esakal | ‘मुहूर्त ट्रेडिंग’मधून घरी आणा ‘लक्ष्मी’!
sakal

बोलून बातमी शोधा

sebi

ज्यो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकालांबाबत न्यायालयात दाद मागण्याचे वक्तव्य केले आहे. या आठवड्यात देखील अमेरिकेतील निवडणुकीचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर झालेला दिसेल.

‘मुहूर्त ट्रेडिंग’मधून घरी आणा ‘लक्ष्मी’!

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालातील चढ-उतारांबरोबर जागतिक तसेच भारतीय शेअर बाजाराने तेजी दाखविली. ज्यो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकालांबाबत न्यायालयात दाद मागण्याचे वक्तव्य केले आहे. या आठवड्यात देखील अमेरिकेतील निवडणुकीचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर झालेला दिसेल. 

मागील आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ४१,८९३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १२,२६३ अंशावर बंद झाले. ‘ट्रेडिंग’च्या दृष्टीने या आठवड्यासाठी ‘सेन्सेक्स’ची ३९,२४०, तर ‘निफ्टी’ची ११,५३५ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘एचडीएफसी’मध्ये तेजीचे संकेत
या आठवड्यात शनिवारी (ता. १४) सायंकाळी सव्वासहा वाजता दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात एक तास विशेष मुहूर्ताचे ट्रेडिंग सत्र होणार आहे. या दिवशी गुंतवणूकदारांनी कशा प्रकारे ‘ट्रेडिंग’ किंवा गुंतवणूक करावी, याचा विचार करूया. ‘ट्रेडिंग’च्या दृष्टीने विचार करता, एचडीएफसी बँकेच्या शेअरने मध्यम अवधीच्या आलेखानुसार रु. १३०४ या महत्त्वाच्या अडथळा पातळीच्या वर रु. १३०७ या पातळीला बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार, एचडीएफसी बँकेच्या शेअरचा भाव रु. ११६३ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार दर्शवत या शेअरमध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. यामुळे ‘ट्रेडिंग’च्या दृष्टिकोनातून या शेअरमध्ये रु. ११६३ वर ‘स्टॉपलॉस’ ठेवून मध्यम अवधीसाठी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘या’ शेअरमध्ये ‘लक्ष्मी’ची पावले
मुहूर्त ट्रेडिंगचा विचार करता, ज्या गुंतवणूकदारांनी या पूर्वी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून उत्तम नफा मिळवला असेल, त्यांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची काही प्रमाणात विक्री करून होणाऱ्या फायद्याच्या स्वरूपातील ‘लक्ष्मी’ घरी आणणे योग्य ठरेल. लाँग टर्मसाठी नवी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने एचडीएफसी बँक; तसेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), ब्रिटानिया इंडस्ट्रीज या सारख्या फंडामेंटली सक्षम कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा प्रारंभ करणे फायदेशीर ठरू शकेल. 

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image