंपनीच्या शेअरसाठी ‘रेसिस्टन्स झोन’चे काम करीत होता. मात्र, मागील आठवड्यात या शेअरने रु. ५५२ ला बंद भाव देत ‘रेसिस्टन्स झोन’ तोडल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जोपर्यंत या शेअरचा भाव रु. ५२३ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत शॉर्टटर्ममधे आणखी तेजी दर्शवू शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एफएमसीजी आणि फार्मा
‘लॉकडाउन’च्या काळात फास्ट मुव्हिंग कन्झुमर गुड्‌स (एफएमसीजी) म्हणजेच रोजच्या वापरातील वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा; तसेच फार्मा कंपन्यांचा व्यापार काही प्रमाणात सुरु होताच. ‘लॉकडाउन’नंतरच्या काळात देखील या कंपन्यांचा व्यवसाय सुरूच राहणार आहे. यामुळे लाँगटर्मसाठी अशा क्षेत्रात मक्तेदारी; तसेच उत्तम ‘रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल’ मिळविणाऱ्या कंपन्यांमधे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

‘ट्रेडिंग’ करताना...
सध्याच्या परिस्थितीमधे ‘ट्रेडिंग’चा विचार करता, ज्या कंपन्यांचा व्यवसाय वा धंदा ‘लॉकडाउन’नंतर लगेच सुरु झाला झाला आहे, अशा कंपन्यांच्या शेअरच्या आलेखानुसार तेजीचे संकेत मिळाल्यावर ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करून ‘ट्रेडिंग’ करणे फायदेशीर ठरू शकते. बर्जर पेंट्‌स या कंपनीने लॉकडाउनपूर्व काळात ‘टॉपलाईन’ म्हणेजच कंपनीच्या प्रॉडक्‍ट विक्रीत उत्तम वाढ दर्शविली होती. तसेच ‘बॉटमलाईन’मधे म्हणजेच प्रॉफिटमधे देखील उत्तम वाढ दर्शविली होती. कंपनी बिझनेसमधे १८ टक्के ‘रिटर्न्स ऑन कॅपिटल’ दर्शवत आहे. यामुळे कंपनीच्या शेअरने महाग पीई रेशो असताना देखील वाढ नोंदविली आहे. 

संरक्षण क्षेत्रातील  शेअरकडे लक्ष द्या!
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी १०१ संरक्षण सामग्रीच्या आयातीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल जाहीर केला. त्यामुळे आता ही सामग्री देशांतर्गत कंपन्यांकडून बनवून घेण्यावर भर द्यावा लागणार आहे. या निर्णयाचा फायदा यापुढच्या काळात भारत फोर्ज, भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स, भारत डायनॅमिक्‍स, एल अँड टी, हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स यासारख्या, तसेच स्टील क्षेत्रातील कंपन्यांना होऊ शकतो. त्यामुळे संरक्षण यंत्रसामग्री क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर लक्ष ठेवावे लागेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘टेक्‍नो-फंडा ॲप्रोच’
‘लॉकडाउन’नंतर कंपनीचा व्यवसाय हळूहळू पुन्हा रुळावर येणे अपेक्षित आहे. अशा कंपनीच्या शेअरमधे ‘टेक्‍नो-फंडा ॲप्रोच’ ठेऊन म्हणजेच आलेखानुसार; तसेच फंडामेंटल्सनुसार सक्षमता दर्शविणाऱ्या कंपन्यांमधे ‘ट्रेडिंग’ करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, एकूण बाजार महाग व्हॅल्युएशनला असल्याने ट्रेडिंग करताना कमी भांडवलावर ‘ट्रेड’ करणे; तसेच ‘स्टॉपलॉस’चा वापर करणे अत्यंत आवश्‍यक आहे. कारण बाजार; तसेच कंपन्यांचे शेअर कधीही दिशा बदलू शकतात. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बाजाराचे; तसेच शेअरचे विश्‍लेषण केले आहे. ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना जोखीम ओळखून वैयक्तिक आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करूनच व्यवहार करणे योग्य ठरेल.     

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image