esakal | शेअर मार्केट : आता शेअर बाजारात ‘खेला होबे’?
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

शेअर मार्केट : आता शेअर बाजारात ‘खेला होबे’?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्याच्या अखेरीस रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल जाहीर झाले. पेट्रोकेमिकल व्यवसायाबरोबर जिओ या दूरसंचार व्यवसायामुळे; तसेच रिटेल विक्री व्यवसायाच्या जोरावर कंपनीला २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात तब्बल ५३,७३९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसरीकडे, वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) संकलनाचे विक्रमी आकडे समोर आले आहेत. तसेच सर्वांचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपला अपेक्षेइतके यश (विशेषतः पश्चिम बंगाल) मिळालेले दिसत नाही. आज या सर्वांचा बाजारावर (‘खेला होबे’) काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आगामी आठवड्यात कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन एनर्जी; तसेच हिरो मोटोकॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, डी-मार्ट (ॲव्हेन्यू सुपरमार्ट) आदी अनेक दिग्गज कंपन्यांचे निकाल जाहीर होतील.

मेटल सेक्टरची चकाकी

एकीकडे बाजारात घसरण होत असताना गेल्या आठवड्यात ‘सेल’ अर्थात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया; तसेच टाटा समूहातील मेटल सेक्टरमधील टाटा स्टील, टाटा मेटॅलिक्स, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स आदी अनेक कंपन्यांचे शेअर लाक्षणिक वाढ करत चमकत आहेत. पूर्वी नमूद केलेल्या ‘सेल’ या कंपनीच्या शेअरने उत्तम वाढ केली आहे. अशा वेळेस ‘स्टॉपलॉस’ची पातळी वर घेणे हितावह ठरेल. आलेखानुसार, टाटा मेटॅलिक्स या कंपनीच्या शेअरने जानेवारी २०१८ मध्ये रु. ९७५ चा उच्चांक नोंदविल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी गेल्या आठवड्यात रु. ९७५ या पातळीच्या वर रु. १०५५ ला बंद भाव देऊन दीर्घावधीच्या आलेखानुसार ‘ब्रेकआऊट’ करत तेजीचे संकेत दिले आहेत. या शेअरचा भाव जोपर्यंत रु. ६६४ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत चढ-उतार दर्शवत आणखी भाववाढ होऊ शकते. मेटल सेक्टर व्यवसायात चढ-उतार मोठ्या प्रमाणात होत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये व्यवहार करताना मर्यादित भांडलावर मर्यादितच जोखीम स्वीकारून ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करणे हितावह ठरू शकेल.

‘डिव्हीज लॅब’कडे लक्ष

डिव्हीज लॅबोरेटरीज ही फार्मा सेक्टरमधील अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटकांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असेलली एक अग्रेसर कंपनी आहे. जानेवारी २०२१ पासून एप्रिल २०२१ पर्यंत रु. ३९१४ ते ३१५३ या मर्यादित पट्ट्यात चढ-उतार केल्यावर, गेल्या आठवड्यात शुक्रवारी रु. ३९१४ या अडथळा पातळीच्या वर रु. ४०६२ ला बंद भाव देऊन आलेखानुसार मध्यम अवधीसाठी या शेअरने तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे जोपर्यंत या शेअरचा भाव रु. ३१५३ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे.

अशा प्रकारे गेले काही महिने ‘सेन्सेक्स’ मर्यादित पट्ट्यात चढ-उतार करीत असताना, आलेखानुसार संधी ओळखून तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअर्सनी तेजीचे संकेत दिल्यास मर्यादित जोखीम स्वीकारून व्यवहार करणे योग्य ठरू शकेल.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image
go to top