खाईन तर तुपाशी, नाही तर.....

भूषण गोडबोले
Monday, 14 December 2020

शेअर बाजारात तेजी असताना फंडामेंटली कमकुवत असणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअरदेखील मोठ्या प्रमाणात वाढ दर्शवू शकतात. अशा वाढीला भुलून न जाता विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक असते.

कोविडवरील लशीच्या बाबतीत होणाऱ्या सकारात्मक घडामोडी, वाहनविक्रीचे वाढते प्रमाण अशा अनेक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ उड्या मारत गेल्या आठवड्यात ४६,०९९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १३,५१३ अंशांवर बंद झाला. ऑक्टोबरमधील जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन दरानेदेखील सकारात्मक वाटचाल दर्शविली आहे. अशा परिस्थितीत ट्रेडर्सनी, तसेच गुंतवणूकदारांनी कशा पद्धतीने व्यवहार करावेत, ते पाहूया. 

शेअर बाजारात तेजी असताना फंडामेंटली कमकुवत असणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअरदेखील मोठ्या प्रमाणात वाढ दर्शवू शकतात. अशा वाढीला भुलून न जाता विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक असते. वॉरेन बफे म्हणतात, ‘पैसे देऊन काचेचे तुकडे विकत घेण्यापेक्षा त्याच पैशात हिऱ्याचा अत्यंत छोटा तुकडा घेतलेला योग्य’. सध्या शेअर बाजार नवनवे उच्चांक गाठत असताना गुंतवणूकदारांनी मर्यादित आणि फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्येच जोखीम स्वीकारणे योग्य ठरू शकेल. 

अर्थविषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘डी-मार्ट’मध्ये तेजीचे संकेत 
आलेखानुसार विचार करता, ४३,४५३ ही ‘सेन्सेक्स’ची, तसेच १२,७३० ही ‘निफ्टी’ची महत्त्वाची आधार पातळी आहे. राधाकृष्ण दमानी यांची ॲव्हेन्यू सुपरमार्ट (डी-मार्ट) ही कंपनी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. कंपनीचे भांडवलाचे प्रमाण जास्त आहे. जून २०२० च्या आकडेवारीनुसार, कंपनी २०० पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे, तसेच स्वतः गुंतविलेल्या भांडवलावर मागील अनेक वर्षे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे. मात्र, धंद्याचे स्वरूप पाहता कंपनीचा ‘फ्री कॅश फ्लो’ उणे आकडे दर्शवितो. लॉकडाउननंतर व्यवसायातील विक्री आणि नफ्यात प्रगती करत व्यवसाय रुळावर येत असल्याचे संकेत या कंपनीने दिले आहेत. आगामी काळातील वस्तूंची ऑनलाइन विक्री आणि खरेदी करण्याचा वाढता ट्रेंड आणि स्पर्धकांचा धोका ओळखून कंपनीने ‘डी-मार्ट रेडी’ची सुरुवात करून उपलब्ध वस्तूंची ऑनलाइन विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ‘डी मार्ट’च्या शेअरने फेब्रुवारी २०२० पासून रु. २५६० ते १७२९ या पातळ्यांमध्ये चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. २५६० या पातळीच्या वर रु. २६८५ ला बंद भाव देऊन आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. ट्रेडिंगचादृष्टीने या शेअरचा भाव रु. २१६० या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टप्प्याटप्प्यानेच गुंतवणूक हवी
ॲव्हेन्यू सुपरमार्ट प्रमाणेच नेस्ले इंडिया, मॅरिको, कोलगेट पॉमोलिव्ह, कॅम्स, टायटन, ब्रिटानिया, एशियन पेंट्स आदी अनेक कंपन्यांचे शेअर सद्यःस्थितीत महाग वाटणार; मात्र दीर्घावधीतील कंपनीच्या मिळकतीमधील; तसेच व्यवसायवृद्धीचा विचार करता गुंतवणूकदारांनी मर्यादित भांडलावर मर्यादित धोका स्वीकारून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. असे धोरण आखल्याने कंपनीच्या शेअरमध्ये भविष्यात घसरण झाल्यास पुन्हा खरेदीच्या संधीचा फायदा घेता येतो. त्यामुळे केवळ तेजी पाहून कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्याऐवजी संबंधित कंपनी करीत असलेल्या व्यवसायाचे स्वरूप जाणून घेऊन ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी’ असे म्हणत ‘सोच कर, समझ कर, निवेश कर,’ हा मूलमंत्र जपणे योग्य ठरू शकेल. 

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे. 

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole write article share market sensex