रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम परतावा मिळण्याचा मूळ मंत्र

भूषण गोडबोले
Monday, 1 June 2020

ज्या कंपन्या मागील 7वर्ष म्हणजेच जास्तकाळ सातत्याने उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहेत,म्हणजेच त्या कंपन्या स्पर्धकांना मात देत आहेत किंवा त्या कंपन्यांकडे स्पर्धकांपेक्षा काहीतरी वैशिष्ट्य आहे.

गुंतवणुकीवर दीर्घकालीन उत्तम परतावा (रिटर्न) मिळावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते. यामुळे ज्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहोत, ती कंपनी करत असलेल्या व्यवसायात किती "रिटर्न' मिळवत आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूक गुरु चार्ली मुंगर म्हणतात, जर एखादी कंपनी स्वतः च्या व्यवसायमधून गुंतविलेल्या भांडवलावर 40 वर्षात दर वर्षी जर केवळ 6 टक्केच परतावा मिळवत असेल तर, त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी 40 वर्ष गुंतवणूक करून देखील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दर वर्षी 6 टक्केच असणे अपेक्षित आहे 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

थोडक्यात, दिर्घकाळामध्ये शेअरचा परतावा कंपनीच्या भांडवलावर मिळणाऱ्या परताव्याप्रमाणे वाटचाल करतो. एखादा व्यवसाय उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत असेल तर त्या व्यवसायात अनेक व्यावसायिक उतरू लागतात. ज्यामुळे स्पर्धा निर्माण होते आणि पर्यायाने "प्राईस वॉर' म्हणेजच एकमेकांपेक्षा उत्पादनाची किंवा देत असलेल्या सेवांची किंमत कमी होण्याकडे कल होऊ लागतो. ज्यामुळे त्या व्यवसायात पूर्वीसारखा मिळणारा परतावा किंवा "रिटर्न ऑन कॅपिटल' कमी होऊ लागते. स्पर्धेच्या युगात ज्या कंपन्या मागील 7 वर्ष म्हणजेच जास्तकाळ  सातत्याने उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहेत, म्हणजेच त्या कंपन्या स्पर्धकांना मात देत आहेत किंवा त्या कंपन्यांकडे स्पर्धकांपेक्षा काहीतरी वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे ते व्यवसायामधील मिळणारे "रिटर्न' तसेच एकाधिकार टिकवून आहेत तसेच मिळणाऱ्या "रिटर्न'मधून जर कंपन्या पुन्हा स्वतः च्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करत असतील तर, चक्रवाढ पद्धतीने व्यवसायाची वृद्धी होते. पर्यायाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक उत्तम "रिटर्न' देते. ब्रिटिश फंड मॅनेजर टेरी स्मिथ ज्यांची  "इंग्लिश' वॉरेन बफे म्हणून  स्तुती केली जाते ते देखील याच प्रकारचे वक्तव्य करतात.ॉ

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

भारतीय शेअर बाजारात ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले, मॅरिको,एशियन पेन्ट्स ,पिडिलाईट इत्यादी अनेक कंपन्या अशा प्रकारचे उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' दर्शवतात. आजपर्यंत दिर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यावर या कंपन्यांच्या शेअरने चांगला परतावा दिला आहे. सामान्यपणे महाग "व्हॅल्युएशन'ला वाटणाऱ्या या कंपन्यांचे शेअरने त्यांच्या व्यवसायतील स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे महाग "व्हॅल्युएश'ला टिकाव धरून  दीर्घकाळ म्हणजेच 5 ते 10 वर्षाच्या काळात चढ-उतार दर्शवून देखील खूप चांगला परतावा दिला आहे. सामान्य गुतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना अशा प्रकारे उत्तम  "रिटर्न ऑन कॅपिटल' दिलेल्या तसेच भांडवलात स्पर्धात्मक गुणवत्तेच्या बळावर व्यवसाय वृद्धी करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील आठवड्यात सेन्सेक्स 32,424 अंशांवर तर निफ्टी 9580 अंशांवर बंद झाला. पुढील कालावधीसाठी निफ्टीची 8800 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. "शॉर्ट टर्म ट्रेडिंग'च्या दृष्टीने विचार करता औषध कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा "फार्मा इंडेक्स' जोपर्यंत 8,999 पातळीच्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. "शॉर्ट टर्म'च्या आलेखानुसार, निफ्टी 9800 ते 8800 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार करत आहे. मात्र "फार्मा इंडेक्स'ने मागील 7 आठवडे 9,753 ते 8,999 या मर्यादित पातळ्यांमधेच चढ उतार दर्शविल्यानंतर मागील सप्ताह अखेर 9,768 पातळीला बंद भाव देऊन मर्यादित पातळ्यांमध्येच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडून "शॉर्ट टर्म'साठी तेजीचे संकेत दिले आहेत. फार्मा इंडेक्समधील सिप्ला, अरबिंदो फार्मा या कंपन्यांचे शेअरने देखील मर्यादित पातळ्यांमधेच फिरणाऱ्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत देत तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे मर्यादित धोका स्वीकारून 609 या पातळीचा "स्टॉप लॉस' ठेऊन सिप्ला कंपनीच्या शेअरमध्येमध्ये "शॉर्ट टर्म'साठी खरेदी करणे योग्य ठरू शकेल. अशा प्रकारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना प्रामुख्याने  "फंडामेंटल' विश्लेषण आणि अल्पावधीसाठी ट्रेडिंग करताना प्रामुख्याने "टेक्निकल' विश्लेषण करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल.

सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan Godbole article writes best return on investment on capital