बाजाराचा बाउन्स बॅक; सावधानता आवश्‍यक 

भूषण गोडबोले 
Monday, 4 May 2020

केवळ 'बाउन्स बॅक' दिसत असल्याने तेजीचे व्यवहार करताना 'स्टॉप लॉस' ठेऊनच खरेदी करणे तसेच मर्यादितच धोका स्वीकारणे योग्य ठरेल. थोडक्‍यात तेजीचा व्यवहार करताना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे.

सरलेल्या आठवड्यात सप्ताह अखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्‍स जोरदार उसळी घेत 33 हजार 717 अंश तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने 9 हजार 859 अंशांवर बंद झाला. अल्पावधीच्या 'ट्रेडिंग'साठी विचार करता जोपर्यंत निफ्टी 8 हजार 821 या पातळीच्या वर आहे तोपर्यंत टेक्‍निकल चार्ट 'बाउन्स बॅक' म्हणजेच मंदीनंतरची उसळी दर्शवत आहे,अशा वेळेस चार्टनुसार जोपर्यंत तेजी दिसत आहे तोपर्यंत तेजी दर्शविणाऱ्या शेअरमध्ये 'स्टॉपलॉस' ठेवून खरेदी करणे योग्य ठरू शकते. अल्पावधीच्या म्हणजेच 'शॉर्ट टर्म'च्या चार्टनुसार टाटा कॉफी तसेच रिलॅक्‍सो फूट वेअर या कंपनीच्या शेअरने तेजीचे संकेत दिले आहेत. एप्रिल महिन्यात 633 ते 590 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात रिलॅक्‍सो फूट वेअर या कंपनीचा शेअर 635 रुपयांवर बंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेअरने शॉर्ट टर्मसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत रिलॅक्‍सो फूट वेअर कंपनीचा शेअर 606 रुपयांच्या वर आहे तोपर्यंत आणखी वाढ दर्शवू शकतो. यामुळे मर्यादित धोका स्वीकारून 606 रुपयांना 'स्टॉप लॉस' ठेवून रिलॅक्‍सो फूट वेअरच्या शेअरमध्ये 'शॉर्ट टर्म'साठी ट्रेडिंग करणे फायदेशीर ठरू शकेल.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराने घसरण दर्शविली आहे. तसेच निफ्टीच्या मागील दीड वर्षाच्या चार्टचा विचार करता बाजार जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात पडझड केल्यावर जसा एखादा चेंडू दहाव्या मजल्यावरून टाकल्यावर खाली पडल्यावर काही मजले उसळी दर्शवतो त्याच प्रमाणे केवळ निफ्टी एक 'बाउन्स बॅक' दर्शवत आहे. हा तात्पुरता 'बाउन्स बॅक' आहे की तेजी हे नंतर काळच ठरवेल. मात्र सद्यस्थितीत केवळ 'बाउन्स बॅक' दिसत असल्याने तेजीचे व्यवहार करताना 'स्टॉप लॉस' ठेऊनच खरेदी करणे तसेच मर्यादितच धोका स्वीकारणे योग्य ठरेल. थोडक्‍यात तेजीचा व्यवहार करताना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. 

लेखक सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार 

(डिस्क्‍लेमर ः लेखकाने त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole article coronavirus bounce back