शेअर मार्केट : ‘सेन्सेक्स’ची साठी : ‘अभी तो मैं जवान हूँ’

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६०,०४८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७८५३ अंशावर बंद झाला. कोरोना महासाथीमुळे गेल्या वर्षी उद्योगांची चक्रे मंदावल्याने करसंकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.
Sensex
SensexSakal

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६०,०४८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७८५३ अंशावर बंद झाला. कोरोना महासाथीमुळे गेल्या वर्षी उद्योगांची चक्रे मंदावल्याने करसंकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, चालू आर्थिक वर्षात करसंकलन वाढून ५,७०,५६८ कोटी रुपयांवर गेल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) नुकतेच जाहीर केले. वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वाढते संकलन; तसेच प्रत्यक्ष करसंकलनात झालेली मोठी वाढ, ही आकडेवारी अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत असल्याचे संकेत आहेत, असे वक्तव्य गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. सध्या शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांचा उत्साह आणि विश्वास वाढत असल्याचे विधान देखील सीतारामन यांनी केले होते. त्याची प्रचिती आता येत आहे.

पाहता पाहता ‘सेन्सेक्स’ने भरारी घेत ६० हजार अंशांचा टप्पा देखील गाठला आहे. एकीकडे साठी ओलांडून ‘सेन्सेक्स’ सिनियर सिटीझन झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर तेजीच्या लाटेवर गुंतवणूकदार उत्साहात गुंतवणूक करीत असल्याने बाजारही ‘अभी तो मैं जवान हूँ’ असे जणू गाणेच गात आहे.

‘सेन्सेक्स’ने साठी गाठली असताना या सिनियर सिटीझनशीपचा आदर करीत बाजाराचा मागील इतिहास आणि आजपर्यंत केलेल्या वाटचालीचा अनुभव लक्षात घेऊन, ज्येष्ठत्वातून घेता येणारे अनुभवाचे बोल गुंतवणूकदारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षी मार्चनंतर शेअर बाजारात आलेल्या नव्या गुंतवणूकदारांना कमी अवधीत सहज मोठा परतावा मिळाल्याने त्यांना बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे सहजसोपे असल्याचे भासत आहे, तर काही गुंतवणूकदारांनी योग्य शेअरची निवड न केल्याने बाजार वाढून देखील त्यांना परतावा मिळत नसल्याचे चित्र आहे. काही गुंतवणूकदार तर कोणतीही गुंतवणूक न करता बाजार पडला की मगच सर्व गुंतवणूक करू म्हणत थांबल्याने आता त्याची अवस्था कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी झाली आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी, तसेच ‘ट्रेडर्स’नी काय करावे?

लांब पल्ल्याची गुंतवणूक करताना

मागील अनेक लेखात म्हटल्याप्रमाणे, लांब पल्ल्याची गुंतवणूक करताना ज्या कंपन्या व्यवसायात उत्तम परतावा मिळवत आहेत, ज्यांच्यावर कर्जाचे प्रमाण कमी आहे, ज्याचे व्यवसायाचे स्वरूप सहज कळण्यासारखे आहे; तसेच ज्या कंपन्यांचे व्यवस्थापन उत्तम आणि विश्वासार्ह आहे, अशाच कंपन्यांचा विचार करा. आगामी ७ ते १० वर्षांत किंवा दीर्घकाळामध्ये कंपन्यांना मिळणाऱ्या मिळकतीचा विचार करून अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. अशा पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी चप्पल-बूट विक्री करणारी रिलॅक्सो फूटवेअर (सध्याचा भाव रु. ११६२), पेंट क्षेत्रातील बर्जर पेंटस (सध्याचा भाव रु. ८४०), मॅरिको लि. आदी कंपन्यांचा विचार करावा.

लांब पल्ल्याची गुंतवणूक करताना बाजारात एकदम मंदी आल्यास उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये पुन्हा गुंतवणुकीची संधी मिळत असते. बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर कमी वेळात एकदम मोठी वाढ दर्शवून पुन्हा मोठी घसरण देखील दर्शवितात. आले भरारा आणि गेले भरारा, मात्र व्यवसायातून उत्तम परतावा मिळवत प्रगती केलेल्या कंपन्यांच्या शेअरचाच बाजारात दरारा राहिल्याची शिकवण ‘सेन्सेक्स’च्या ज्येष्ठत्वाने दिली आहे. कमी भांडवलात गुंतवणूक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी निफ्टी फिफ्टी, निफ्टी नेक्स्ट फिफ्टी अशा इंडेक्स फंडामध्ये किंवा निफ्टी बीज, ज्युनिअर बीज, बँक बीज, गोल्ड बीज अशा एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचा देखील जोखीम लक्षात घेऊन दरमहा गुंतवणुकीसाठी विचार करावा.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

‘ट्रेडिंग’साठी कजारिया सिरॅमिक्स; तेजीचे संकेत

कजारिया सिरॅमिक्स या कंपनीच्या शेअरने २७ ऑगस्टपासून मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. १२४२ ला बंद भाव देऊन आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार जोपर्यंत हा भाव रु. १११५ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आगामी काळात आणखी तेजी दर्शवू शकतो.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com