शेअर म्हणजे लॉटरीचे तिकीट नव्हे!

शेअर म्हणजे लॉटरीचे तिकीट नव्हे!

सरत्या वर्षातील डिसेंबर महिन्यात विक्रमी ‘जीएसटी’ संकलन झाल्याची सकारात्मक बातमी नव्या वर्षाच्या आरंभी मिळाली आहे. नववर्षाच्या सुरुवातीस तेजीच्या लाटेवर स्वार राहून मागील पानावरून पुढे सरकत गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ४७,८६८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १४,०१८ अंशावर बंद झाला आहे. सामान्यतः गुंतवणूकदार किमतीने स्वस्त, तसेच कमी वेळेत भरपूर वाढणाऱ्या शेअरच्या शोधात असतो. बाजारात तेजीचा बैल उधळत असताना, व्यवसायात कमकुवत वाटणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअरदेखील वाढ दाखवत असतात. अशातच त्या कंपन्यांच्या शेअरचा भाव कमी असल्यास अशा शेअरच्या खरेदीच्या मोहाला सर्वसामान्य गुंतवणूकदार बळी पडू शकतात. बाजारातून धान्य आणल्यावर त्यामधून खडे काढून धान्य निवडावे लागते. पण, बाजारात भेसळच मोठ्या प्रमाणात होत असते, तेव्हा खडेच मिळतात आणि त्यातून धान्य निवडावे लागते.

कंपनीची गुणवत्ता महत्त्वाची
दीर्घकालीन गुंतवणूक करताना शेअर किती स्वस्त आहे, यापेक्षा ज्या कंपनीचा तो शेअर आहे, त्याची गुणवत्ता काय आहे, हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूक गुरु पिटर लिंच म्हणतात, ‘शेअर म्हणजे लॉटरीचे तिकीट नव्हे, इथे प्रत्येक शेअरमागे एक कंपनी आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना, त्या कंपनीचा विचार करणे आवश्यक आहे.’ कधीकधी उत्तम गुणवत्ता असलेल्या कंपन्यांचे शेअर महाग वाटतात, मात्र भविष्यातील मिळकतीचा विचार करता त्या कंपन्यांचा भाव स्वस्त असू शकतो. 

टप्प्याटप्प्याने गुंतवणूक हवी
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हितावह ठरते. कधीकधी उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे शेअर हे निर्देशांकाइतकी वाढ दर्शवीत नाहीत. मात्र, कालांतराने निर्देशांकातील वाढ थंडावते किंवा पुन्हा सामान्य गती पकडते. अशा वेळेस उत्तम परतावा मिळवून व्यवसायवृद्धी करणाऱ्या कंपन्यांचे शेअर व्यवसायवृद्धीच्या गतीला अनुसरून वाढ दर्शवितात आणि दीर्घावधीमध्ये एकूण निर्देशांकातील परताव्यापेक्षा जास्त परतावा देताना दिसतात.

‘डॉ. लाल पॅथ लॅब’मध्ये  तेजीचे संकेत
डॉ. लाल पॅथ लॅब या पॅथॉलॉजी लॅबचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने गेल्या आठवड्यात रु. २३९४ च्या पातळीच्या वर म्हणजे  रु. २४०७ ला बंद भाव देऊन आलेखानुसार मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड व्यवसायातील एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअरनेदेखील रु. २८२० या पातळीच्या वर रु. २८९८ ला बंद भाव देत मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. मध्यम अवधीचे ट्रेडिंग असो की दीर्घकालीन गुंतवणूक असो, जोखीम ओळखून  गुंतवणूकदारांनी अशा प्रकारच्या फंडामेंटली सक्षमता दर्शविणाऱ्या कंपन्यांची निवड करणे हितावह ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com